कऱ्हाडात स्टॅंडशेजारीच वडापचा ठिय्या; नियम पायदळी तुडवत प्रवाशांची खुली ने-आण

हेमंत पवार
Monday, 1 March 2021

कऱ्हाडात एसटीच्या प्रवासी वाहतुकीवर परिणाम होत असून, वडाप व्यावसायिकांचे फावते आहे.

कऱ्हाड (जि. सातारा) : एसटी बस स्थानकाशेजारीच वडापचा ठिय्या सुरू झाला आहे. बस स्थानकापासून 200 मीटर अंतरावर प्रवासी वाहतुकीची अन्य वाहने थांबवू नयेत, असा नियम असतानाही तो पायदळी तुडवून वडापची प्रवासी वाहतूक सुरू आहे. त्याकडे आरटीओ, पोलिसांनीही दुर्लक्ष केल्यामुळे त्यांचे फावते आहे. त्याचा परिणाम एसटीच्या प्रवासी वाहतुकीवर होत आहे. 

येथील एसटी बस स्थानकाशेजारी सातत्याने प्रवासी वाहतुकीच्या वाहनांचा गराडा पडलेला असतो. सकाळी आणि संध्याकाळी तर या वाहनांमुळे अनेकदा वाहतूक कोंडी होत असते. अलीकडे पालिकेने पोलिसांच्या मागणीवरून सिग्नल व्यवस्था कार्यरत केलेली आहे. त्यामुळे वाहतुकीला शिस्त लागली आहे. मात्र, प्रवासी वाहतुकीची वाहने या सिग्नलजवळच थांबवली जात आहेत. त्यामुळेही वाहतूक विस्कळित होत आहे. त्याकडे सर्वांचे दुर्लक्ष होत आहे. त्याचबरोबर प्रवाशी वाहतुकीची वाहने एसटी बस स्थानकापासून सुमारे 200 मीटर थांबवण्यात येऊ नयेत, प्रवासी वाहतूक त्या परिसरात करण्यात येऊ नये असे नियम परिवहन विभागाचे आहेत. मात्र, या नियमांचे पालनच केले जात नाही. बस स्थानकाच्या बाहेरच वडापची वाहने लावली जात आहेत. त्याकडे आरटीओ आणि पोलिसांचेही दुर्लक्ष होत आहे. 

हे पण वाचा- Breaking News : अपहरण प्रकरणी सेनेच्या नेत्यावर गुन्हा दाखल

त्यामुळे एसटीच्या प्रवासी वाहतुकीवर परिणाम होत असून, वडाप व्यावसायिकांचे फावते आहे. त्याचा विचार करून आतातरी आरटीओ आणि पोलिसांनी पावले उचलण्याची गरज आहे. अनेकदा वडापची वाहने रस्त्यावरच लावलेली असतात. त्या वाहनांजवळून इतर दुचाकी आणि चारचाकी वाहने नेत असतानाही त्यांना त्यांची वाहने मागे-पुढे घ्यायला सांगितले तर वडापवाले ती घेत नाहीत. उलट सर्वसामान्य वाहनधारकांनाच अरेरावी करून सुनावतात. त्यांना आता कायदा काय सांगतो, हे पोलिस आणि आरटीओ यांनी सांगण्याची गरज आहे. 

हे ही वाचा- सोसायटी ठरावावरून राडा; राजकारणातील गुन्हेगारी मोडण्यात प्रशासन कुचकामी

एसटी बस स्थानकाच्या 200 मीटर परिसरातून प्रवासी वाहतूक करू नये, असे नियम आहेत. त्यासंदर्भात पोलिस व आरटीओ यांना यापूर्वी पत्रे दिली आहेत. यापुढेही पाठपुरावा केला जाईल.

-विजय मोरे, आगार व्यवस्थापक, कऱ्हाड 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News Parking Of Rickshaws Near ST Bus Stand At Karad