पाटण तालुक्यात बिबट्या, रानडुकर, गव्यांकडून पिकांची नासाडी; शेतकऱ्यांवर आर्थिक संकट

जालिंदर सत्रे
Wednesday, 20 January 2021

वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या शेतीच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकटाचे सावट आहे.

पाटण (जि. सातारा) : वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या शेतीच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकटाचे सावट आहे. रानडुकरे ऊस, भुईमूग, हरभरा, ज्वारी, मका व रानगवे भात व गहू पिकांची नासाडी करत आहेत. पेरणी केलेल्या उन्हाळी भुईमुगाचे शेंगदाणे आता वानरांच्या टोळ्या उकरून खात असल्याने पाटणचा शेतकरी हवालदिल झाला आहे. 

बिबट्याची दहशत, अस्वलांचा माणसांवर हल्ला, रानडुकरांचा धुमाकूळ आणि गव्यांकडून पिकांची नासाडी हे दररोज कोणत्या तरी गावात घडत असते. मात्र, चार ते पाच वर्षांपासून इतर तालुक्‍यांतून आणून सोडलेली माकडे व वानरांनी शेतकऱ्यांची झोप उडवली आहे. जून-जुलैमध्ये ऊस, ऑगस्ट ते ऑक्‍टोबरमध्ये खरीप ज्वारी, भुईमूग व भात आणि जानेवारी ते जूनपर्यंत मका, गहू या पिकांचे वन्यप्राणी नुकसान करतात. रानगवे भातांच्या तरव्यातून नुसते फिरून गेले तरी भात लागणीला रोपे सापडत नाहीत. वन विभागाकडून मिळणारी नुकसानभरपाई निकषांच्या लालफितीत असल्याने शेतकऱ्यांच्या हातात काय पडते, हा संशोधनाचा विषय आहे.

पिलीव घाटात सातारा-पंढरपूर बसवर दगडफेक; दरोड्याच्या अफवेने सातारा-सोलापूर पोलिसांची पळापळ

तालुक्‍यात सध्या उन्हाळी भुईमुगाच्या पेरणीची रणधुमाळी सुरू आहे. अतिवृष्टीमुळे व लहरी मॉन्सूनमुळे खरीप हंगामातील भुईमूग पिकावर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे पाटणचा शेतकरी उन्हाळी भुईमुगाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतो. गेले 15 दिवस भुईमूग पेरणीत शेतकरी व्यस्त असलेला पाहावयास मिळत आहे. मात्र, पेरणी केलेले शेंगदाणे वानरांच्या टोळ्या उकरून खात असल्याने नवीन संकट शेतकऱ्यांसमोर आहे. वानरांचा वन विभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. 

शेतकरी चिंताग्रस्त; बटाट्याच्या दरात घसरण सुरुच

पंचनामा करण्याचे आव्हान 

पेरणी केलेले शेंगदाणे वानरे वेचत असल्याने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. पेरणीचे बियाणे वानरांनी खाल्ले तर पंचनामा करण्याचे आव्हान वन विभागासमोर आहे. तो पंचनामा करायचा कसा, याचे निकष नाहीत. त्यामुळे नुकसानभरपाईच्या निकषात ते नुकसान बसवायचे कसे, हाच खरा प्रश्न आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News Damage To Agriculture Due To Wild Animals In Patan Taluka