म्हसवडला ‘श्रीं’चा शाही विवाह सोहळा थाटात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

म्हसवडला ‘श्रीं’चा शाही विवाह सोहळा थाटात

म्हसवडला ‘श्रीं’चा शाही विवाह सोहळा थाटात

- सलाउद्दिन चोपदार

म्हसवड : लाखो भाविकांचे आराध्य व कुलदैवत श्री सिद्धनाथ- जोगेश्वरी यांचा शाही विवाह सोहळा तुलसी विवाहा दिवशी रात्री बारा वाजता सनई चौघडा मंगल वाद्यात पुरोहितांच्या मंत्रघोषात धार्मिक विधीपूर्वक पारंपरिक पद्धतीने हजारो भाविकांच्या उपस्थितीत थाटात झाला. कार्तिक शुद्ध प्रतिपदा दीपावली पाडवा ते मार्गशीर्ष प्रतिपदा देवदिवाळी दरम्यानच्या महिनाभर विविध धार्मिक उपक्रमाने ‘श्रीं’च्या शाही मंगल विवाह सोहळा पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. या विवाह सोहळ्याचा प्रारंभ दिवाळी पाडव्यादिवशी घटस्थापना, नवरात्रारंभ व ‘श्रीं’च्या हळदी समारंभाने झाला. तुलसी विवाहादिवशी सोमवारी (ता. १४) पहाटे साडेपाच वाजता मंदिराचे मुख्य पुजारी, सालकारी कृष्णाजी गुरव यांच्या हस्ते आरती करून मानकरी, सेवेकरी व नवरात्रकरींच्या उपस्थितीत ‘श्रीं’चे १२ दिवसांचे घट उठविण्यात आले.

हेही वाचा: हर्बल हुक्क्याला दिल्लीत परवानगी; वाचा काय म्हणालं हायकोर्ट?

‘श्रीं’चे घट उठविल्यानंतर १२ दिवसांच्या नवरात्राच्या उपवासाची सांगता होऊन उपवास सोडण्यात आले. या सोहळ्यासाठी पहाटेपासूनच भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती. विवाहासाठी श्री सिद्धनाथ हत्तीवरून गेले होते, अशी आख्यायिका असल्याने व मंदिरातील बाहेरच्या मंडपात सहा फूट लांब व साडेचार फूट उंचीचा अखंड पाषाणाचा हत्ती मूर्ती आहे. या मूर्तीची आकर्षक अशी सजावट करण्यात आली. त्यानंतर हत्तीवरील सुशोभित केलेल्या अंबारीवर सायंकाळी पाच वाजता श्री सिद्धनाथाची पंचधातूची उत्सव मूर्ती स्थानापन्न करण्यात आली. नारळाची तोरणे, फुलांच्या माळा, उसाच्या मोळ्या, भव्य अशा दोन दीपमाळा आणि आकर्षक अशी विद्युतरोषणाई यांनी संपूर्ण हत्ती मंडप सुरेख सजविण्यात आला होता. दिवसभर हत्ती मंडपाच्या मागील प्रांगणात या विवाह सोहळ्यानिमित्त गावोगावच्या भाविकांचा गजी- ढोलाचा कार्यक्रम अखंडपणे रात्री बारापर्यंत सुरू होता.

हेही वाचा: Champions Trophy पाकिस्तानात; टीम इंडिया खेळण्यास 'राजी' होणार?

रात्री साडेअकराच्या सुमारास हत्तीवरील अंबारीत स्थानापन्न केलेली ‘श्रीं’ची उत्सवमूर्ती सालकऱ्यांच्या छातीला बांधून मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात विवाह समारंभास नेण्यात आली. ही रणधुमाळी सुमारे अर्धा तास सुरू होती. शेवटी मोठी रस्सीखेच होऊन ‘श्रीं’ची मूर्ती गाभाऱ्यात जाताच वधू देवी जोगेश्वरी देवीच्या मूर्तीसमोर अंतरपाट धरून पारंपरिक पद्धतीने, विधीपूर्वक, पुरोहित पिंटू पाठक, प्रज्योत पाठक आदींनी सुरात मंगलाष्टका म्हणून अक्षदाच्या उधळणीत ‘श्रीं’चा शाही विवाहसोहळा रात्री १२ वाजता थाटात झाला. या विवाह सोहळ्यानिमित्त मंदिर शिखर दीपमाळा, मुख्य प्रवेशद्वार आकर्षक विद्युतरोषणाईने सुशोभित करून उजळण्यात आला होता. मंदिर परिसरात सनई- चौघडा, ढोल- ताशा, बँड, गजी झांज यांच्या जल्लोषात व फटाक्यांच्या आतषबाजी करण्यात आली.

या सोहळ्यास येथील न्यायालयाचे न्यायाधीश कोल्हापुरे, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष हरिभाऊ गुरव, उपाध्यक्ष महेश गुरव, सर्व विश्वस्त, सचिव दिलीप कीर्तने, नगराध्यक्ष भगतसिंह वीरकर, पृथ्वीराज व अजय, विजय राजेमाने, विलासराव माने यांच्यासह श्रींचे मानकरी, सेवेकरी, नवरात्रकरी, दिवट्यांचे मानकरी, मानाच्या करवल्या, गावातील प्रतिष्ठित नागरिक, पुरोहित, पुजारी मंडळीसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

loading image
go to top