पाटणात बिबट्याच्या डरकाळीने शेतकरी भयभीत; हल्ल्याच्या भीतीने शिवारात जाणे बंद

जालिंदर सत्रे
Sunday, 17 January 2021

गेल्या काही महिन्यांपासून मोरणा विभागात बिबट्याच्या वावरामुळे शेती आणि पूरक व्यवसाय अडचणीत सापडले आहेत.

पाटण (जि. सातारा) : तालुक्‍यातील मोरणा विभागातील नाटोशी, कुसरुंड, वाडीकोतावडे आणि आंब्रग येथे वारंवार बिबट्याचे दर्शन होत असून, त्याच्या डरकाळीने शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी शेतशिवारात जाणे बंद केल्यामुळे शेती, दुग्ध व्यवसाय आणि पशुपालन व्यवसाय अडचणीत सापडले आहेत.

मोरणा विभागातील नाटोशी, कुसरुंड, वाडीकोतावडे आणि आंब्रग ही सर्व गावे डोंगराच्या पायथ्याशी वसली आहेत. गावातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. या गावातील सर्व पाळीव जनावरे चरण्यासाठी डोंगरावर नेली जातात. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या विभागात बिबट्याच्या वावरामुळे शेती आणि पूरक व्यवसाय अडचणीत सापडले आहेत.

पाटणातील गावं होणार पाणीदार; गृहराज्यमंत्र्यांचे नद्यांवर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्याचे नियोजन

बिबट्याच्या अचानक हल्ल्याच्या भीतीमुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याचे दर्शन नित्याच्या झाल्याने ग्रामस्थांत भीती पसरली आहे, तसेच पाळीव प्राण्यांवर पाळत ठेवून बिबट्या वावरु लागल्याने नागरिकांनी बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News Farmers Scared In Patan Taluka Due To leopard