मायबाप सरकार...पोटावर मारू नका! व्यापाऱ्यांची विनवणी; नियम पाळू व्यवसायाला परवानगी द्या

मायबाप सरकार...पोटावर मारू नका! व्यापाऱ्यांची विनवणी; नियम पाळू व्यवसायाला परवानगी द्या

सातारा : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पुकारलेल्या अंशत:च्या नावाखालील पूर्ण लॉकडाउनला जिल्ह्यातील व्यापाऱ्यांचा विरोध असून, त्यांनी मायबाप सरकार...पोटावर मारू नका.. अशी आर्त साद सरकार-प्रशासनाला घातली आहे. लॉकडाउन असला तरी रस्त्यावरील गर्दी कायम असल्याने कोरोना कसा कमी होणार, असा सवाल साताऱ्यातील व्यापारी संघटनांनी उपस्थित केला आहे . 

राजेश देशमुख (बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाचे जिल्हा उपाध्यक्ष) म्हणाले, लॉकडाउन आवश्‍यक असला तरी त्यामुळे रोजगार हिरावला जाणार नाही, याची दक्षता सरकारने घेणे आवश्‍यक होते. बांधकाम व्यवसायावर मोठी रोजगार साखळी अवलंबून आहे. वास्तविक या दुकानांत ग्राहकांचा वावर फार कमी असतो व येथे खबरदारी घेण्यात येते. बांधकाम व्यवसायाशी निगडित दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्याबरोबरच कामगारांना सूट द्यावी.
 
परवेज शेख (एन.एच. फोर हॉटेल असोशिएशनचे सदस्य) म्हणाले, मुळातच महामार्गावरील प्रवाशांची संख्या घटली आहे. लांबच्या प्रवासास निघालेल्यांना रात्री आठनंतर महामार्गावर जेवण, इतर सुविधा मिळत नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. यासाठी शासनाने हॉटेलमधील टेक अवे सुविधेसाठी रात्री दहा पर्यंतची परवानगी देणे आवश्‍यक आहे. 
 

श्रीधर शालगर (इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूंचे विक्रेते) म्हणाले, दोन दिवस पुकारलेल्या पूर्णत: लॉकडाउनला आमचा पाठिंबा होता. मात्र, शासनाने अत्यावश्‍यक शब्दाचा वापर करत सर्वच व्यवसाय बंद ठेवलेत. सरसकट बंदीमुळे काही साध्य होईल, असे वाटत नाही. व्यवसाय सुरू राहिले तर रोजगार टिकेल. यासाठी शासनाने सकाळी 9 ते सायंकाळी पाच यावेळेत व्यवसायास सर्वांनाच परवानगी द्यावी.
 
नंदकुमार बेनकर (सराफ असोसिएशन) म्हणाले, दोन दिवस बंदला सर्वांचा पाठिंबा होता. मात्र, सरसकट बंदीमुळे व्यवसाय अडचणीत आले आहेत. सराफी बाजारावर अनेक रोजगार अवलंबून असतात. ते सध्या बंद असून त्यातून बेरोजगारी वाढणार आहे.
 
राजेंद्र शिंदे (टु व्हिलर मॅकेनिक असोसिएशन) म्हणाले, वाहन दुरुस्ती अत्यावश्‍यक असून सर्वच सेवेतील नागरिक दुचाकी वापरतात. अत्यावश्‍यक काळात दुचाकी बंद पडल्यास त्याचा परिणाम सेवेवर होणार आहे. या व्यवसायावर तीन हजार कुटुंबे अवलंबून असल्याने शासनाने कृषीसह इतर सर्वच वाहनांच्या दुरुस्तीला परवानगी देणे आवश्‍यक आहे.

चिलीम आणि कोंबडीचं रक्त दिलं की धावजी पाटील प्रसन्न होताे...! 
 
इरफान सय्यद (अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण सुपर मार्केट गाळाधारक व्यापारी संघटना, कऱ्हाड) म्हणाले, आर्थिक वर्षाचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी खरेदी करावी लागते. ती व्यापाऱ्यांनी केली आहे. मात्र, लॉकडाउनमुळे त्याची खरेदी अंगावर पडून व्यापारी आर्थिक कोंडीत सापडला आहे. मागील व याही वर्षी पेन्टस व्यवसायाची उलाढाल लॉकडाउनमध्ये अडकल्याने ती ठप्प आहे. त्याचा विचार करून निर्णय अपेक्षित आहे.
 
नितीन मोटे (अध्यक्ष, कऱ्हाड व्यापारी महासंघ) म्हणाले, सर्व व्यवसाय बंद असल्यामुळे त्याचा किराणा व्यापारावरही परिणाम होत आहे. त्या सगळ्याचा सरकारने गांभीर्याने विचार करावा. सर्व व्यावसायिकांना ठराविक वेळेचे बंधन घालून मुभा द्यावी. कोरोना वाढतो आहे, हे खरे असले तरी त्याची काळजी घेता येईल.
 
नितीन ओसवाल (संचालक, सराफ असोसिएशन, कऱ्हाड) म्हणाले, ज्वेलर्सचे मार्केट आधीपासूच ठप्प आहे. सोन्याचे दर वाढत आहेत. त्यामुळे लोक खरेदीस येताना दिसत नाहीत. अशी मार्केटची स्थिती असताना लॉकडाउन लावण्यात आला. त्यामुळे ज्वेलरीच्या व्यापाऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी होणार आहे.
 
दिनेश पोरवाल (गिफ्ट गॅलरी व्यावसायिक संघटना, कऱ्हाड) म्हणाले, लॉकडाउनमुळे गिफ्ट आर्टिकल, खेळणी व भेटवस्तूंच्या व्यापाऱ्यांपुढे आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. त्याचा विचार करून सरकारने लॉकडाउनचा पुनर्विचार करावा. 

महेश लोया (सातारा हार्डवेअर अँड सॅनिटरी असोसिएशन) म्हणाले, सरसकट बंदीमुळे उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला असून, अत्यावश्‍यकसह इतर व्यवसायांना वेळ ठरवून देण्याबरोबरच शासनाने व्यापाऱ्यांना विश्‍वासात घेणे आवश्‍यक आहे. लॉकडाउन असला तरी रस्त्यावरील गर्दी कमी होत नसल्याने सरकारचा हेतू साध्य होईल का, हे सांगता येणार नाही. सकाळी 9 ते सायंकाळी पाच यावेळेची परवानगी द्यावी.

पुण्याहून साता-याला निघालात, थांबा! खंबाटकी घाटात झालाय माेठा अपघात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com