भारतात 2021च्या अखेरीस 5G, Jio घेतंय पुढाकार; लवकरच सुरु होणार चाचणी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 10 February 2021

भारतात ही सेवा सुरु व्हायची असली तरीही चीन, अमेरिका आणि दक्षिण कोरिया सारख्या देशात सर्वप्रथम 5G ची सेवा सुरु झाली आहे.

नवी दिल्ली : भारतात गेल्या काही महिन्यांपासून 5G तंत्रज्ञानाविषयीची चर्चा जोरदार सुरु आहे. दूरसंचार विभागाने आता याबाबतचे स्पष्टीकरण दिले आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांतच भारतात 5G तंत्रज्ञानाची चाचणी सुरु होण्याची शक्यता आहे. तसेच यासंबंधी विभागाकडे 16 अर्ज दाखल झाले आहेत. या चाचणीसाठी स्वदेशी तसेच बाहेरील तंत्रज्ञानाचीही मदत घेतली जाणार आहे. याआधी संसदेच्या स्थायी समितीसमोर या चाचणीस होत असलेल्या विलंबावरुन चिंता व्यक्त करण्यात आली होती. इतर देश याबाबत पुढे असताना भारतात इतका उशीर का? असा सवाल देखील करण्यात आला होता. 

लवकरच चाचणी

येत्या एक मार्च 2021 रोजी स्पेक्ट्रमच्या लिलावांची घोषणा दूरसंचार मंत्रालयाकडून करण्यात आली आहे. या लिलावातून 3.92 लाख कोटी रुपये केंद्र सरकारकडे जमा होणार आहेत. भारतात 5G ची सेवा यावर्षीच्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या सुरवातीला होणार आहे. अशी माहिती दूरसंचार विभागाने संसदेच्या समितीला दिली आहे. सुरवातीच्या टप्प्यात ही सेवा विशिष्ट क्षेत्रांसाठीच असणार आहे. 4G सेवा देशभर वापरली जाण्यासाठी देखील पाच ते सहा वर्षांचा काळ जावा लागला होता. 'क्वालकॉम' या अमेरिकन कंपनीसोबत 'रिलायन्स जिओ'ने अमेरिकेमध्ये 5G सेवेची चाचणी घेतली असून ती यशस्वी ठरली आहे. 

हेही वाचा - Telegram वर तुमचं लास्ट सीन बंद करायचं? जाणून घ्या बंद करण्याची सोपी पद्धत

जिओचा पुढाकार

नुकत्याच झालेल्या इंडियन मोबाइल काँग्रेस 2020 मध्ये रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी देशात 5G ची सुविधा सुरु करण्यासाठी सकारात्मक पावले उचलली जावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. तसेच जिओ कंपनीतर्फे दुसऱ्या सहामाहित 5Gची सेवा सुरु करण्यासंदर्भातील संकेत त्यांनी दिले होते. संपूर्ण तंत्रज्ञान भारतीय असून हार्डवेअर देखील भारतीयच असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. 

भारतात का उशीर?

भारतात ही सेवा सुरु व्हायची असली तरीही चीन, अमेरिका आणि दक्षिण कोरिया सारख्या देशात सर्वप्रथम 5G ची सेवा सुरु झाली आहे. त्यानंतर जवळपास 68 देशांमध्ये सध्या ही सेवा कार्यरत आहे. इतकंच नव्हे तर ओमान, फिलिपिन्स, श्रीलंकासारख्या लहान देशांत देखील ही सुविधा मिळत आहे.

हेही वाचा - 'स्वदेशी ट्विटर' Koo ने 10 महिन्यांत जमवले 41 लाख डॉलर; PM मोदींनी नावाजलेले नवं ऍप

किती स्पीड देणार?

5G च्या सेवेचा नेमका फायदा काय आणि कसा होणार, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. तसेच ही सेवा सामान्यांना परवडणारी असणार आहे का, याबाबत देखील लोकांमध्ये उत्सुकता आहे. साहजिकच, 4G च्या तुलनेत 5G सेवेचा वेग कित्येक पटीने जास्त आहे. सध्या जगातील सर्वांत वेगवान 5G सौदी अरेबियामध्ये आहे. तिथल्या 5G चा सरासरी वेग 377.2 एमबीपीएस इतका आहे. सध्या तितला 4G चा सरासरी वेग 30.1 एमबीपीएस असून 5G चा वेग 4G च्या जवळपास 12.5 पट जास्त आहे. तर रिलायन्स जिओने भारतात 5G सेवेला एक जीबीपीएस वेग देण्याची मोठी घोषणा याआधी केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 5g service india december 2021 Jio leading in 5G trial begin soon