कुडाळ, पाचगणी, वाई पंचायतींसाठी चुरशीने मतदान; सोमवारी फैसला

Satara Latest Marathi News, Satara News
Satara Latest Marathi News, Satara News

कुडाळ (जि. सातारा) : कुडाळ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी अत्यंत चुरशीने 74 टक्के मतदान झाले. 15 जागांसाठी एकूण 44 उमेदवार रिंगणात उतरल्याने या वेळची निवडणूक तिरंगी झाली होती. या निवडणुकीसाठी अनेक दिग्गजांचे राजकीय भविष्य पणाला लागल्याने तालुक्‍यात लक्षवेधी ठरली आहे. 

या निवडणुकीसाठी सत्ताधारी समर्थ पॅनेलचे नेतृत्व माजी सरंपच विरेंद्र शिंदे (15 उमेदवार), रयत पॅनेलचे नेतृत्व उपसभापती सौरभ शिंदे (15 उमेदवार) व कुडाळ बहुजन विकास आघाडीचे नेतृत्व हेमंत शिंदे (14 उमेदवार) असे एकूण 44 उमेदवार आपले नशीब अजमावत होते. एकूण 5191 मतदानांपैकी 3796 एवढे मतदान आज झाले. सकाळी सात वाजता पाचही वॉर्डसाठी मतदानास सुरवात झाली. सकाळपासूनच मतदारांनी मतदानासाठी उत्साह दिसून येत होता. त्यामुळे मतदानासाठी रांगाही लागल्या होत्या. सहायक पोलिस निरीक्षक अमोल माने यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. 

भिलार : भिलारसह पाचगणी विभागातील सर्व ग्रामपंचायतींसाठी काल चुरशीने 78.60 टक्के मतदान झाले. पुस्तकांच्या गावाच्या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. या ठिकाणी तीन जागा बिनविरोध आल्याने अंशतः मतदान झाले. सरळ सरळ दोन पॅनेलमध्ये दुरंगी झालेल्या लढतीत 83.74 टक्के मतदान झाले. दांडेघरमध्ये अंशतः झालेल्या निवडणुकीत वॉर्ड 1 मध्ये 180, तर वॉर्ड 3 मध्ये 247 मतदान झाले. गोडवलीमध्ये झालेल्या दोन वॉर्डांतील निवडणुकीत वॉर्ड 1 मध्ये 287, तर वॉर्ड 2 मध्ये 197 मतदान झाले. आंब्रळमध्ये वॉर्ड 1 मध्ये 177, वॉर्ड 2 मध्ये 150, तर वॉर्ड 3 मध्ये 184 मतदान झाले. काटवली येथे एका जागेसाठी 112 मतदान झाले. राजपुरीमध्ये वॉर्ड 1 मध्ये 217, तर वॉर्ड 3 मध्ये 165 मतदान झाले. याच पद्धतीने कासवंड, दानवली, खिंगर याठिकाणी चुरशीने मतदान झाले. कुठेही अनुचित प्रकार घडला नसल्याचे सहायक पोलिस निरीक्षक सतीश पवार यांनी सांगितले. 

वाईत 81.62 टक्के मतदान 

वाई : तालुक्‍यातील 57 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सरासरी 81.62 टक्के मतदान झाले. स्थानिक पातळीवरील किरकोळ वाद वगळता सर्वत्र शांततेत मतदान झाले. तालुक्‍यातील 76 पैकी 19 ग्रामपंचायती यापूर्वीच बिनविरोध झाल्या. उर्वरित 57 ग्रामपंचायतींसाठी आज 249 मतदान केंद्रावर मतदान झाले. बावधन, केंजळ, चांदक, शेंदूरजणे, सुरूर, ओझर्डे, सटालेवाडी, देगाव, उडतारे 83.39 टक्के, पसरणी, गुळुंब, धोम, आसले या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या व संवेदनशील अशा ग्रामपंचायतींत स्थानिक पातळीवरील सत्तारूढ व विरोधी अशा पॅनेलमध्ये अत्यंत चुरस होती. सर्व ठिकाणी दुरंगी, तर काही ठिकाणी तिरंगी लढतीचे चित्र होते.

सकाळपासूनच अनेक केंद्रांवर मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. युवक आणि महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसत होता. दुपारी साडेतीन पर्यत 69.94 टक्के मतदान झाले होते. सायंकाळी साडेपाच वाजता 81.62 टक्के मतदान झाले. या वेळी एकूण 67 हजार 718 पैकी 55 हजार 273 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याची माहिती तहसीलदार रणजित भोसले यांनी दिली. रात्री उशिरापर्यंत मतदान यंत्रणा जमा करण्याचे काम सुरू होते. मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडली. प्रत्येक गावात पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com