esakal | वाह, क्या बात है! ट्रकमालकांच्या गावात पती-पत्नी बिनविरोध; ग्रामस्थांनी पाडला वेगळा पायंडा
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News Satara Politics News

ग्रामस्थांनी निवडणूक बिनविरोध करून वेगळा पायंडा पाडला असून यामुळे गावात एकी वाढणार आहे.

वाह, क्या बात है! ट्रकमालकांच्या गावात पती-पत्नी बिनविरोध; ग्रामस्थांनी पाडला वेगळा पायंडा

sakal_logo
By
संदीप गाडवे

केळघर (जि. सातारा) : ट्रकमालकांचे गाव म्हणून जिल्हाभरात व जावळी तालुक्‍यात सुपरिचित असलेल्या डांगरेघर ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली. विशेष म्हणजे ग्रामपंचायतीच्या या निवडणुकीत अमोल आंग्रे व कोमल आंग्रे हे पती-पत्नी बिनविरोध निवडून आले. पती-पत्नीला बिनविरोध निवडून देऊन गावकऱ्यांनी एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

ग्रामपंचायतीची निवडणूक म्हटले की, ही निवडणूक भावकीवर लढवली जाते. निवडणूक लागली की गावातील ग्रामस्थांचे मन कलुषित होते व गावातील एकीचे व शांततेचे वातावरण नाहिसे होते. मात्र, डांगरेघर ग्रामस्थांनी एकत्र येऊन विचारविनिमय करून गावाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले. ग्रामस्थांच्या व वडीलधाऱ्या मंडळींचा मान राखून निवडणूक बिनविरोध करण्यात आली. या निवडणुकीत सदस्य म्हणून कोमल आंग्रे, रूपाली सुर्वे, शांताराम सुर्वे, अमोल आंग्रे, सुमन सुर्वे यांची निवड झाली आहे. त्यातील अमोल आंग्रे व कोमल आंग्रे हे पती-पत्नी आहेत. डांगरेघर गावाने एकीच्या जोरावर आतापर्यंत विविध शासकीय योजनांमध्ये सहभागी होऊन उल्लेखनीय यश मिळवले आहे. 

आधी बायकोला प्रेमानं शेवटचं Hug, मग दिलं लोकलमधून ढकलून

ग्रामस्थांनी निवडणूक बिनविरोध करून वेगळा पायंडा पाडला असून यामुळे गावात एकी वाढणार असून त्याचा फायदा गावच्या विकासासाठी होणार आहे. नवनिर्वाचित पती-पत्नी असलेल्या ग्रामपंचायत सदस्यांकडून गावची विकासकामे मार्गी लागून गावाचा सर्वांगीण विकास व्हावा, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. केळघर विभागातील केडंबे, बोंडारवाडी, भुतेघर, आंबेघर तर्फ मेढा, डांगरेघर, मुकवली, रेंगडीवाडी, वरोशी, गवडी या ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यामुळे या गावांतील ग्रामस्थांचे कौतुक होत आहे.

साताऱ्याचा नादच खुळा! धडधडत्या छातीवर हात ठेऊया, शत्रूला मात देऊया... प्रिया बेर्डेंचा ग्रामपंचायतसाठी धमाकेदार प्रचार  

खरे तर महिला राजकारणात पुढे येत नाहीत. मात्र, गावातील ग्रामस्थांनी आग्रह केल्याने पत्नी व मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आलो. ग्रामस्थांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही दोघेही गावाच्या विकासासाठी कायम कार्यरत राहू. 
-अमोल आंग्रे, ग्रामपंचायत सदस्य, डांगरेघर (ता. जावळी) 

संपादन : बाळकृष्ण मधाळे