ढेबेवाडीच्या बाजारपेठेत बिबट्या घुसला

patan
patan

ढेबेवाडी (जि. सातारा) : परिसरातील दुर्गम डोंगर भागात दृष्टीला पडणाऱ्या बिबट्याने काल रात्री चक्क येथील बाजारपेठेतच एन्ट्री केल्याने ढेबेवाडीकरांचे टेन्शन वाढले आहे. येथील ग्रामीण रुग्णालयासमोरून बाजारपेठेत गेलेल्या रस्त्यावरून बिबट्याने मोकाट कुत्रे फरफटत नेल्याने भक्ष्याच्या शोधार्थ बिबट्या नागरी वस्तीत पोचल्याचे स्पष्ट झाले आहे. 

बिबट्याचे दर्शन, त्याचा मुक्त संचार आणि पाळीव प्राण्यांवरील त्याचे हल्ले ढेबेवाडी खोऱ्यातील दुर्गम गावात वास्तव्यास असलेल्या जनतेसाठी नवीन बाब नाही. अनेक वर्षांपासून तेथील जनता त्याच्या उपद्रवाचा सामना करत आहे. मात्र, अलीकडे हा उपद्रव सपाटीच्या गावासह नागरी वस्तीत वाढायला लागल्याने चिंतेचे वातावरण आहे. आतापर्यंत बिबट्याच्या संचाराबद्दल ऐकूनच असलेल्या ढेबेवाडीकरांनीही काल रात्री त्याच्या संचाराची अनुभूती घेतली. 

येथील बसस्थानक चौक, ग्रामीण रुग्णालय व पोलिस स्टेशनजवळून बाजारपेठेत जाण्यास रस्ते आहेत. रात्री उशिरापर्यंत त्यावर वाहनांची ये-जा असते. शुक्रवारी (ता. 19) रात्री साडेबाराच्या सुमारास भक्ष्याच्या शोधार्थ आलेल्या बिबट्याची ग्रामीण रुग्णालयासमोर एन्ट्री झाली. तेथील रस्त्यावर थांबलेल्या मोकाट कुत्र्यांना त्याचा सुगावा लागताच मोठमोठ्यांनी आरडाओरडा करत ती सैरावैरा धावू लागली. बिबट्याने त्यातील एका कुत्र्याला रस्त्याशेजारील बंद दुकानाजवळ गाठत डोंगराकडे फरफटत नेले. आरडाओरड्याने घराबाहेर आलेल्या नागरिकांना रस्त्याशेजारील दुकानांच्या पायऱ्यांवर मोठ्या प्रमाणात रक्त सांडल्याचे दिसून आले. सकाळी व्यवस्थित पाहणी केल्यानंतर डोंगराकडे गेलेल्या मार्गावर दूरपर्यंत रक्त सांडल्याचे आढळले. 

ढेबेवाडीलगत सुमारे दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगरातून बिबट्या तेथे आल्याचा अंदाज आहे. घनदाट झाडीने व्यापलेल्या डोंगरामध्ये अनेक वर्षांपासून बिबट्याच्या वास्तव्याची चर्चा असून अनेकदा डोंगरात चरण्यासाठी सोडलेल्या जनावरांवर त्याच्याकडून हल्ल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. मात्र, आता थेट बाजारपेठेतच बिबट्याची एन्ट्री झाल्याने घबराटीचे वातावरण आहे. घटना स्थळ परिसरात डांबरी व सिमेंट रस्ते असल्याने बिबट्याच्या पंजाचे ठसे दिसून आले नाहीत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com