रंजक गोष्ट: भारतात 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून का साजरा होतो माहितीये का ?

रफिक पठाण, टीम ई-सकाळ, पुणे
सोमवार, 11 मे 2020

जगात टेक्नॉलॉजीला अनन्य साधारण महत्व आहे. आज आपल्या दररोजच्या आयुष्यात विज्ञान खूप महत्वाचा भाग आहे. अशाच विज्ञानाची भन्नाट गोष्ट म्हणजे भारतात 11 मे ला साजरा होणारा राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस.

पुणे: संपूर्ण जगात आण्विक शक्तीला अनन्य साधारण महत्व आहे. अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील आण्विक हल्ल्याची धमकी संपूर्ण जगाला माहितीच आहे. जगात मोजक्याच देशांकडे आण्विक शस्त्रे उपलब्ध आहेत. जगात सध्या कोणत्याही देशाची युद्धात लढण्याचीक्षमता आता त्या देशाच्या आण्विक शस्त्रांवरून सुद्धा मोजली जाते. भारताला अण्वस्त्रधारी देश म्हणून जगभरात मान्यता मिळावी म्हणून भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांनी 11 मे 1998 ला अण्वस्त्र चाचणी घेवून संपूर्ण जगाला धक्का दिला होता. 

1998 मध्ये केंद्रात सत्ताबदल होऊन एनडीएचे सरकार स्थापन झाले होते. सरकार स्थापनेनंतरच्या दोनच महिन्यात अटलजींकडून अणू चाचणी घेण्यात आली होती. 11 मे 1998 ला 'ऑपेरेशन शक्ती' या नावाने भारतात दुसऱ्यांदा अणुचाचणी घेत भारताने जगाला आश्चर्याचा धक्का दिला होता. विशेष म्हणजे याची जगभरातील कोणत्याच गुप्तहेर संस्थेला खबर सुद्धा लागली नाही. या चाचणीनंतर अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रांस आणि चीननंतर भारत सहावा अण्वस्त्रधारी देश बनला.
भारताने अण्वस्त्र चाचणी घेऊ नये यासाठी अमेरिका आणि पश्चिम युरोप यांचा भारतावर प्रचंड दबाव होता. हा दबाव भारताने अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर स्वाक्षरी करण्यासाठी टाकण्यात येत होता. या करारावर 137 देशांनी स्वाक्षरी केली होती. भारताने या करारावर स्वाक्षरी तर केली नाजीचं परंतु अण्वस्त्र चाचणीसुद्धा घडून आणली. 

चीन-पाकव्यतिरिक्त आणखी एका देशाशी संबंध ताणले; सीमेवर सैन्य वाढविण्याचा इशारा

काय होता मास्टरप्लॅन:
1974 साली भारतात इंदिरा गांधींच्या नेतृत्वात पहिली अण्वस्त्र चाचणी पोखरण मध्ये घेतली होती. परंतु त्यावेळी भारताला अण्वस्त्रधारी देश म्हणून घोषित केले नव्हते. त्यानंतर पी.व्ही.नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखाली दुसरी अणूचाचणी घेण्याची तयारी करण्यात आली होती परंतू अमेरिकेला याची कुणकुण लागली आणि त्यांनी भारतावर प्रचंड दबाव आणण्यास सुरवात केली व त्यामुळे अण्वस्त्र चाचणी थांबविण्यात आली. पहिल्या अणुचाचणीनंतर तब्बल 24 वर्षांनंतर अटल बिहारी वाजपेयी यांनी भारतातील वैज्ञानिक, इंजिनिअर, आणि तंत्रज्ञाच्या महत्वाकांक्षी कामगिरीवर दुसरी अण्वस्त्र चाचणी घेऊन  इतिहास घडून आणला. 

मोदी सरकारच्या या निर्णयाचे पी. चिदंबरम यांच्याकडून स्वागत

अमेरिकेची गुप्तहेर संस्थेने मान्य केले अपयश:
भारताने दुसरी अण्वस्त्र चाचणी घेताना कमालीची गुप्तता पाळली होती. जगातील प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवणारी अमेरिकन गुप्तहेर संस्था सीआयएला भारताने शंका सुद्धा येऊ दिली नाही. अमेरिका टेहळणी उपग्रहांमार्फत जगावर लक्ष ठेवण्याचे काम करत असते. अमेरिकन गुप्तहेर संस्था सीआयएने आपले अपयश मान्य करत गुप्तहेरीचे स्रोत बदलणे, ह्युमन इंटलिजन्स वर लक्ष देणे आवश्यक असल्याचे कबूल केले होते. 

भारताच्या सुवर्णइतिहासातील हि घटना साजरी करण्यासाठी भारतात राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून 11 मे हा दिवस साजरा केला जातो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Do you know why May 11 is celebrated as National Technology Day in India