esakal | 1942 च्या ब्रिटिशकालीन तुरुंगात आजही भरते झेडपीची 'शाळा'
sakal

बोलून बातमी शोधा

British Jail

साताऱ्यातील वडूजात ब्रिटिशकालीन तुरुंगात जिल्हा परिषदेची शाळा भरविली जाते.

1942 च्या ब्रिटिशकालीन तुरुंगात आजही भरते झेडपीची 'शाळा'

sakal_logo
By
आयाज मुल्ला

वडूज (सातारा) : देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेकांनी त्या ठिकाणी तुरुंगवास भोगला. देशाला ब्रिटिशांच्या जोखडातून सोडविण्यासाठी ९ सप्टेंबर १९४२ च्या रणसंग्रामात घडलेल्या अनेक घटनांचा तो तुरुंग आजही साक्षीदार आहे. विशेषत: गेल्या ३० ते ४० वर्षांपासून याठिकाणी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा Zilla (Parishad Primary School) भरविण्यात येत असून, याठिकाणी ज्ञानार्जन करून अनेक सक्षम पिढ्या घडल्या आहेत.

येथील ब्रिटिशकालीन तुरुंगात जिल्हा परिषदेची शाळा भरविली जाते. जुनी कचेरीतील शाळा म्हणून ही इमारत ओळखली जाते. देशात इंग्रजांचे वास्तव्य सुरू झाल्यानंतर १८६५ च्या दरम्यान वडूजमध्ये इंग्रजांनी कातरखटाव रस्त्यानजीक असणाऱ्या एका मठात आश्रय घेतला. त्यानंतर काही वर्षांनी त्यांनी प्रशासकीय कामासाठी येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिराजवळ इमारत बांधली. त्याठिकाणी इंग्रजांचे प्रशासकीय कामाची कार्यालये, कैद्यांना डांबण्यासाठी नऊ खोल्या होत्या. आतमध्ये जाण्यासाठी समोरील बाजूला फक्त एकच मोठा दरवाजा होता. कार्यालयाच्या खोल्या, तुरुंगाच्या खोल्या, अंधार कोठड्या या खोल्यांची दारे मजबूत होती. सुमारे दोन फूट रुंदीच्या चुन्याच्या घडणीतील दगडी भिंतीचे बांधकाम, जाडजूड लोखंडी गजांची दारे व त्यांना असणारे मजबूत कडी- कोयंडेच त्यांच्या मजबुतीची आजही साक्ष देतात.

हेही वाचा: पुढील तीन दिवस राज्याला धोका; 'या' जिल्ह्यांत 'मुसळधार'

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ९ सप्टेंबर १९४२ चा रणसंग्राम घडला. ब्रिटिशकालीन इमारतीनजीकच असणाऱ्या या परिसरात हा रणसंग्राम घडला होता. या रणसंग्रामात परशुराम श्रीपती घार्गे यांच्यासह किसन बाळा भोसले, खाशाबा मारुती शिंदे, सिदू भिवा पवार, रामचंद्र कृष्णा सुतार, बलभीम हरी खटावकर, बाळकृष्ण दिगंबर खटावकर, श्रीरंग भाऊ शिंदे, आनंदा श्रीपती गायकवाड हे नऊ जण हुतात्मा झाले. शिवाय अनेकजण कायमचे जायबंदी झाले होते. या रणसंग्रामातील अनेकांना याच तुरुंगात डांबण्यात आले होते. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या या हुतात्म्यांच्या स्मृती कायम चिरंतन राहाव्यात, त्यांच्या त्यागाची प्रेरणा कायम भावी पिढीला मिळावी म्हणून वडूजसह तालुक्यात ठिकठिकाणी हुतात्मा स्मारकांच्या वास्तू उभारण्यात आल्या आहेत. ९ सप्टेंबर १९४२ रोजी येथे झालेल्या १९४२ च्या लढ्यानंतर या इमारतीमध्ये काही महसुलाची कागदपत्रे ठेवण्यात येत होती.

हेही वाचा: बंदुकीचा धाक दाखवणाऱ्या तालिबानीसमोर महिलेनं रोखली 'नजर'

१९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळून ब्रिटिशांची सत्ता पालटली असली तरी ही इमारत आजही त्या घटनांची साक्षीदार आहे. गेल्या ३० ते ४० वर्षांपासून याठिकाणी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा भरविली जाते. सध्‍या याठिकाणी जिल्हा परिषदेची शाळा क्रमांक दोन व तीनचे वर्ग भरविण्यात येत आहेत. आतमध्ये असणारी मोठी चिंचेची झाडे पाडून सुसज्ज प्रांगण करण्यात आले आहे. काही खोल्यांची डागडुजी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. ऐतिहासिक घटनांची साक्षीदार असणाऱ्या या इमारतीचे पावित्र्य व महत्त्‍व कायम ठेवण्यासाठी संरक्षक भिंत आदी सुविधा करण्यात आल्या आहेत. ‍सध्‍या या इमारतीच्या काही खोल्यांचे लाकडी खांब निसटले आहेत, पत्र्यांची दुरवस्था झाली असून, त्यांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. काही खोल्यांच्या दारे, खिडक्यांचीही दुरुस्ती करणे आवश्यक आहे. ब्रिटिशकालीन असणाऱ्या या तुरुंगात सध्‍या जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा भरविली जात आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोना संसर्ग परिस्थितीमुळे शाळा बंद असल्या तरी अनेक ऐतिहासिक घटनांची ही इमारत आजही साक्षीदार आहे.

हेही वाचा: साताऱ्यात शुक्रवारी जेल फोड शौर्यदिन

जिल्हा परिषदेच्या अन्य शाळांना १४ व १५ व्या वित्त आयोगातून निधी मिळतो. मात्र, ही शाळा नगरपंचायत हद्दीत असल्याने जिल्हा परिषदेला १४ व १५ व्या वित्त आयोगातून निधी देता येत नाही. येथील इमारतीला ऐतिहासिक महत्त्‍व असल्याने इमारतीच्या संवर्धनासाठी विशेष बाब म्हणून निधी उपलब्ध करावा.

-उमेश पाटील, उपशिक्षक, जिल्हा परिषद शाळा, वडूज क्रमांक तीन

loading image
go to top