esakal | अजिंक्‍यताऱ्याची वाट बिकटच.. पर्यटकांची रस्‍त्‍याअभावी प्रचंड गैरसोय
sakal

बोलून बातमी शोधा

satara

अजिंक्‍यताऱ्याची वाट बिकटच.. पर्यटकांची रस्‍त्‍याअभावी प्रचंड गैरसोय

sakal_logo
By
गिरीश चव्हाण

सातारा : हद्दवाढीनंतर सातारा (Satara) पालिकेत (Municipal) आलेल्‍या अजिंक्‍यतारा किल्‍ल्‍याकडे (Ajinkya Fort ) जाणाऱ्या रस्‍त्‍याची मोठ्या प्रमाणात दुरवस्‍था झाली आहे. मध्‍यंतरीच्‍या काळात पालिकेने किल्ल्यासह (Fort) परिसराच्‍या विकासाची घोषणा केली होती. मात्र, त्‍या घोषणेचा त्‍यांनाच विसर पडल्‍याचे रस्‍त्‍याच्‍या दुर्दशेवरून दिसून येत आहे.

अजिंक्‍यतारा किल्ला मराठा साम्राज्‍याची राजधानीचा मानबिंदू असून, हा किल्‍ला सातारकरांच्‍या जीवनाचा अविभाज्‍य असा भाग आहे. या किल्‍ल्‍यावर तत्‍कालीन ऐतिहासिक इमारतींचे अवशेष आहेत. हा किल्‍ला पाहण्‍यासाठी विविध भागांतील पर्यटक येत असतात. या पर्यटकांबरोबरच शेकडो स्‍थानिक दररोज किल्‍ल्‍यावर फिरण्‍यासाठी जात असतात. या किल्‍ल्‍याकडे जाण्‍यासाठी एक मुख्‍य रस्‍ता असून, त्‍याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे.

मध्‍यंतरीच्‍या काळात हद्दवाढ झाली आणि अजिंक्‍यतारा किल्‍ला सातारा पालिकेच्‍या हद्दीत आला. किल्‍ला पालिकेत आल्‍याने त्‍याठिकाणच्‍या विकासाला चालना मिळेल, अशी सातारकरांना अपेक्षा लागून राहिली होती. याच अनुषंगाने सातारा पालिकेने काही महिन्यांपूर्वी अजिंक्‍यतारा किल्‍ल्‍यावर विशेष सभेचे आयोजन केले होते. या सभेत सातारा पालिकेचे पदाधिकारी, तसेच संपूर्ण यंत्रणा सहभागी झालेली होती.

हेही वाचा: न्यायाधीशाचा अपघाती मृत्यू कि हत्या ?; पाहा व्हिडिओ

किल्‍ला, त्‍याठिकाणचा ऐतिहासिक ठेवा, मराठा साम्राज्‍याची राजधानी या विषयांवर सभेत जोरदार भाषणे झाडण्‍यात आली. याच सभेत किल्‍ला पुनर्वसन, जतन आणि पुनर्निर्माणाचा विकसन आराखडा या अनुषंगाने, तसेच मुख्‍य रस्‍त्‍याच्‍या कामाचा विषय अजेंड्यावर घेण्‍यात आला होता. अजेंड्यावरील किल्‍ल्‍याशी निगडित असणारे विकासाचे प्रश्‍‍न एकमताने मंजूर करण्‍यात आले. अशा प्रकारे ऐतिहासिक किल्‍ल्‍यावर सभा आयोजित करणारी सातारा पालिका देशातील, राज्‍यातील पहिलीच पालिका असल्‍याचा दावा देखील करण्‍यात आला.

पालिकेनेच किल्‍ल्‍ल्‍याच्‍या विकासात लक्ष घातल्‍याने सातारकर आनंदित झाले होते. मात्र, त्‍यांचा आनंद जास्‍त काळ टिकला नाही. किल्‍ल्‍याच्‍या डागडुजीचे सोडाच पालिकेला मुख्‍य रस्‍त्‍याच्‍या दुरुस्‍तीकडेही लक्ष द्यायला नंतरच्‍या काळात वेळ मिळाला नाही. किल्‍ल्‍याकडे जाणाऱ्या मुख्‍य रस्‍त्‍याची पाऊस व इतर नैसर्गिक कारणांमुळे दुरवस्‍था झाली आहे. या दुरवस्‍थेमुळे किल्‍ल्‍यावर असणाऱ्या दूरदर्शन केंद्रातील कर्मचारी, पोलिस यंत्रणेच्‍या वायरलेस केंद्रातील कर्मचाऱ्यांसह फिरणे, व्‍यायामासाठी दररोज येणाऱ्या नागरिकांना यातना सहन कराव्‍या लागत आहेत.

हेही वाचा: पुणे : समाविष्ट २३ गावांच्या हद्दीत ‘डोंगर माथा-उतार’

घोषणांची पूर्तता करण्‍याची मागणी

तीव्र उतार असणाऱ्या भागातील रस्‍ता तर वाहतुकीसाठी, तसेच चालण्‍यासाठी धोकादायक बनला आहे. या रस्‍त्‍याची तत्काळ दुरुस्‍ती करत ऐतिहासिक वातावरणात केलेल्‍या ऐतिहासिक घोषणांची पूर्तता पालिकेने करण्‍याची मागणी सातारकर करत आहेत.

loading image
go to top