सातारा : सहा हॉटेल चालकांवर गुन्हा दाखल; वाहनधारकांकडून 37 हजार 300 रुपयांचा दंड वसूल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जून 2020

आगामी काळातही कारवाई सुरू राहणार असून कोणीही विनाकारण कास पठार, ठोसेघर परिसरामध्ये फिरण्यासाठी येऊ नये, असे आवाहन पोलिस दलाकडून करण्यात आले आहे.
 

सातारा : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सातारा- कास रस्त्यावरील सहा हॉटेल चालकांवर सातारा तालुका पोलिस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणी विनाकारण कोणीही फिरण्यास येऊ नये, असे आदेश दिलेले असतानाही हा आदेश डावलून दुचाकी व चारचाकी वाहनातून येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पोलिसांनी वाहनधारकांवर कारवाई करण्यास प्रारंभ केला आहे.

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी हॉटेल चालकांना काही अटी शर्तीसह व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, सातारा- कास मार्गावरील हॉटेल किनारा, कास हिल रिसॉर्ट, ईगल, ऋणानुबंध, ब्ल्यू व्हॅली आणि स्वराज अशा सहा हॉटेल चालकांनी निर्धारित वेळेपेक्षा अधिक काळ हॉटेल सुरू ठेवले. संबंधित हॉटेलमध्ये ग्राहक जेवत असताना आढळून आले. त्यामुळे याप्रकरणी पोलिसांनी आकाश जालिंदर उंबरकर, शंकर राजाराम जांभळे, प्रताप प्रदीप गरुड, पंकज श्रीधर भागणे, संजय दत्तात्रय शिंदे, संदेश हणमंत सपकाळ या सहा जणांविरोधात सातारा तालुका पोलिस ठाण्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक सजन हंकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने ही कारवाई केली.

कास पठार परिसरात फिरण्यासाठी येणाऱ्या एकूण 147 वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये 72 वाहनांवर शनिवारी (ता.20) कारवाई करून 17 हजार 900 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच रविवारी कास परिसरात फिरायला जाणाऱ्या 75 वाहनांवर कारवाई करून तालुका पोलिसांनी 19 हजार 400 रुपये दंड वसूल केला आहे. 

पोलिस निरीक्षक सजन हंकारे यांच्या मार्गदर्शनाखाली कास पठार व परिसरात फिरण्याकरिता येणाऱ्या वाहनांविरुद्ध तालुका पोलिसांनी मोहीम राबविली. हवालदार सुहास पवार, रमेश शिखरे, किरण जगताप, विक्रम हासबे व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. या पुढेही अशीच कारवाई सुरू राहणार असून कोणीही विनाकारण कास पठार, ठोसेघर परिसरामध्ये फिरण्यासाठी येऊ नये, असे आवाहन पोलिस दलाकडून करण्यात आले आहे.

पाेलिसांच्या खिसे भरु प्रवृत्तीमुळे सातारकरांचा जीव टांगणीला; हॉटेल व्‍यवसायाला अच्‍छे दिन...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Police Filed Case Against Six Hotels From Kas Plateau Area