Accident : एसटी बसच्या चाकाखाली सापडून १३ वर्षीय शालेय विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू

वाई येथील बसस्थानकावर आज १३ वर्षाची शालेय विद्यार्थिनी एसटी बसच्या चाकाखाली सापडली. या घटनेत मुलीचा जागीच मृत्यू झाला.
ST Accident
ST AccidentSakal

वाई - येथील बसस्थानकावर आज १३ वर्षाची शालेय विद्यार्थिनी एसटी बसच्या चाकाखाली सापडली. या घटनेत मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या घटनेमुळे बसस्थानक परिसरात काही क्षण शांतता पसरली.

श्रावणी विकास आयवळे (रा. सुलतानपूर, ता. वाई) असे मृत विद्यार्थीनीचे नाव आहे. ती येथील त. ल. जोशी विद्यालयात इयत्ता ७ वी मध्ये शिकत होती.

याबाबत घटनास्थळी मिळालेली माहिती अशी, आज दुपारच्या सुमारास वाई बसस्थानकावर नेहमीप्रमाणे प्रवाशांची गर्दी होती. यामध्ये विद्यार्थी तसेच विद्यार्थींनी यांची लक्षणीय संख्या होती. त्यातच सलग सुट्ट्यांमुळे परगावचे प्रवासी देखील महाबळेश्वर व पाचगणीला जाण्यासाठी वाईतील बसस्थानकावर दिसून येत होते.

नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी श्रावणी आयवळे ही विद्यार्थिनी बस स्थानकावर आली होती. दुपारी दीड वाजता सुटणारी ' वाई-बालेघर' ही गाडी (क्र. एमएच १४ बी टी ०४९६) बसस्थानकाच्या फलाटाला लागत असताना गाडीमध्ये शिरण्यासाठी विद्यार्थ्यांनी एकच गर्दी केली होती.

गर्दीतील ढकलाढकली मुळे श्रावणी आयवळे ही गाडीच्या मागच्या बाजूस पडली. यावेळी गाडी मागे येत असल्याने तिचे डोके गाडीच्या चाकाखाली चिरडले गेले आणि तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर बसस्थानकावरील घटनास्थळी बघ्यांची तोबा गर्दी झाली.

या घटनेची माहिती कळताच वाई आगार व्यवस्थापक बालाजी गायकवाड, वाहतूक नियंत्रक व अन्य अधिकारी तसेच परिवेक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, उपनिरीक्षक कृष्णकांत पवार व सहकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

यावेळी घटनास्थळी झालेली बघ्यांची गर्दी हटवून पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. तसेच विद्यार्थिनीकडील ओळखपत्राच्या आधारे संबंधित शाळेच्या शिक्षकांना आणि मुलीच्या नातेवाईकांना घटनेची माहिती कळविली. पोलिसांनी वाहन चालक जीवन मारुती भोसले (वय-३६ वर्षे, रा. नांदवळ, वाठार) याला ताब्यात घेतले असून, अधिक तपास वाई पोलीस करीत आहेत.

दरम्यान महामंडळाच्या मंजूर शेड्युल नुसार ग्रामीण भागातील फेऱ्या सुरू आहेत. शनिवारी शाळा व महाविद्यालय एकाच वेळी सुटत असल्याने दुपारी ग्रामीण भागात जाणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनींची मोठी गर्दी होते. आज चालक गाडी मागे घेत असताना ही दुर्दैवी घटना घडली. मृत विद्यार्थिनीच्या नातेवाईकांना महामंडळाच्या नियमानुसार तातडीची दहा हजार रुपयांची आर्थिक मदत मिळवून देण्यात येणार असल्याचे आगार व्यवस्थापक बालाजी गायकवाड यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com