ट्रकला कार धडकल्याने भुयाचीवाडीत दोघी ठार; ठाण्याचे चारजण गंभीर जखमी I National Highway Accident | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune-Bangalore National Highway

भुयाचीवाडी येथे राजपुरोहित ढाब्यासमोर हा अपघात झाला आहे.

ट्रकला कार धडकल्याने भुयाचीवाडीत दोघी ठार; ठाण्याचे चारजण गंभीर जखमी

उंब्रज (सातारा) : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर (Pune-Bangalore National Highway) भुयाचीवाडीजवळ सातारा ते कऱ्हाड लेनवरील ढाब्यासमोर उभ्या असणाऱ्या ट्रकला भरधाव कारची भीषण धडक बसली. त्यात कारमधील एक महिला जागीच ठार झाली, तर १६ वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. चालकासह अन्य चारजण गंभीर जखमी झाले आहेत. आज सकाळी सव्वासातच्या सुमारास हा अपघात झाला.

हेही वाचा: अटीतटीच्या लढतीत सहकारमंत्र्यांसह गृहराज्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला

परमजित अविनाश भटनागर (वय ४७), वनशिका विक्रम शेट्टी (वय १६, रा. ठाणे) अशी मृतांची नावे आहेत. अविनाश महेशचंद्र भटनागर (चालक, वय ५२), कश्या भटनागर (वय १४), विक्रम शेट्टी (वय ५१), अद्विका शेट्टी (वय १७, सर्व रा. कल्याण-ठाणे) अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी (Umbraj Police) दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरील माहिती अशी : पुणे-बंगळूर महामार्गावर भुयाचीवाडीजवळील ढाब्यासमोर ट्रक थांबला होता. त्यादरम्यान साताऱ्याहून कोल्हापूककडे जाणारी कार (क्र. एमएच ०५ ईए २६४२) ही भरधाव वेगात येऊन उभ्या असणाऱ्या ट्रकला धडकली. त्यात कारमधील परमजित यांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या वनशिका हिचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

हेही वाचा: तालिबान्यांच्या दहशतीनं 3 लाख लोक अफगाणिस्तानातून पळाले इराणला

कारमधील अन्य चारजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी महामार्ग रुग्णवाहिका व १०८ रुग्णवाहिकेतून जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे. कल्याण-ठाणे येथील भटनागर व शेट्टी या दोन कुटुंबांतील सहाजण सहलीसाठी गोव्याला निघाले होते. त्यावेळी सकाळच्या सुमारास चालकाला झोप आल्याने अपघात झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. कारचालक अविनाश यांना अपघाताने धक्का बसला असून पत्नी परमजित यांचा मृत्यू झाल्याने ते मानसिक तणावाखाली आहेत.

हेही वाचा: नाकाबंदी भेदत राजेंची जिल्हा बॅंकेत दमदार एन्ट्री

महामार्गाकडेला वाहने उभी केल्याने धोका

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या ढाब्यासमोर महामार्गावर ट्रकचालक वाहने उभी करत असल्याने महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांचा जीव धोक्यात येत आहेत. त्यामुळे अनेक प्रवाशांचे जीव गेले आहेत. परंतु, महामार्ग देखभाल-दुरुस्ती विभागाकडून महामार्गावर वाहने थांबवत असल्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने अजून किती जीव गेल्यानंतरच जाग येणार, असा प्रश्न विचारला जात आहे.

loading image
go to top