पाचगणीत कोरोनाबाधितांवर उपचार?

pachgani
pachgani

पाचगणी (जि. सातारा) : येथील बेल एअर सॅनिटोरियममध्ये महाबळेश्वर तालुक्‍याव्यतिरिक्त अन्य तालुक्‍यांतील कोरोनाबाधित रुग्ण दाखल करण्यात येणार असल्याच्या चर्चेमुळे नागरिकांमध्ये घबराट व असंतोष निर्माण झाला आहे. थंड हवेच्या या ठिकाणी अशा रुग्णांना ठेवण्याबाबत नागरिकांमध्ये संतापाचा सूर आहे. 

पाचगणी हे पर्यटनस्थळ व शैक्षणिक स्थळ असून या ठिकाणचे जनजीवन पूर्णतः येणाऱ्या पर्यटक व निवासी शाळांवर अवलंबून असल्याने पाचगणीत कोरोनाचा शिरकाव होऊ नये, याकरिता पाचगणीकरांनी पूर्णतः दक्षता घेत शहराच्या सुरक्षिततेकरिता सर्वांनी एकजूट दाखवली. काही दिवसांपूर्वी मुंबई येथून येथे दाखल झालेल्या महिलेचा मृत्यू कोरोनाने झाल्याचे निष्पन्न झाले. तिच्या सान्निध्यातील अन्य दोन जणांना लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने सर्वांचे धाबे दणाणले आणि शहरवासीयांनी 31 मेपर्यंत दिलेल्या जनता कर्फ्यूला नागरिकांनी पूर्ण पाठिंबा दिला. कोरोनाबाधितांची संख्या एकीकडे वाढत असतानाच आज रेड क्रॉस सोसायटीच्या येथील बेल एअर सॅनिटोरियम येथे मुंबई येथून दाखल झालेल्या कोरोनाबाधित रुग्ण येथे दाखल होणार असल्याची चर्चा सुरू झाली अन्‌ भीतीचे सावट गडद होऊ लागले आहे. 

वाई येथून आज सकाळपासून रुग्णवाहिका "बेल एअर'कडे गेल्या असल्याची चर्चा सुरू झाल्याने नागरिक अधिक धास्तावले आहेत. याबाबत मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याबाबत सविस्तर माहिती नसल्याचे सांगत प्रांताधिकाऱ्यांशी चर्चा करून माहिती देते, असे आश्‍वासन दिले. दरम्यान, आपण प्रांताधिकारी यांच्याशी चर्चा केली असून जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचा हा निर्णय असल्याचे सांगण्यात आले. 

पाचगणीकरांत संतापाचा सूर 
पाचगणीतील वातावरण थंड आहे. पावसाळी हंगाम येऊन ठेपला आहे. सर्व जनजीवन विस्कळित झाले आहे. त्यातच असे रुग्ण दाखल झाले तर येथील नागरिकांच्या हिताचे काय? असा सवाल पाचगणीकरांना भेडसावू लागला असून प्रशासनाच्या या निर्णयासंबंधी संतापाचा सूर उमटत आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com