वनाधिकाऱ्यांकडून अपमान; ग्रामस्थांसह "महावितरण'चे अधिकारी कर्मचाऱ्यांत संताप

वनाधिकाऱ्यांकडून अपमान; ग्रामस्थांसह "महावितरण'चे अधिकारी कर्मचाऱ्यांत संताप

मायणी (जि. सातारा)  : वरिष्ठांकडून मिळणाऱ्या अपमानास्पद वागणुकीमुळे वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येचे प्रकरण ताजे असताना जिल्ह्यातील वन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने "महावितरण'च्या येथील अभियंत्यास अत्यंत अपमानास्पद वागणूक दिल्याची घटना घडली. त्याबाबत "महावितरण'चे अधिकारी व कर्मचारी संताप व्यक्त करत आहेत. 

याबाबतची माहिती अशी : येथील पक्षी अभयारण्यातील वनक्षेत्रास एक एप्रिल रोजी आग लागली. वनकर्मचारी व नागरिकांनी एकत्रित प्रयत्न करून ती विझविली. तरीही एक हेक्‍टरवरील वनसंपदा जळून खाक झाली. "महावितरण'च्या हलगर्जीपणामुळे शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याचा दावा करत वन विभागाने हात झटकले. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे सहायक वनसंरक्षक एस. बी. चव्हाण हे चौकशीसाठी येथे आले. त्यांनी येथील "महावितरण'चे सहायक उपअभियंता विशाल नाटकर यांना चौकशीसाठी वन विभागाच्या कार्यालयात बोलावून घेतले. त्यावेळी खटावच्या वनक्षेत्रपाल फुंदे, वनरक्षक संजीवनी खाडे व काही पत्रकारही उपस्थित होते. 

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बेलवडे हवेलीतील युवक ठार

चौकशीदरम्यान श्री. नाटकर हे खुर्चीवर बसलेले असताना त्यांना स्टॅन्ड अप...स्टॅन्ड अप म्हणून उठविण्यात आले. बाजूला उभे राहण्यास सांगून ती खुर्ची फुंदेंना दिली. आवाज चढवत त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. यावेळी श्री. नाटकर यांना त्यांच्या वरिष्ठांचा आलेला फोनही घेऊ दिला नाही. फोन कट करण्यास लावून आधी चर्चा करा, लेखी स्टेटमेंट द्या, अन्यथा अटक होईल, अशी तंबी दिली. या अपमानास्पद वागणुकीमुळे श्री. नाटकर अस्वस्थ झाले. मात्र, उलटसुलट न बोलता त्यांनी स्वतःला सावरले. "महावितरण'च्या हलगर्जीपणामुळे आग लागून नुकसान झाल्याने नुकसान भरपाईसंबंधी तातडीने खुलासा करावा, अशा आशयाचे पत्रही फुंदे यांनी दिले. मात्र, आधीच आपण तसे पत्र दिल्याचे फुंदे यांनी खोटेच सांगितले. दरम्यान, महावितरण व वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे परस्परांशी बोलणे होऊन कायदेशीर मार्गाने पुढील कार्यवाही करण्याचे ठरले. त्यानंतर श्री. नाटकर यांना जाऊ देण्यात आले. 

दरम्यान, सुमारे15 गावांतील लोकांना चांगली सेवा देणाऱ्या येथील शाखा अभियंता श्री. नाटकर यांना अपमानास्पद वागणूक दिल्याची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरल्यामुळे नागरिकांसह "महावितरण'च्या कर्मचाऱ्यांनीही संताप व्यक्त करीत वन अधिकाऱ्यांचा निषेध केला. 


""मी सुद्धा एक अधिकारी आहे. दुसऱ्या खात्यातील अधिकाऱ्याशी कसे बोलावे, कसे वर्तन करावे, हे त्यांना ठाऊक नाही. त्यांची भाषा व दिलेली वागणूक बरोबर नव्हती. त्याबाबत मी कार्यकारी अभियंता वडूज यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.'' 

-विशाल नाटकर, शाखा अभियंता, महावितरण, मायणी 

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com