प्रत्येकानं Family Planning केलं असतं, तर लशीचा तुटवडा झाला नसता; खासदार उदयनराजे

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News

सातारा : मी व्यापारी असतो तर जग इकडे तिकडे झाले असतं, तरी मी दुकान उघडे ठेवले असते. लॉकडाउनमुळे उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे लॉकडाउन हा पर्याय नाही. कोरोनाचा व्हायरस शनिवार, रविवारीच बाहेर येतो का, असा प्रश्‍न उपस्थित करून खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवार, रविवारच्या लॉकडाउनची खिल्ली उडवली. दरम्यान, प्रत्येकाने फॅमिली प्लॅनिंग केले असते, तर आज कोरोना लशीचा तुटवडा जाणवला नसता, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

व्यापाऱ्यांसोबतच्या बैठकीनंतर पत्रकारांशी उदयनराजेंनी संवाद साधला. ते म्हणाले, ""सध्या वातावरणात दोन मिलियनपेक्षा जास्त व्हायरस आहेत. आता कोरोना असला तरी प्रत्येकाने आपली प्रतिकारशक्ती वाढविली पाहिजे. लोकांनी पहिल्या लॉकडाउन वेळी ऐकले. आता लोकांची प्रशासनाचे ऐकण्याची मानसिकता राहिलेली नाही. व्यापाऱ्यांनी कामगारांचे पगार कसे भागवायचे, सणासुदीचे दिवस असून, कर्ज काढून व्यापाऱ्यांनी माल भरला आहे. उद्या बॅंका त्यांच्या हप्ते भरण्यासाठी मागे लागणार आहेत. त्यामुळे दुकानातील कामगारांच्या लसीकरणासाठी वयाची अट शिथिल करावी. हा निर्णय शासनाने घेतला पाहिजे. कामगारांना लस दिली तरी देखील दुकाने उघडण्यास परवानगी दिली जात नाही, मग कोण ऐकणार.'' शनिवार, रविवारी बंद ठेवताय कशाकरिता कोरोनाचा व्हायरस शनिवार, रविवारच बाहेर येतो का? असा प्रश्‍न उपस्थित करून ते म्हणाले, ""बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांपुढे आम्ही सर्व प्रश्‍न मांडले आहेत. 

आता व्यापाऱ्यांनी काय भूमिका घ्यायची.'' कोल्हापूरप्रमाणे होणार का, यावर उदयनराजे भडकले. ते म्हणाले, ""कोल्हापूर गेले खड्ड्यात, बाकीचे गेले खड्ड्यात. मला तसे म्हणायचे नाही; पण तुम्ही जिल्हे वेगवेगळे करू नका. तेथील परिस्थिती पाहा ती सुद्धा माणसे आहेत. त्यांनाही वेदना आहेत. त्याच वेदनांना येथील लोकांनाही सामोरे जावे लागत आहे. कोणीही गॅरंटी देऊ शकत नाही. त्यामुळे दक्षता घ्या. मृत्यूचे प्रमाण पाहता प्रत्येकाला उदंड आयुष्य लाभो. अशा माझ्या शुभेच्छा आहेत.'' 

प्रत्येकाने लस घ्यावी; पण प्रत्येकाने फॅमिली प्लॅनिंग केले असते तर आज ही परिस्थिती निर्माण झाली असती का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. लशीच्या पुरवठ्यासाठी मी आरोग्यमंत्री व मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे, असे त्यांनी सांगितले. सातारा पालिकेची निवडणूक लवकर घ्या म्हणजे कोरोना निघून जाईल, असे तुम्हाला वाटते का, असा प्रश्न करताच उदयनराजे म्हणाले, ""तुम्ही मला कोरोनाची उपमा देताय का, असे म्हणताच एकच हशा पिकला. भिडे गुरुजींच्या वक्तव्यावर उदयनराजेंना विचारले असता ते म्हणाले, ""माझे प्रश्‍न मला विचारा, कोण काय म्हणाले ते मला विचारू नका. ते ज्या अँगलने बोलले त्यांनाच माहिती आहे. हवे तर मी त्यांच्याशी चर्चा करूनच बोलीन.'' 

लोकसंख्येच्या क्षमतेप्रमाणे लस द्यावी 

कोरोना लशीच्या तुटवड्यावर उदयनराजेंना छेडले असता ते म्हणाले, ""आपल्या देशाची लोकसंख्या जास्त आहे. महाराष्ट्राला जास्त दिले आणि कुठल्या राज्याला कमी दिले जाते, हा वाद निर्माण करू नका. महाराष्ट्राला जास्त कशाला मिळाले पाहिजे. प्रत्येक राज्याच्या लोकसंख्येच्या क्षमतेप्रमाणे लस दिली पाहिजे. व्हायरस कोणत्या कालावधीत फिरतो, कोणत्या कालावधीत झोपलेला असतो, असे म्हणता येत नाही.'' 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com