esakal | सातव्या राणीच्या कथित पुत्राने दाखविले "सात तारे'; व्यावसायिकाला सव्वा कोटीचा गंडा
sakal

बोलून बातमी शोधा

सातव्या राणीच्या कथित पुत्राने दाखविले "सात तारे'; व्यावसायिकाला सव्वा कोटीचा गंडा

मार्च 2018 पासून ते 15 नोव्हेंबर 2018 पर्यंत काळे झालेले पैसे स्वच्छ करून देतो, असे म्हणून वेळोवेळी पैशाची मागणी करून एक कोटी 27 लाख 46 हजार रुपयांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

सातव्या राणीच्या कथित पुत्राने दाखविले "सात तारे'; व्यावसायिकाला सव्वा कोटीचा गंडा

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : जमीन व्यवहारात पैसे गुंतवण्याचे आमिष दाखवून परदेशी भामट्यांनी सातारा शहरातील बांधकाम व्यावसायिकाला तब्बल सव्वा कोटीचा गंडा घातला आहे. या भामट्यांनी सहा कोटी भारतीय मूल्यांचे युरो चलन आणल्याचा बनाव करून केमिकलद्वारे प्रोसेस करून ते पैसे त्याच्या मूळ फॉर्ममध्ये आणण्याची बतावणी केली. त्याद्वारे त्यांनी बांधकाम व्यावसायिकाकडून वेळोवेळी पैसे उकळले.
 
याबाबत सचिन घनश्‍याम वाळवेकर यांनी सातारा शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोलोमन सिसो, पोटलाको थबांने, एडवर्थ स्मिथ, बेल्सन्स जॉर्ज, मॉरीस, जेम्स योयोबो (ईगेरे) मॉरीय गोल्डबन, मॉर्गन, सॅम, अल्फेड, डॉनियल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
वाळवेकर यांनी फिर्यादीत म्हटले की, 2018 च्या फेब्रुवारी महिन्याअखेर त्यांना प्रिन्स सोलोमन सिसो या व्यक्तीचा फोन आला. त्याने भारत व आफ्रिकन देशांमध्ये पंतप्रधान मोदींनी काही करार केले आहेत. त्यामुळे आम्ही भारतात गुंतवणुकीसाठी आलो असून, साताऱ्यामध्ये बांधकाम क्षेत्रात गुंतवणूक करायची असल्याचे सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्‍वास ठेऊन 2018 मध्ये संबंधित व्यक्ती व पोटलांको थबाने दोघे आले. त्यांनी लिसोथो या देशातील मसेरू येथील रहिवासी असल्याचे सांगितले. ते फिर्यादीला सातारा येथे भेटण्यास आले. सोलोमल हा तेथील राज्याच्या सातव्या राणीचा लहान मुलगा व थबाने हा माजी पंतप्रधानांचा मुलगा असल्याचे सांगितले. त्यांचे पासपोर्ट दाखवल्याने फिर्यादीने त्यांच्यावर विश्‍वास ठेवला. तिघांनी साताऱ्यातील सदरबझार व वाढे फाटा या ठिकाणी जागा पाहिल्या. या जागा पसंत करून प्रोजेक्‍ट रिपोर्ट तयार करण्याचे संशयितांनी फिर्यादी वाळवेकर यांना सांगितले. त्याप्रमाणे जागा व प्रोजेक्‍ट रिपोर्ट तयार करून त्यांना दाखविले. नंतर सदरबझार येथील एक जागा फायनल करण्यात आली.

शरद पवारांचा तो शब्द बाळासाहेबांनी पाळला! 

