स्टार्टअप्सनी बदलल्या ग्राहकांच्या सवयी

Startup
Startup

तंत्रज्ञानानं आणि त्याच्याशी संबंधित अनेक स्टार्टअप्सनी गेल्या काही वर्षांत ग्राहकांच्या सवयी आमूलाग्र बदलून टाकल्या आहेत. घरी खाद्यपदार्थ मागवण्यापासून चित्रपटांसाठी बुकिंग करण्यापर्यंत आणि मोबाईलचा वापर करून आर्थिक व्यवहार करण्यापासून इतर अनेक गोष्टींपर्यंत अनेक सवयी या स्टार्टअप्सनी बदलल्या आहेत. अशाच काही उल्लेखनीय स्टार्टअप्सवर एक नजर. 

आपल्याला असं वाटतं, की नावीन्य हे केवळ तंत्रज्ञान, मशीनविषयक शिक्षण किंवा काही फॅन्सी शब्द वगरैंमध्ये असतं; पण खरं तर ते लोकांच्या सवयी बदलण्यासाठी सोल्युशन्स सादर करण्यात आणि लोकांच्या सवयबदलांना पूरक तंत्रज्ञान वापरण्यात असतं. तंत्रज्ञान बाजारपेठेमध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणेल असं गेली अनेक वर्षं आपण ऐकत आलोय; पण या बदलानं सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन आयुष्यात कसा बदल घडवून आणला आहे? या लेखात अशाच काही बदलांबाबत आणि त्यांनी स्टार्टअप्सच्या संपूर्ण व्यवसायाचं परिमाण कसं बदललं त्यावर बोलणार आहोत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

ऑनलाइन शिक्षण स्टार्टअप्स
भारतात ऑनलाइन शिक्षण (एड-टेक) स्टार्टअप इकोसिस्टिममध्ये अग्रेसर असलेल्यांपैकी ‘बायज्यूज’ ही एक आहे. त्याबरोबरच ‘वेदांतू’, ‘सिंप्लीलर्न’, ‘ग्रेटलर्निंग’, ‘बेगालिलिओ’, ‘ट्युटरबी’, ‘टॉपर’, ‘अपग्रॅड’ अशाही अनेक कंपन्या आहेत. कोरोना साथीमुळे अशा प्रकारच्या दूरशिक्षणाकडे लोक जास्त आकर्षित झाले, या कंपन्यांबद्दल विश्वासार्हता वाढली आणि त्यांचे अनेक फायदेही लोकांना कळले. लोक आता डेटा सायन्समध्ये उच्च पदवी मिळवण्यापासून कोडिंग शिकण्यापर्यंत सगळं काही घरी बसून शिकू शकतात. ‘व्हाइटहॅट’ ज्युनिअर ही बायज्यूजची सब्सिडरी असून, तिची गेल्या काही काळात कोडिंगच्या दुनियेत चर्चा सुरू झाली आहे. तंत्रज्ञानाचे ग्राहक बनण्याऐवजी त्याचे निर्माते बनवणारी नवी पिढी तयार करण्याचं तिचं उद्दिष्ट आहे. 

शिक्षण म्हणजे वर्गात खूप विद्यार्थी शिक्षकांची लेक्चर्स ऐकत बसले आहेत, किंवा घरापासून ट्युशन सेंटर्सपर्यंत प्रवास करावा लागत आहे वगैरे दिवस आता इतिहासजमा झाले आहेत. ‘अनॲकॅडमी’सारख्या एड-टेक स्टार्टअप्सनी भारतात उच्चशिक्षण रास्त करून आणि ते ऑनलाइन उपलब्ध करून एक गॅप भरून काढली आहे. नुकतंच ॲमेझॉननंही आयआयटीजेईईसारख्या स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन करणारी एक ॲकॅडमी सुरू करायची घोषणा केली आहे आणि ती विनामूल्य असल्याचं म्हटलं आहे. 

डिलिव्हरी स्टार्टअप्स
नंदन रेड्डी आणि श्रीहर्ष मॅजेटी यांनी २०१४मध्ये स्थापन केलेल्या ‘स्विगी’ या कंपनीनं ऑनलाइन फूड ऑर्डर करण्याबाबतच्या उद्योगात आणि एकूणच अन्नपदार्थ क्षेत्रात क्रांती घडवून आणली. त्यांनी एकूण कार्यप्रणालीबाबत भर दिलाच; पण त्याच वेळी यशस्वी बिझनेस मॉडेलही तयार केलं-जे त्या काळातल्या इतर कंपन्यांना जमली नाही. (उदाहरणार्थ, ‘फूडपांडा’ जी नंतर ‘ओला कॅब्ज’नी खरेदी केली. ‘टायनीआऊल’ जी नंतर ‘झोमॅटो’नं खरेदी केली. ‘ओला कॅफे’ नंतर बंद करण्यात आली.) ग्राहकांपर्यंत अन्नपदार्थ पोचवण्यासाठी त्यांचं ‘जिओलोकेशन’ वापरणं हा तंत्रज्ञानाचा जबरदस्त वापर होता आणि त्यासाठी अगदी किरकोळ शुल्क वापरलं जायचं. यामुळे केवळ रेस्टॉरंट्‍समधली विक्री वाढली नाही, तर क्लाऊड किचेन्ससारख्या नवीन बिझनेस मॉडेल्सची कल्पनाही पुढं आली. 

