
'राजकारण हे राजकारणाच्या जागीच ठेवावं. खेळामध्ये राजकारण आल्यास ते गजकरण होतं.'
पश्चिम महाराष्ट्रातील पैलवानांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक देणार : उदयनराजे
सातारा : महाराष्ट्राची कुस्ती परंपरा ही प्रगल्भ आणि बहुआयामी असून, या परंपरेने जागतिक पातळीवर आपला झेंडा फडकवला आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा ते कोल्हापूर हा पट्टा कुस्ती पंढरी म्हणून ओळखला जाते. या पंढरीतील नामवंत मल्लांना आंतरराष्ट्रीय सुविधा देण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून सुविधा आणि मुबलक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी दिले.
उदयनराजे भोसले मित्र समूह, श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह ऊर्फ दादा महाराज तालीम संघ यांच्या वतीने महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) पृथ्वीराज पाटील यांना रॉयल एन्फिल्ड बुलेट व उपमहाराष्ट्र केसरी विशाल बनकर यांना होंडा युनिकॉर्न गाडी जलमंदिर या ठिकाणी भेट देण्यात आली. पैलवान गणेश कुंकले, आकाश माने, सुमीत गुजर यांना प्रत्येकी ५१ हजार रुपये असे बक्षीस दिले. याचबरोबर इतर सात पैलवानांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह व गौरव पत्र देण्यात येणार आहेत. या वेळी तालीम संघाचे अमर जाधव, संग्राम बर्गे, जिल्हा परिषद सदस्य सुनील काटकर, पैलवान सचिन शेलार, नयन पाटील, सागर भोसले उपस्थित होते.
हेही वाचा: उदयनराजेंचा 'रॉयल' अंदाज; महाराष्ट्र केसरी 'पृथ्वीराज'ला दिली 'बुलेट'
खासदार भोसले म्हणाले, ‘‘कुस्तीच्या पारंपरिक खेळामध्ये येणाऱ्या अडचणी मी समजून घेत असून, त्याकरिता जास्तीतजास्त सुविधा मला कशा उपलब्ध करून देता येईल, याकरिता मी बांधील आहे. राजकारणात सर्व गोष्टी करता येतात. मात्र, राजकारण हे राजकारणाच्या जागीच ठेवावे. खेळामध्ये राजकारण आल्यास ते गजकरण होते. त्यामुळे जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत मी जनतेचाच आहे. श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह ऊर्फ दादा महाराज यांनी पैलवान श्रीरंग आप्पा जाधव यांच्याबरोबर कार्यरत असताना तालीम संघाच्या माध्यमातून कुस्ती परंपरेसाठी मोठे सहकार्य केले. ती जबाबदारी आता माझ्यावर असून, पश्चिम माणसाच्या पट्ट्यातील नामवंत पैलवानांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक देणार आहे.’’
Web Title: Will Give International Training To Wrestlers Udayanraje Bhosale
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..