हर्बल हुक्क्याला दिल्लीत परवानगी; वाचा काय म्हणालं हायकोर्ट? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हर्बल हुक्क्याला दिल्लीत परवानगी; वाचा काय म्हणालं हायकोर्ट?

हर्बल हुक्क्याला दिल्लीत परवानगी; वाचा काय म्हणालं हायकोर्ट?

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने आज राजधानी दिल्लीतील विविध पब आणि रेस्टॉरंटमध्ये हर्बल हुक्क्याच्या वापराला परवानगी दिली आहे. कोरोना नियमांचे कारण पुढे करत लोकांच्या रोजीरोटीवर गदा आणता येऊ शकत नाही, असे स्पष्ट मत न्यायालयाने आजच्या सुनावणीदरम्यान मांडले. विविध रेस्टॉरंट आणि बारच्या मालकांनी दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी घेताना न्या रेखा पल्ली यांनी हे निर्देश दिले.

हेही वाचा: 'मोदी सरकारला चीनकडून अपमानित व्हायला आवडते, त्याची सवय झालीय'

केवळ कोरोना संसर्गाचे कारण पुढे करत हे नियम कायमस्वरूपी चालू ठेवता येणार नाहीत. प्रशासनाने याआधीच सिनेमागृहे, जलतरण तलाव आणि कार्यक्रमासाठीच्या सभागृहांना परवानगी दिली असल्याचे न्या.पल्ली यांनी स्पष्ट केले. न्यायालयाने आज बार आणि रेस्टॉरंट चालकांना हा दिलासा देतानाच त्यांना कोरोना नियमांचे मात्र सक्तीने पालन करण्याचे निर्देश दिले.

न्यायमूर्ती रेखा पल्ली यांच्या एक सदस्यीय पीठीने रेस्टॉरंट तसेच बारकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सुनावणी करताना म्हटलंय की, जागतिक महासाथीच्या पार्श्वभूमीवर ही बंधने लादण्यात आली होती आणि ती कायमस्वरुपी ठेवली जाऊ शकत नाहीत. शहरात थिएटर्स आणि स्विमींग पूल्स आता पूर्ण क्षमतेने उघडले गेल्याचंही कोर्टाने नमूद केले आहे. याचिकेमध्ये 'हर्बल हुक्क्यांच्या' विक्रीवरील बंदी हटवण्याचा आग्रह केला होता.

कोर्टाने म्हटलंय की, हा केवळ तात्पुरता दिलासा असून यासाठी याचिकाकर्त्यांना एक प्रतिज्ञापत्र सादर करावा लागेल, की ते हर्बल हुक्क्यांच्या विक्रीवेळी कोरोना नियमावलीचं पालन करतील. याबाबत आता पुढील 9 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.

हेही वाचा: अमेरिका T 20 वर्ल्ड कपचा यजमान; ICC च्या 8 स्पर्धा आणि 12 देशांची संपूर्ण यादी

आता याप्रकरणी पुढील सुनावणी होईपर्यंत दिल्ली सरकारने त्यात हस्तक्षेप करू नये असे सांगतानाच न्यायालयाने संसर्गाची परिस्थिती बदलल्यास मात्र सरकार न्यायालयामध्ये दाद मागू शकते असे म्हटले आहे. या याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यावर दिल्ली सरकारने आपले म्हणणे मांडावे असेही न्यायालयाने नमूद केले. स्थानिक प्रशासनाने कोरोना संसर्गाचे कारण देत हुक्का बारवर निर्बंध घातले होते.

loading image
go to top