पुरवठा क्षेत्रामध्ये नवीन बिझनेस मॉडेल्स समाविष्ट झाल्यामुळे इतर ब्रँड्सही बाजारहिस्सा मिळवण्यासाठी फुढे सरसावल्या आणि उद्योग क्षेत्रात अग्रणी बनण्यासाठी प्रयत्न करायला लागल्या. यामुळे एक ‘सवलत युद्ध’ही सुरू झालं ज्याचा फायदा अर्थातच ग्राहकांना झाला. ते त्या दिवशी स्वस्त अन्नपदार्थ कोणत्या प्लॅटफॉर्मवर मिळणार आहेत ते शोधायला लागले. या कंपन्यांना अन्नपदार्थांवर इतक्या सवलती देणं परवडतं कसं असा प्रश्नही विचारला जाऊ लागला. काही वेळा सवलती इतक्या असायच्या, की समजा तुम्ही तो पदार्थ प्रत्यक्ष एका स्टोअरमध्ये खरेदी करायला गेलात तर त्यासाठी द्याव्या लागणाऱ्या रकमेपेक्षा या ॲपवर डिलिव्हरी चार्जेस समाविष्ट करूनसुद्धा द्यावी लागणारी रक्कम कमी असायची. 

गेल्या काही वर्षांत फूड डिलिव्हरी ॲप्स प्रचंड प्रमाणात वाढली आहेत-कारण ग्राहक बदलांना सरावले आहेत आणि घरी अन्नपदार्थ मागवल्यामुळे होणारे आर्थिक फायदेसुद्धा त्यांच्या लक्षात आले आहेत. बहुतांश भारतीय ऑर्डर करण्यापूर्वी पदार्थांच्या किंमती बघत असल्यानं बहुतांश डिलिव्हरी ॲप्सनी विशिष्ट मर्यादेपलीकडे पदार्थांची किंमत असणार नाही याची काळजी घेतली आहे. आकर्षक सवलती आणि स्मार्ट मार्केटिंग स्ट्रॅटेजीच यांचा वापर करून त्यांनी रेस्टॉरंट उद्योग आणि ग्राहक या दोघांचाही फायदा करून दिला आहे. 

या डिलिव्हरी ॲप्सनी केवळ खाद्य उद्योगात क्रांती घडवून आणली नाही, तर त्यांनी डिलिव्हरी पार्टनरशिप किंवा डिलिव्हरी सर्व्हिस यांच्याद्वारे मोठ्या रोजगारांची निर्मितीदेखील केली. स्विगी आणि इतर डिलिव्हरी ॲप्सच्या एकूण कामकाजविषयक परिणामकारतेमुळे फूड डिलिव्हरी या क्षेत्रातच नव्हे तर कोणत्याही वस्तूच्या डिलिव्हरीबाबत सोल्युशन्स पुरवली आहेत. लोक आता छोटी फी देऊन ते असलेल्या ठिकाणापासून त्यांच्या पाहिजे असलेल्या ठिकाणापर्यंत कुठेही वस्तू पाठवू शकतात. हेच मॉडेल नंतर डन्झो या ॲपने वापरले. मुंबई विद्यापीठातून शिक्षण घेतलेले कबीर बिश्वास यांनी जुलै २०१४मध्ये या कंपनीची स्थापना केली. 

फिनटेक कंपनीज (पेमेंट्स)
सन २०१६मध्ये झालेल्या नोटाबंदीनंतर फिन-टेक स्टार्टअप्स पेमेंट क्षेत्राची जोरदार वाढ झाली आहे. याचबरोबर झीरोढा आणि अपस्टॉक्ससारख्या डिस्काऊंट ब्रोकिंग ॲप्सकडेही नवीन गुंतवणूकदार वळून त्यांची वाढ झाली आहे. यापूर्वी पेमेंट्सची व्यवस्था ही बहुतांश बँका आणि त्यांच्या उपकंपन्यांकडून केली जायची. त्यामुळे या क्षेत्रात शिरकाव करणे नोटाबंदीपूर्वी कठीण होते. याचे कारण पाकिटातून पैसे काढून रोख पैसे देण्याऐवजी मोबाईल फोनद्वारे पेमेंट करण्याची सवय लोकांना लावणं अवघड होतं. ही सवय बदलण्याचं खूप मोठं श्रेय पेटीएम, गुगलपे, फ्रीचार्ज आणि रेझरपे यांच्यासारख्या कंपन्यांनी केलेल्या तंत्रज्ञानविषयक उपाययोजनांना जातं. यामध्ये अशा प्रकारच्या ॲप्लिकेशन्सना सपोर्ट करणारे अँड्रॉइड फोन्सचा वापर करण्यापासून सरकारनं ई-केवायसी प्रक्रियेसाठी आधार कार्डचा वापर करण्यासाठीचे योजलेले उपाय इथपर्यंतच्या अनेक गोष्टींचाही समावेश आहे.

याबरोबरच बुकिंग ॲप्स आणि ओटीटी प्लॅटफॉर्म्स यांनी तर लोकांच्या सवयींमध्ये प्रचंड बदल घडवले आहेत. त्यांच्याविषयी जाणून घेऊ पुढच्या आठवड्यात.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com