या वेळी त्यांना जे पैसे गुंतवायचे आहेत ते रोख रक्कम स्वरुपात असल्याचे सांगितले. हे पैसे प्रिन्स सोलोमनच्या वडिलांनी त्याच्यासाठी स्विस बॅंकेत सुरक्षित ठेवल्याचे सांगितले व त्यातील 24 कोटी भारतीय मूल्यांचे युरो त्यांनी गुंतवणुकीसाठी आणल्याचे सांगितले. त्यांनी स्विस बॅंकेचे पत्र व संबंधित कागदपत्रेही दाखविली. गुंतवणुकीतील 40 टक्के फायदा वाळवेकरांना देण्याबाबतचे करारपत्र देखील त्यांनी आणले होते. त्यानंतर पैसे आणण्यासाठी ते परत मुंबईला गेले. 10 मार्च 2018 मध्ये परत सातारा येथे आले. येताना सोबत एक पेटी घेऊन आले. त्या पेटीमध्ये सहा कोटी भारतीय मूल्यांचे युरो असल्याचे त्यांनी संगितले. प्रत्यक्षात दाखवताना त्यांनी त्यातील खाकी पेपर दाखवले. हे पेपर हे युरो असल्याचे स्विस बॅंकेचे पत्र दाखवले. जगभरातील राजे राजवाडे तसेच मोठे राजकीय व्यक्ती याच प्रकारे पैशांची देवाण- घेवाण करतात, असे पत्र होते. ट्रान्सपोर्टेशनसाठी त्याचा फॉर्म बदललेला असतो व एका विशिष्ट प्रोसेस व केमिकलद्वारे ते पैसे त्याच्या मूळ फॉर्ममध्ये येतात असे सांगितले. त्यासाठी दोन खाकी कागदांमध्ये (प्रोसेस्ड युरो) ओरिजनल युरो टाकल्यानंतर त्याला केमिकलने काळे करून दोन तास तसेच ठेऊन नंतर दुसऱ्या एका विशिष्ट केमिकलने स्वच्छ करून ते युरो फिर्यादीला दाखवले. 

आरक्षण लागू होईपर्यंत मराठ्यांसाठी या १० योजना सुरु करा, उदयनराजेंची मागणी

त्यानंतर त्या प्रोसेसला एक कोटीचे भारतीय मूल्यांचे युरो लागणार असल्याचे सांगितले. त्यांनी ती पेटी फिर्यादीकडे ठेवली व जाताना 50 हजार रोख घेऊन गेले. त्यानंतर बऱ्याचवेळी त्यांनी पैसे तयार करण्याबाबत फोन केला. त्यांना मुंबईला भेटण्यासाठी हॉटेल ताजमध्ये बोलविले. तेथे त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगून विश्‍वास संपादन केला. त्यामुळे फिर्यादीने मार्च 2018 मध्ये 45 लाखांची जमवाजमव केली व मेव्हणे सुशील क्षत्रीय यांच्यासह 26 मार्च 2018 रोजी मुंबईत ताज हॉटेल परिसरातील फॉरेन एक्‍स्चेंज ऑफिसमध्ये गेले. तेथे 500 चे युरो 110 नग घेतले. तेव्हा फिर्यादीने दोघांना एक लाख दिले व 27 मार्च 2018 रोजी चौघे जण सातारा येथे आले. त्या दोघांनी फिर्यादीकडील पेटीतील 110 खाकी कागद काढले व ते एका बादलीमध्ये टाकले व त्यावर तपकिरी रंगाचे केमिकल टाकले व थोड्या वेळाने ते सर्व खाकी पेपर बाहेर काढून सतरंजीवर वाळत ठेवले. नंतर दोन खाकी कागदांमध्ये फिर्यादीजवळ असलेला ओरिजनल 500 चा एक युरो असे त्याचे जवळचा असलेला खाकी कागद असे एकामागे एक असे एकत्रित केले व तो तयार झालेला बंडल काळ्या पोलिथिनच्या पिशवीत काळ्या स्टील ग्रिपचा टेप लावून बंडल तयार केला व तो बंडल त्याच पेटीत टाकून पेटी फिर्यादीकडे दिली. दुसऱ्या दिवशी ते युरो केमिकलने साफ करण्याचे आश्‍वासन दिले व ते दोघे मुक्कामी हॉटेल महाराजा सातारा येथे थांबले. दुसऱ्या दिवशी सकाळी साधारण सकाळी 7 ते 8 च्या दरम्यान सोलोमनने फोनवरून सांगितले, की युरो साफ करायचे केमिकल उडून गेले आहे व ते ब्रिटनच्या नवी दिल्ली येथील दुतावासातून आणण्यासाठी आम्ही दोघे दिल्लीला जात आहे. 

