मुद्रांक विक्रेत्यांकडून सर्वसामान्यांना 'तोंड दाबून बुक्‍याचा मार'; स्टॅंपसाठी मारावे लागताहेत हेलपाटे

जालिंदर सत्रे
Friday, 22 January 2021

मुद्रांक विक्रेत्यांकडे मुद्रांकाचा स्टॉक किती आहे याबाबतचा फलक दिसत नाही; त्या आधारेच मनमानी चालली असून, त्याचा गोरगरीब जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

पाटण (जि. सातारा) : जमीन खरेदी-विक्रीच्या दस्त नोंदणीत येथील तहसील कार्यालयातील मुद्रांक विक्रेता व्यस्त असल्याचे चित्र आहे. दस्त नोंदणीच्या कामातून वेळ मिळाला, तरच सर्वसामान्य जनतेला बॅंक प्रकरणे, करारनामा, प्रतिज्ञापत्र, जातीच्या दाखल्यांसाठी लागणारे मुद्रांक देत असल्याने सर्वसामान्यांना दिवसभर ताटकळत किंवा तीन-तीन दिवस हेलपाटे मारावे लागत आहेत. मुद्रांक विक्रेत्यांना यामुळे कर्तव्याचा विसर पडल्याने हा प्रकार घडत असून, दुय्यम निबंधक कार्यालयही दखल घेत नसल्याने सामान्यांना वाली कोणी उरला नाही. 

येथे मुद्रांक विक्रेता व बॉंड रायटर अशा परवानाधारक मुद्रांक विक्रेत्यांची संख्या 12 आहे. दररोज दुय्यम निबंधक कार्यालय सकाळी व सायंकाळी एकूण मुद्रांकांचा हिशोब घेत असते. हा हिशोब कागदावरच पाहावयास मिळतो. मुद्रांक मिळाला नाही म्हणून कोणी तक्रार दाखल केली तर तात्पुरती तक्रारदाराची समजूत काढली जाते व पुन्हा मागचे पाढे पंच्चावन्नच पाहावयास मिळतात. दररोज अनेक जण बॅंक कर्ज प्रकरणे, करारनामा, प्रतीक्षापत्र, जातीच्या दाखल्यासाठी लागणारे मुद्रांक खरेदीसाठी येतात. आलेल्या गरजू माणसास लगेच मुद्रांक दिला, असे क्वचितच घडते. नाहीतर दुसऱ्याकडे घ्या, मला वेळ नाही, माझ्याकडचे संपलेत, दस्त करायला कोणाकडे जाता त्याच्याकडेच घ्या अशी साचेबंद उत्तरे मिळतात. कोणी कायदा सांगितला तर देणार नाही, कोणाकडे जायचे असेल तिकडे जा व तक्रार करा असा दम दिला जातो. एखादा जिद्दीला पेटला आणि दुय्यम निबंधकांकडे तक्रार करायला गेला, तर दुय्यम निबंधक तक्रारदाराची समजूत काढतात. 

Breaking News : उदयनराजेंसह 11 कार्यकर्ते निर्दाेष; वाई न्यायालयाच निर्वाळा

गेली अनेक वर्षे हा प्रकार चालला आहे. तातडीची गरज असणारे गरजू काम होणार नाही, कारण नसताना वाद कशाला म्हणून तोंड दाबून बुक्‍याचा मार सहन करीत आहेत. अशिक्षित व ओळख नसणारे दुर्गम भागातील ग्राहक आला, तर त्याने दिवसभर प्रत्येक मुद्रांक विक्रेत्यांच्या दारात जाऊन विनवण्या केल्या, तरी कोणाला पाझर फुटत नाही. दस्त नोंदणीत मिळणारा मलिदा महत्त्वाचा असल्याने त्यातून वेळ मिळाल्यानंतरच मुद्रांक विक्री होते. मुद्रांक विक्रेत्यांवर कोणाचाही वचक नसल्याने हा प्रकार राजरोस चालला आहे. मुद्रांक विक्रेत्यांकडे मुद्रांकाचा स्टॉक किती आहे याबाबतचा फलक दिसत नाही त्या आधारेच मनमानी चालली असून, त्याचा गोरगरीब जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दुय्यम निबंधक कार्यालयाने मुद्रांक विक्रेत्यांसाठी असणारी नियमावली अमलात आणावी, अशी मागणी जनतेतून होत आहे. 

सरकारी कर्मचाऱ्यांनाे! BSNLने तुमच्यासाठी आणलीय खास याेजना

मुद्रांक विक्रेते हे सामान्य ग्राहकाला मुद्रांक वेळेत देत नाहीत. दिला तरी दिवसभर ताटकळत ठेवतात. काही वयोवृद्धांना तीन- तीन दिवस हेलपाटे मारावे लागतात. तक्रार केली तर पांघरून घालण्याचा प्रकार घडतो. याचा अनुभव मला अनेक वेळा आला असून, सामान्य माणूस गरजेचा विचार करून शांत राहातो हे कुठे तरी थांबले पाहिजे.
-चंद्रकांत नलवडे, माजी सरपंच, अडुळपेठ

ग्राहकाला मुद्रांक विक्रेत्यांनी मागणीनुसार मुद्रांक देणे बंधनकारक आहे. याबाबत वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत. मुद्रांक स्टॉकबाबत माहिती फलकावर लिहिण्याबाबत वारंवार सूचना देऊनही पालन होत नसेल, तर कारवाई करण्यात येईल. 
-एस. पी. लादे, दुय्यम निबंधक, पाटण 

आहेर नको, रक्तदान करा! पुण्यातील आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्याची सर्वत्र चर्चा; माजी मंत्र्यांकडूनही कौतुक

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News Miss Management Of Register Office In Patan