काजू चिकाचा 'यात' वापर करणे शक्य; प्रयोग यशस्वी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

कोकणात मोठ्या प्रमाणात काजूचे पिक घेतले जाते. हजारो हेक्‍टर जमिनीवर त्याची लागवड केली जाते. त्यातून उत्पादनही घेतले जाते. काजूच्या बोंडापासून मद्य तयार करण्यासाठी दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाने संशोधन केले आहे. गोवा राज्यात तर काजूच्या बोंडापासून काजू फेणी तयार केली जाते.

रत्नागिरी - औषध शरीरात सावकाश विरघळावे यासाठी आवश्‍यक घटक काजूच्या चिकापासून बनविण्याचा प्रयोग सावर्डेतील (ता. चिपळूण) गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसीची विद्यार्थीनी भाग्यश्री तुळशीदास चोथे हिने यशस्वी केला आहे. या प्रयोगामुळे काजूच्या चिकाला मोठी मागणी वाढेल. 

काजूच्या चिकापासून पॉलिमर बनवण्याचे पेटंट भारत सरकारने 8 नोव्हेंबर 2019 ला प्रदान केले. सस्टेंण्ड रिलीफ टॅबलेट म्हणून याचा वापर औषधामध्ये होणार आहे. चार वर्षांपूर्वी चोथे या विद्यार्थीनीने या संशोधनाला प्रारंभ केला. तिला प्रा. माया देसाई आणि प्रा. प्रवीण वाघचौरे यांचे मार्गदर्शन लाभले.

गवारी चिकाप्रमाणे काजूचाही उपयोग

काजूच्या चिकाचा उपयोग हा गोळीचा प्रभाव चोविस तास रहावा यासाठी करता येऊ शकतो. हे तिने प्रयोगातून सिध्द केले. शरीरात औषध गेले की ते विरघळवण्यासाठीचा कालावधी वाढविण्यासाठी पॉलीमरचा वापर केला जातो. ते पॉलीमर विविध प्रकारच्या पदार्थांपासून तयार केले जातात. त्यात गवारीच्या चिकाचाही उपयोग केला जातो. त्याच धर्तीवर काजूच्या चिकापासून पॉलिमर बनवून ते औषधात वापरले जाते. काजूच्या चिकाचे पॉलिमर हे गोळी हळूहळू विरघळते. तसेच त्याचा शरीरावर परिणामही होत नाही. 

सावर्डेतील गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसीची विद्‌यार्थीला मिळालेल्या पेटंटबद्‌दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार शेखर निकम, अशोक विचारे, प्रा. डॉ. अनिल बत्तासे यांच्यासह सर्वचस्तरावरून अभिनंदन केले जात आहे. 

प्रयोग स्थानिक बागायतदारांसाठी महत्त्वाचा

कोकणात मोठ्या प्रमाणात काजूचे पिक घेतले जाते. हजारो हेक्‍टर जमिनीवर त्याची लागवड केली जाते. त्यातून उत्पादनही घेतले जाते. काजूच्या बोंडापासून मद्य तयार करण्यासाठी दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाने संशोधन केले आहे. गोवा राज्यात तर काजूच्या बोंडापासून काजू फेणी तयार केली जाते. मात्र येथे फळप्रक्रिया उद्योग निर्माण होत नाहीत. मात्र काजूच्या चिकाचा उपयोग औषधात करण्याचा प्रयोग निश्‍चित स्थानिक बागायतदारांसाठी महत्त्वाचा ठरु शकतो. 

भाग्यश्रीला मिळाले पेटंट
महाविद्यालयाची विद्यार्थिनी भाग्यश्री हीला पेटंट मिळाले आहे. त्यामुळे काजूच्या चिकाचा उपयोग करण्याचे तंत्र विविध औषध कंपन्या आत्मसात करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 
- प्रवीण वाघचौरे, मार्गदर्शक 

 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Possible To Use Cashew Nuts Papain In Medicine Experiment Successful