esakal | Satara Crime : कुलूप कटावणीने तोडून लोणंदात 11 लाखांची घरफोडी
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Crime

पोलिसांनी त्वरित सातारा येथून ‘वीर’ श्वान पथक व ठसे तज्ज्ञांचे पथक पाचारण करून तपासाची सूत्रे गतीने हलवली.

Satara Crime : कुलूप कटावणीने तोडून लोणंदात 11 लाखांची घरफोडी

sakal_logo
By
रमेश धायगुडे

लोणंद (सातारा) : लोणंद शहरात बाजारतळ येथील भरवस्तीत कुसुम अशोक शेलार यांच्या राहत्या घराचे जिन्याखालील दरवाजाचे कुलूप कटावणीने तोडून घरात बेडरूममध्ये प्रवेश करून तेथील कपाटातील २९ तोळ्यांचे सोन्याचे दागिने (Gold jewelry) व ११ हजार रुपयांची रोकड असा एकूण ११ लाख ४५ हजार रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. (Theft Of 11 Lakh From A House In Lonand City Satara Crime News)

काल पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या हा चोरीचा प्रकार घडला. दरम्यान, पोलिसांनी (Lonand Police Station) त्वरित सातारा येथून ‘वीर’ श्वान पथक व ठसे तज्ज्ञांचे पथक पाचारण करून तपासाची सूत्रे गतीने हलवली, तर विविध ठिकाणी पोलिसांची तपास पथकेही रवाना केली आहेत. याबाबत माहिती अशी, येथील बाजार तळावरील कुसुम अशोक शेलार यांच्या निवासस्थानी त्या व त्यांचे पती अशोक शेलार, पुतण्या संग्राम सुधीर शेलार, त्याची पत्नी योगेश्वरी, नातू स्वस्तिक व नात ज्ञानदा असे एकत्रित राहतात. काल रात्री हे सर्वजण साडेदहा वाजता जेवण करून टीव्हीचे कार्यक्रम पाहून रात्री अडीच वाजेपर्यंत गप्पा मारत बसले होते. त्यानंतर हे सर्वजण झोपी गेले. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास नात ज्ञानदा जागी झाल्याने कुसुम शेलार यांनी सून योगेश्वरीस किचनमधून दूध आणण्यास सांगितले. त्या वेळी योगेश्वरी या जागे होऊन दूध आणण्यासाठी किचनकडे जाताना चोरीचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्या वेळी संग्राम शेलार यांनी त्वरित लोणंद पोलिसांना (Lonand Police) याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोचून घटनेचा पंचनामा करून सातारा येथून ‘वीर’ श्वान पथक व ठसे तज्ज्ञांच्या पथकास पाचारण करून तपास केला. त्या वेळी श्वानाने शेलार यांच्या घरापासून बाजारतळावरून लोणंद - खंडाळा रस्त्यापर्यंत माग काढला व तेथेच घुटमळले.

हेही वाचा: कोरोना नियमांचे उल्लंघन; संभाजी भिडेंसह ८० जणांवर गुन्हा

Gold jewelry

Gold jewelry

चोरट्यांनी कपाटातील ३ लाख ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे एक पट्टीचे गंठण, दोन लाख रुपये किमतीचा पाच तोळे वजनाचा एक तीन पदरी सोन्याचा राणीहार, दोन लाख रुपये किमतीची पाच तोळे वजनाची तीन पदरी गोल मण्यांची सोन्याची एक मोहनमाळ, एक लाख ४० हजार रुपये किमतीची साडेतीन तोळ्याची डिझाईनची सोन्याची एक चैन, वीस हजार रुपये किमतीची पाच ग्रॅम वजनाची सोन्याची एक नथ, दहा हजार रुपये किमतीची अडीच ग्रॅम वजनाची सोन्याची लहान मुलाची एक अंगठी, ७२ हजार रुपये किमतीचे १८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे एक मिनी गंठण, ८० हजार रुपये किमतीचे दोन तोळे वजनाची लेडीज सोन्याची एक चैन, २० हजार रुपये किमतीची अर्धा तोळ्याची सोन्याची एक अंगठी, ३२ हजार रुपये किमतीची आठ ग्रॅम वजनाची ओम लिहिलेली खड्याची सोन्याची एक अंगठी व ११ हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण ११ लाख ४५ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याबाबत कुसुम अशोक शेलार यांनी लोणंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दरम्यान, सुभाष कापसे यांच्या दुकानाचा मागील दरवाजा कटावणीने तोडून दुकानातील लहान मुलाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम, तसेच वेताळपेठेतील एक व शेळके गल्लीतील दोन घरांची कुलपे तोडून चोरीचा प्रयत्न या चोरट्यांनी केला.

Theft Of 11 Lakh From A House In Lonand City Satara Crime News

loading image