St Worker strike satara : जिल्ह्यातील एसटी कर्मचारी संपातच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

St Worker strike satara

St Worker strike satara : जिल्ह्यातील एसटी कर्मचारी संपातच

सातारा : मागील तीन आठवड्यांपासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप पगारवाढ केल्याने मागे घेतल्याचे संपाचे नेतृत्व केलेल्या सदाभाऊ खोत व गोपीचंद पडळकरांनी जाहीर केले. मात्र, अद्यापही कर्मचाऱ्यांनी राज्य शासनात विलीनीकरण या मुद्द्यावर ठाम राहत संप सुरूच ठेवला आहे. त्यामुळे सातारा शहरातील मुख्य बस स्थानकात आज एकही कर्मचारी कामावर हजर झाला नाही. दरम्यान, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या जिवावर एसटी प्रशासनाने सातारा ते पुणे मार्गावर १६ शिवशाही बसच्या फेऱ्या केल्या.

हेही वाचा: बापरे! भारत-पाक सामना एवढ्या लोकांनी पाहिला; Viewership चा नवा विक्रम

राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. त्यामुळे ऐन दिवाळीचा सण संपवून प्रवासी गावी जाण्याच्या तयारीत असताना सर्व डेपो बंद अवस्थेत दिसत होते. या संपात सुरुवातीला चालक, वाहकांसह सर्वच प्रशासकीय कर्मचारी संपात सहभागी झाले होते. त्यामुळे जिल्ह्यातील अकरा डेपोतील बस जागेवरच उभ्या आहेत. या परिस्थितीमुळे सतत वर्दळ असलेल्या बस स्थानकांमधील वाहतूक ठप्प झाली होती. मागील तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या संपावर तोडगा काढण्यासाठी संपकरी व राज्य शासनाने तीन बैठका घेतल्या. यामध्ये कर्मचाऱ्यांना ४१ टक्के पगारवाढ केल्याचे सांगण्यात आले. मात्र, कर्मचाऱ्यांनी विलीनीकरण या मुद्यावर ठाम राहत आंदोलन सुरूच ठेवले आहे.

दरम्यान, या संपात सातारा शहरातील मध्यवर्ती कार्यालयातील सर्वच प्रशासकीय कर्मचारी सहभागी झाले होते. मात्र, प्रशासनाने कारवाईचा इशारा दिल्यानंतर संप सुरू असतानादेखील प्रशासकीय कार्यालयातील बहुतांश कर्मचारी कामावर हजर झाले. मात्र, अद्यापही चालक व वाहक संपात सहभागी आहेत.

हेही वाचा: आता विभाजीत भारताला अखंडित बनवायला हवं - मोहन भागवत

सहा कर्मचाऱ्यांची सेवासमाप्ती

विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात आतापर्यंत रोजंदारीवरील सहा कर्मचाऱ्यांची सेवासमाप्ती केली असून, ३४ जणांना निलंबित केले आहे. आतापर्यंत १८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांना नोटिसा पाठविण्यात आल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली आहे.

"कर्मचाऱ्यांची आतापर्यंत सर्वाधिक पगारवाढ केल्याने सद्यःस्थितीत संप मागे घेतल्याचे जाहीर झाले. तरीही कर्मचाऱ्यांनी राज्य शासनात विलीनीकरणावर ठाम राहून संप सुरूच ठेवला आहे. या कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आवाहन केले आहे. आज बस स्थानकातून कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सातारा ते पुणे मार्गावर काही फेऱ्या केल्या आहेत.’’

-सागर पळसुले, विभाग नियंत्रक, एसटी

loading image
go to top