काेराेनाबराेबरच सातारा जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पावसाचे थैमान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काेराेनाबराेबरच सातारा जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पावसाचे थैमान

वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने कृष्णा काठावरील अनेक गावांत हजेरी लावली. वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडाले. काही ठिकाणी वृक्ष, छाेटी झाडे उन्मळून पडली.

काेराेनाबराेबरच सातारा जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पावसाचे थैमान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड ः जिल्ह्यात रविवारी सकाळपासून मॉन्सूनपूर्व पावसाने चांगली हजेरी लावली. त्यापूर्वी आलेल्या वादळी वाऱ्याने सातारा शहरासह कऱ्हाड, कोरेगाव तालुक्‍यांत या पावसाने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. तर घरांवरील पत्रे उडाल्याच्या घटना घडल्या. दरम्यान, पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी तातडीने या घटनेची दखल घेत प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
 
सातारा शहरात दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. अर्धा तास झालेल्या पावसाने शहरवासीयांना काहीसा दिलासा मिळाला. तर कऱ्हाड तालुक्‍याच्या विविध भागात दुपारपासून पाऊस झाला. विजांच्या कडकडाटासह पडलेल्या पावसाने अनेकांची तारांबळ उडाली. शहरात दुपारी बारापासून पाऊस सुरू होता. कधी रिमझिम तर कधी मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्या. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने कृष्णा काठावरील अनेक गावांत हजेरी लावली. वादळी वाऱ्याने वडगाव हवेली परिसरात अनेकांचे नुकसानही केले. कालपासून उकाड्याने हैराण झालेल्या कऱ्हाडकरांवर दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पावसाचा शिडकावा झाला. त्यामुळे खरेदीला बाहेर पडणारांची तारांबळ उडाली. छोट्या विक्रेत्यांचीही गडबड झाली. 

रेठरे बुद्रुक ः वडगाव हवेली परिसरात दुपारी सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या वादळी पावसाने घराची पडझड तसेच घरावरील छताचे पत्रे उडून गेले. घरासमोर उभा केलेल्या ट्रॅक्‍टरवर झाड पडून लाखो रुपयांचे नुकसान झाले. अचानक हजेरी लावलेल्या या वादळी पावसाने शेतकरी वर्गाची दैना उडाली. ग्रामपंचायत तसेच तलाठी कार्यालयामार्फत झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत. दुपारी बाराच्या सुमारास सोसाट्याचे वारे सुटून वादळी पावसाने तडाखा दिला. वाऱ्यासह गारांचा वर्षाव होऊ लागला. साधारण अर्धा तास पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरणात निर्माण झाले. ऊस, हळद, भात पिकास हा पाऊस उपयुक्त ठरला असला, तरी प्रचंड वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्याने व पावसाने लाखो रुपयांचे नुकसान झाले. तेथील महात्मा गांधी विद्यालय परिसरातील बाळू नदाफ यांच्या दुमजली घरावरील पत्रा वादळी वाऱ्यात उडून जावून घराजवळून जाणाऱ्या उच्च दाब वीज वाहिन्यांवर पडला. सुदैवाने यावेळी वीज पुरवठा खंडित असल्याने मोठा अनर्थ टळला. तसेच येथील वसंत रामचंद्र जगताप यांच्या राहत्या घरावरील पत्र्याचे छत उडून गेले तर शिवाजी जगताप यांचे पत्रा शेड वादळी वाऱ्यात उडून गेले. सिद्धनाथ मंदिर परिसरातील दीपक हिंदुराव साळुंखे यांच्या घरासमोर उभे असणाऱ्या दोन ट्रॅक्‍टरवर पिंपरणीचे मोठे झाड उन्मळून पडल्याने नुकसान झाले. वादळी पावसाच्या तडाख्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 

