पुणे-कोल्हापूरला जोडणाऱ्या शेणोली-ताकारी रेल्वेचे काम युद्धपातळीवर; कामावर दिल्लीतून नजर

अमोल जाधव
Friday, 29 January 2021

गेल्या अनेक वर्षांपासून विजेवरील रेल्वे व दुहेरी मार्ग हे विषय चर्चेत होते. सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतून याबाबत मागणी होत होती. 2017 मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी प्राधान्याने लक्ष देत याकामी निधीची तरतूद केली.

रेठरे बुद्रुक (जि. सातारा) : पुणे-कोल्हापूर लोहमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम रेल्वे विभागाकडून सुरू आहे. शेणोली ते ताकारी या दरम्यान हे काम करताना कोणताही अडसर नसल्याने रेल्वे बोर्डाने या मार्गावर कामास गती दिली. रेल्वे विभागातील अभियंते व कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस केलेल्या मेहनतीतून हा मार्ग तयार झाला आहे. विद्युतीकरण काम चाचणीयोग्य ठरल्यानंतर विजेवरील रेल्वेचे टेस्टिंग करण्यात आले आहे. त्यामुळे पुणे-कोल्हापूर काम पूर्ण ठरण्यासाठी शेणोली ते ताकारी हा पायलट मार्ग बनला आहे, हे नक्की. 

गेल्या अनेक वर्षांपासून विजेवरील रेल्वे व दुहेरी मार्ग हे विषय चर्चेत होते. सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतून याबाबत मागणी होत होती. 2017 मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी प्राधान्याने लक्ष देत याकामी निधीची तरतूद केली. त्यानंतर रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ कामास प्रारंभ केला. कालमर्यादा ठरवून कामही सुरू केले. यास अनुसरून रेल्वेतील विद्युत व बांधकाम विभाग जोमाने कार्यरत बनला. यामधील विद्युतीकरणाचे काम गतीने सुरू झाले. 

काळ आला होता,पण वेळ आली नव्हती; सुसाट गव्याने दुचाकीस्वारास उडविल्यानंतरही युवकाचा वाचला जीव

भूसंपादन व इतर तांत्रिक बाबी लक्षात घेता रेल्वे बोर्डास शेणोली ते ताकारी मार्गावर कोणताच अडसर नसल्याने हे काम प्राधान्याने सुरू झाले. रेल्वेचा दुहेरी मार्ग करताना आवश्‍यक खोदाई, भराव व छोट्या पुलांची कामे पूर्ण झाली आहेत. मोठ्या क्षमतेचे ट्रान्स्फॉर्मर तसेच विद्युत खांबांची उभारणी करण्यात आलेली आहे. शेणोली, भवानीनगर व ताकारी स्थानकाची नव्याने बांधणी व सुविधा पूर्ण केल्या आहेत. या मार्गामुळे शेणोली रेल्वे स्थानकास नवी झळाळी आली आहे. संबंधित कामाचा दैनंदिन अहवाल "फिल्ड'वरील अभियंत्यांकडून थेट रेल्वे बोर्डाच्या दिल्ली येथील कार्यालयात पाठवला जात आहे. तेथून अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या कामावर थेट दिल्लीतून नजर असल्याचे दिसले. 

मी इथं बरा आहे शिवेंद्रसिंहराजे; बाळासाहेबांच्या विनंतीवर फलटणच्या राजेंनी केले ग्रेड सेपरेटरचे उद्‌घाटन

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News Work On Shenoli To Takari Railway Line Completed