
खटाव महावितरण उपविभागात सुमारे 50 गावे येतात. या परिसरातील अनेक गावे डोंगर कपारीत आहेत. त्यासाठी झाडाझुडपातून विद्युत वाहिन्या नेण्यात आल्या आहेत.
खटाव (जि. सातारा) : खटाव महावितरण उपविभागाकडून वीज पुरवठ्यातील अडथळे दूर करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेक गावांत वीजपुरवठा सतत खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. जुने व कमी क्षमतेचे ट्रान्स्फॉर्मर, गंजलेले खांब, लोंबकाळणाऱ्या वीज वाहिन्या व झाडांच्या फांद्यामुळे वीजपुरवठ्यात अडथळे निर्माण होत आहेत. दरम्यान, अपुरे कर्मचाऱ्यांमुळे मंडळाकडे तक्रारी करूनही त्यावर कार्यवाही होत नाही.
खटाव महावितरण उपविभागात सुमारे 50 गावे येतात. या परिसरातील अनेक गावे डोंगर कपारीत आहेत. त्यासाठी झाडाझुडपातून विद्युत वाहिन्या नेण्यात आल्या आहेत. अनेक गावांमध्ये लोखंडी खांब गंजले असूनही बदलण्यात आले नाहीत. काही ठिकाणी वाकलेले खांब कोणत्याही क्षणी पडण्याच्या स्थितीत आहेत. विद्युत वाहिन्याही जुन्या झाल्याने वारंवार तुटण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे जीवितहानी होण्याचा धोकाही वाढला आहे.
मेडिकल कॉलेजसाठी 495 कोटींचा निधी मंजूर; आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्याला यश
याबरोबरच अनेक गावांमध्ये अद्याप 30 ते 40 वर्षांपूर्वी बसवलेले कमी क्षमतेच्या ट्रान्स्फॉर्मरच नवीन कनेक्शन देण्यात येत आहेत. प्रमाणापेक्षा जास्त कनेक्शन असल्याने लोड येऊन ट्रान्स्फॉर्मर जळण्याचे प्रसंग घडत आहेत. येथील आण्णा भाऊ साठेनगरातील ट्रान्स्फॉर्मर दोन दिवसांपूर्वी जळाला. ग्रामपंचायतीने महावितरण विभागाकडे तक्रार केल्यानंतर दुसऱ्या दिवशी संबंधित कर्मचारी हजर झाले. त्यानंतर नवीन ट्रान्स्फॉर्मर वडूजवरून आणण्यासाठी ग्रामपंचायतीने वाहन उपलब्ध केले. ट्रान्स्फॉर्मर बसवल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.
राजू शेट्टी, सदाभाऊंची तब्बल 47 गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता; कऱ्हाड न्यायालयाचा निकाल
सहायक अभियंत्याची बदली
सहायक अभियंत्याची चार महिन्यांपूर्वी बदली झाली आहे. मात्र, अद्याप ही जागा भरली नाही. पुसेगाव विभागाच्या सहायक अभियंत्याकडे या परिसराची जबाबदारी देण्यात आली आहे. अनेक गावांतील शेतकरी व नागरिक तक्रारी घेऊन येतात. मात्र, त्या वेळी अधिकारी उपलब्ध नसल्याने त्यांना रिकाम्या हाताने परत फिरावे लागते.
संपादन : बाळकृष्ण मधाळे