शिवेंद्रसिंहराजेंवर बरसले पवार! 

केमिकलसाठी पैसे लागतील, असे सांगून संबंधित व्यक्तीचे नाव व खाते क्रमांक पाठवले. त्यामध्ये 30 मार्च 2018 रोजी वाळवेकर यांनी प्रतापगंज पेठ येथून एटीएम मशिनद्वारे साकीर अली खाते (नोएडा) याच्या खात्यावर 48 हजार व एक एप्रिल 2018 मध्ये त्याच खात्यात दोन लाख दोन हजार पाठविले. त्याचदिवशी रोजी एका खात्यात 64 हजार पाठविले. त्याच खात्यात पाच एप्रिल 18 रोजी एक लाख पाच हजार व सात एप्रिल 2018 रोजी एक लाख पाच हजार रुपये पाठविले. 13 एप्रिलला नदीम खानच्या दिल्लीतील खात्यात आरटीजीएसने दोन लाख पाठवले व रोख स्वरूपात दोन लाख एटीएम मशिनद्वारे पाठविले. नंतर 24 एप्रिल 2018 रोजी रविकुमार एंटरप्रायझेसच्या विभूतीखंड लखनऊ येथील खात्यात 49 हजार 500 पाठविले. नंतर 25 एप्रिल 2018 मध्ये सूरज शिंदेच्या खात्यात एक लाख 50 हजार पाचशे रुपये पाठविले. 26 एप्रिल 2018 ला आशिफ खानच्या पंजाब नॅशनल बॅंक सरिता विहार दिल्लीचे खातेवर एक लाख 60 हजार रुपये पाठविले. 21 मे 2018 ला रिया एंटरप्रायझेस कोटक बॅंक गुडगाव खाते क्र. 6711947016 वर अडीच लाख रुपये पाठविले. हे सर्व पैसे हे सोसोमन आणि थबाने यांनी केमिकल आणण्यासाठी वरील सर्व केमिकल एजंट असल्याचे सांगून एक-एक कारणे सांगून घेतले.

जलसंपदाचा कुटील डाव श्रमिक मुक्ती दल हाणून पाडणार : डॉ. भारत पाटणकर
 
सोलोमन फसवत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला पैसे देणे बंद केले. त्यानंतर केमिकल शोधण्यासाठी फिर्यादीने इंटरनेटवर सर्च केला व एडवर्ड स्मिथ कंपनीकडे संपर्क केला. स्मिथ यानेही मॉरिस आणि जॉर्ज या सहकाऱ्यासंह दहिसर रेल्वे स्टेशनवर भेटलो असता त्यांना मी माझे सोबत घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर जॉर्जने फिर्यादीच्या सातारा येथे घरी येऊन नोटांवरती पावडर व केमिकल टाकले. आणखी एक लिटर 30 लाखांचे केमिकल लागेल, असे सांगितले. या बहाण्याने त्यांची त्याच पद्धतीने पुन्हा फसवणूक केली.

लायन्स क्लब सातारा एमआयडीसीचे 12 ऑक्सिजन मशीन कार्यरत

यानंतर वेळोवेळी युरोचे काळे झालेले पैसे परत स्वच्छ करून देतो, अशी बतावणी करून सोलोमन सिसो, पोटलाको थबांने, एडवर्थ स्मिथ, बेल्सन्स जॉर्ज, मॉरिस, जेम्स योयोबो (ईगेरे) मॉरीय गोल्डबन, मॉर्गन, सॅम, अल्फेड, डॉनियल यांनी मार्च 2018 पासून ते 15 नोव्हेंबर 2018 पर्यंत काळे झालेले पैसे स्वच्छ करून देतो, असे म्हणून वेळोवेळी पैशाची मागणी करून एक कोटी 27 लाख 46 हजार रुपयांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Edited By : Siddharth Latkar 

loading image