'मराठवाडी धरणग्रस्तांच्या विश्वासाला तडा घालवू नका'

राजेश पाटील
Saturday, 23 January 2021

मराठवाडी धरणांतर्गत मेंढ व ताईगडेवाडी येथील गावठाणाना सुनीती सु. र यांनी भेट देऊन प्रलंबित प्रश्नी धरणग्रस्तांशी संवाद साधला.

ढेबेवाडी (जि. सातारा) : मराठवाडी धरणग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नी प्रशासनाने सकारात्मक पाऊल टाकल्याने धरणग्रस्तांमध्ये पुनर्वसनाबाबत विश्वास वाढला आहे. त्याला तडा जाऊ न देण्याची काळजी संबंधित यंत्रणेने घ्यावी आणि पावसाळ्यापूर्वी धरणग्रस्तांचे निवारे उभे राहण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, असे आवाहन मराठवाडी धरणग्रस्त कृती समितीच्या मार्गदर्शक आणि जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयक सुनीती सु. र यांनी केले. 

मराठवाडी धरणांतर्गत मेंढ व ताईगडेवाडी येथील गावठाणाना सुनीती सु. र यांनी भेट देऊन प्रलंबित प्रश्नी धरणग्रस्तांशी संवाद साधला. कृती समितीचे अध्यक्ष सुनील मोहिते व अन्य धरणग्रस्त उपस्थित होते. चर्चेनंतर "सकाळ'शी बोलताना सुनीती सु. र म्हणाल्या, "ताईगडेवाडीतील धरणग्रस्तांच्या शेत जमिनीवरील अडथळा केसेसचा प्रश्न बऱ्यापैकी सुटत चालला असला, तरी तो पूर्ण सुटलेला नाही. नापीक व मुरमाड जमिनीबाबतही तत्काळ निर्णय व उपाययोजना कराव्यात, तसेच जमिनीऐवजी रोख रक्कम देण्याची कार्यवाहीही लवकर व्हावी, अशी अपेक्षा आहे. या गावठाणातील पाणीपुरवठ्याबाबतीत काही प्रश्न दुर्लक्षित आहेत. तेही मार्गी लागायला हवेत. 

पालकांच्या मागणीचा विचार न झाल्यास शाळेला टाळे ठोकू; कोपर्डे हवेलीत पोदार स्कूलसमोर निदर्शने

जिल्हाधिकारी शेखर सिंह, कार्यकारी अभियंता सुरेन हिरे व अन्य अधिकाऱ्यांचा धरणांतर्गत गावात नुकताच दौरा झाला आहे. मेंढ येथील गावठाणातील भूखंडाचा गुंता बऱ्यापैकी सुटल्याने धरणग्रस्तांमध्ये पुनर्वसनाबाबतचा विश्वास वाढला आहे. त्याला तडा जाऊ न देण्याची काळजी संबंधित यंत्रणेने घ्यावी आणि पावसाळ्यापूर्वी धरणग्रस्तांचे निवारे उभे राहण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. प्रशासनाला कार्यवाहीसाठी वेळेची मर्यादा देत आहोत, ती पाळली गेली नाही तर पुढचे पाऊल उचलावे लागेल.'' 

निवडणुकीसाठी 100 कोटी खर्च करू, तुम्हाला मंत्रीपद देऊ; भाजपची राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला ऑफर

प्रलंबित प्रश्नी प्रशासनाकडून विलंब झालेला असला, तरी आता त्यांनी टाकलेल्या सकारात्मक पावलाचे आम्ही स्वागत करतो आहोत. ज्या तडफेने त्यांनी निर्णय घेतलेले आहेत ते वेळेत पूर्णत्वाला न्यावेत. 
-सुनीती सु. र, जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयक 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News Suniti Interacted With The Citizens Regarding Marathwadi Dam