पंचनाम्याचे आदेश
 
कोरेगाव तालुक्‍यातील रहिमतपूर, वाठार किरोली, चोरगेवाडी, टकले आदी भागात आज दुपारी झालेल्या वादळी वाऱ्याने घरांचे पत्रे उडून गेल्याने अनेकांचे नुकसान झाले. पालकमंत्र्यांनी त्याची तातडीने दखल घेत कोरेगावच्या प्रांताधिकाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. कोरेगाव तालुक्‍यातील रहिमतपूर, वाठार किरोली, चोरगेवाडी, टकले आदी भागात आज दुपारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यात परिसरातील अनेक घरांचे पत्रे उडून लोकांचे संसार उघड्यावर आले. झाडे उन्मळून रस्तेही बंद झाले. त्यानंतर कोरेगावच्या प्रांताधिकारी कीर्ती नलावडे यांच्याशी संपर्क साधून मंत्री पाटील यांनी लोकांच्या नुकसानीच्या पंचनामे करण्याचे आदेश दिले. 

गिरिस्थानला झोडपले
 
महाबळेश्‍वर : मॉन्सूनपूर्व पावसाच्या सरींनी महाबळेश्‍वरकरांना चांगलेच झोडपून काढले. या मुसळधार पावसाने उकाडा कमी होऊन हवेत गारवा निर्माण झाला आहे. उकाड्याने हैराण झालेल्या महाबळेश्‍वरकरांना या पावसाने सुखद धक्का दिला. या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे दिसून येत आहे. आज सकाळपासूनच पारा चढला होता. उकाड्यामुळे महाबळेश्वरकर हैराण झाले होते. दुपारनंतर महाबळेश्वरमध्ये ढगांचे साम्राज्य पसरले. त्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास येथे पावसाने धुवाधार बॅटिंगला सुरवात केली. एक तासानंतर पावसाचे प्रमाण हळूहळू कमी झाले. तोपर्यंत वातावरणात चांगलाच अल्हाददायक गारवा निर्माण झाला होता. बाजारपेठेतील दुकाने उघडणारांची संख्या वाढत होती. त्यामुळे बाजारपेठेत स्थानिकांची खरेदीसाठी गर्दी झाली होती. मात्र, आजच्या पावसाने खरेदीसाठी आलेल्यांची तारांबळ उडविली. काही वेळातच संचारबंदीसारखे रस्ते मोकळे झाले. 

रहिमतपूरमध्ये थैमान
 
रहिमतपूर : येथील ज्युनियर कॉलेजच्या इमारतीत पुणे, मुंबई येथून आलेल्या परिसरातील 11 लोकांचे विलगीकरण करण्यात आले होते. परंतु, आज दुपारी बाराच्या सुमारास रहिमतपूर परिसरात गारा व विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाला सुरवात झाली. या पावसाने परिसराला झोडपून काढले. त्यात रहिमतपूरमधील अनेक घरांचे पत्रे उडाले. झाडांसह विजेचे खांब उन्मळून पडले. यामुळे वीज प्रवाह उशिरापर्यंत खंडित झाला होता. 
दरम्यान, पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, ऑर्टस कॉलेजच्या चार वर्गांचे पत्रे जोरदार वाऱ्याने आड्यासह दुसरीकडे जावून पडले. यात कॉलेजच्या इमारतीचे अंदाजे साडेतीन ते चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती कॉलेजच्या प्रशासनाने दिली. दरम्यान कॉलेजमधील तीन खोल्यांमधील शासनाच्या वतीने विलगीकरण कक्षात ठेवलेल्या 11 लोकांना कोणतीही इजा झाली नाही. त्यांचे तत्काळ अन्य खोल्यांमध्ये विलगीकरण करण्यात आले. आदर्श विद्यालयाच्या दोन खोल्यांवरही झाड पडल्याने नुकसान झाले. परिसरातील झाडे रस्त्यावर पडल्याने काही काळ वाहतूक विस्कळित झाली होती.

एकी हेच बळ : कर्‍हाडात अवघ्या दाेन तासांत शंभर युवक जमले

सातारा मिलिटरी कॅन्टीनबाबत महत्वाची बातमी

साताऱ्याच्या नगराध्यक्षांची 'या'साठी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितली परवानगी

'ताे" विषय काढला की कॉग्रेस आमदार पृथ्वीराज चव्हाण काहीच बाेलत नाहीत 

loading image
go to top