esakal | माण तालुक्‍यात हातमोज्याने केली ज्वारीची काढणी; शेतकरी वर्ग सुगीत मग्न

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News}

माण तालुक्‍यात यावर्षी दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची रब्बी हंगामातील पिके जोमदार आली आहेत.

माण तालुक्‍यात हातमोज्याने केली ज्वारीची काढणी; शेतकरी वर्ग सुगीत मग्न
sakal_logo
By
विशाल गुंजवटे

बिजवडी (जि. सातारा) : माण तालुक्‍यात रब्बीतील ज्वारीचा हंगाम संपत आला असून, ज्वारी काढण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाल्याचे दिसून येते. मजूर वर्गाच्या कमतरतेमुळे, तसेच काढणीसाठी पैशांच्या भरमसाट मागणीमुळे ऐन कडक उन्हात शेतकरी ज्वारी काढण्यात मग्न झाल्याचे दिसते. त्यात यावर्षी ज्वारी काढणीसाठी आलेल्या हातमोज्यामुळे ज्वारी काढणी व डाळिंब छाटणीच्या कात्र्यांमुळे ज्वारीची खुडणी सोपी झाली आहे. 

माण तालुक्‍यात यावर्षी दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची रब्बी हंगामातील पिके जोमदार आली आहेत. प्रत्येक वर्षी ज्वारीची कणसे भरण्याच्या वेळी शेवटचे एखादे दुसरे पाणी मिळत नाही. त्यामुळे चांगला उतार मिळत नाही. मात्र, यावर्षी ज्वारीला वेळच्या वेळी पाणी मिळाल्याने पिके चांगली आली आहेत. कणसे दमदार आली असून, कडब्याची उंचीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मजूर वर्गाच्या तुटवड्यामुळे दरही वाढवलेत. मजूर व झालेला खर्च पाहता व त्यातून मिळणारे उत्पन्न पाहिले तर खर्च परवडेना झाल्याने सर्वसामान्य शेतकरी स्वत:च सकाळ, रात्रीच्या वेळी ज्वारी काढत आहे. जे शेतकरी सधन आहेत, त्यांनी मजुरांना ज्वारी काढणी, खुडणी, पेंडी बांधण्याचे काम दिले आहे. हे काम एकरी रक्कम घेऊनही दिले जाते. काही ठिकाणी जुन्या "इर्जिक' पद्धतीने एकमेकांना साहाय्य करून "वारंगुळा' पद्धतीने ज्वारी काढली जात आहे. ज्वारी काढणीनंतर त्यांना मांसाहारी, शाकाहारी जेवणाची मेजवानीही दिली जाते. या पद्धतीमध्ये तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. सकाळी व रात्री हे तरुण एकत्र येऊन ज्वारीची काढणी करतात. त्यानंतर संबंधित मालक या तरुणांना जेवणाची मेजवानी देतो. 

भुतेघरच्या शेतकऱ्याची सोशल मीडियावर धूम; कन्नड, भोजपुरी, पंजाबी, मराठी, हिंदी भाषांतील हजार गाण्यांना तुफान लाईकस्
 
उन्हाच्या तडाक्‍यात ज्वारी काढणे म्हणजे आगीबरोबर खेळण्यासारखे. त्याला पर्याय म्हणून शेतकरी वर्ग सकाळी- संध्याकाळी ज्वारी काढताना दिसून येतो. बहुतांश ठिकाणी वारंगुळा केलेल्या व उक्ती घेतलेल्या ज्वारीची काढणी रात्रीची केली जातेय. त्यामुळे सध्या तालुक्‍यात रात्रीस खेळ सुरू, असेच म्हणावे लागेत. एकूणच यावर्षी पिके जोमात आली आहेत. मात्र, मजूर वर्गाच्या तुटवड्यामुळे मजुरीच्या वाढत्या मागणीमुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे. ज्वारीप्रमाणेच कांद्याचीही तीच स्थिती असून, कांद्याला चांगला दर असल्याने काढणी व काटणीसाठी मजूर वर्गानीही आपलेही दर वाढवले आहेत. ग्रामीण भागात ज्वारी, कांद्याची सुगी जोरात चालली असून, त्यात शेतकरी वर्ग मग्न आहे. सुगीच्या या धामधुमीत वरचेवर ढगाळ वातावरण व पावसाच्या भीतीनेही शेतकऱ्यांची धांदल उडत आहे. 

महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या आखाड्यात खटावातील मल्ल ठोकणार शड्डू

ज्वारी काढायची म्हणजे अंगावर थरकाप येतो. जमीन जर कडक असेल तर ज्वारी ओढून हातांना फोड येतात. हात ढिला धरला तर ज्वारीचे ताट हाताला कापून हात रक्तबांबाळ होतो. मात्र, यावर्षी ज्वारी काढण्यासाठी हातमोजे आल्याने ज्वारी काढणी सोपी झाली आहे. 

-अरुण जाधव, जाधववाडी, ता. माण 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे