जुलै 2021पर्यंत फेसबुकचं ऑफिस बंदच राहणार; कंपनीने घेतला मोठा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
Friday, 7 August 2020

फेसबुकने काही ठिकाणी मर्यादीत लोकांसह कार्यालये उघडण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये अशा ठिकाणांचा समावेश आहे जिथं कोरोना व्हायरसची गेल्या दोन महिन्यात खूप कमी प्रकरणं आढळली आहेत. 

कॅलिफोर्निया - कोरोना व्हायरसमुळे (coronavirus) जगभरातील अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम (work from home) करण्यास सांगितलं आहे. लॉकडाऊनच्या काळात सुरु झालेलं हे वर्क फ्रॉम होम पुढेही सुरु ठेवण्याबाबत काही कंपन्या विचार करत आहेत. दरम्यान, आता फेसबुकने (Facebook) त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना जुलै 2021 पर्यंत वर्क फ्रॉम होमची ऑफर दिली आहे. याशिवाय फेसबुकने सर्व कर्मचाऱ्यांना घरीच ऑफिसमध्ये लागणाऱ्या आवश्यक साहित्य आणि खर्चासाठी 1 हजार डॉलर देणार आहे. फेसबुकच्या आधी गुगलनेसुद्धा त्यांच्या कर्मचाऱ्यांना जून 2021 पर्यंत वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली आहे. 

आतापर्यंत अनेक दिग्गज टेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास सांगितलं आहे. यामध्ये ट्विटरचाही समावेश आहे. ट्विटरने त्यांच्या कर्मचाऱ्यांना कोरोना व्हायरसचा धोका नाहीसा होईपर्यंत घरातून काम करण्याची मुभा दिली आहे. वर्षाच्या सुरुवातीपासूनच अनेक कंपन्यांचे कर्मचारी घरातून काम करत आहेत. 

हे वाचा - खासगी फाइल ठेवण्यासाठी ‘सेफ फोल्डर’, ‘गुगल’चं नवं फीचर

फेसबुकने म्हटलं आहे की, सरकार आणि आरोग्य तज्ज्ञांच्या गाइडलाइन्सनुसार आम्ही कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचा निर्णय घेतला आहे याबद्दल आम्ही चर्चा केली असून वर्क फ्रॉम होमचा कालावधी जुलै 2021 पर्यंत वाढवण्यात आला. कर्मचाऱ्यांना घरी लागणाऱ्या ऑफिसशी संबंधित साहित्य आणि खर्चासाठी वेगळे पैसेही देण्यात येणार आहेत. त्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना 1 हजार डॉलर वेगळे दिले जातील.

फेसबुकने काही ठिकाणी मर्यादीत लोकांसह कार्यालये उघडण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये अशा ठिकाणांचा समावेश आहे जिथं कोरोना व्हायरसची गेल्या दोन महिन्यात खूप कमी प्रकरणं आढळली आहेत.  दुसरीकडे अमेरिका आणि लॅटिन अमेरिकेत मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर 2020 च्या अखेरपर्यंत कार्यालये न उघडण्याचा निर्णय घेतला आहे. 

टेक्नॉलॉजीच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांमध्ये अमेरिका, ब्राझील, भारत यांचा क्रमांक लागतो. एकट्या अमेरिकेत कोरोनामुळे तब्बल दीड लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 50 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. भारतातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आतापर्यंत 20 लाखांहून अधिक लोकांना भारतात कोरोनाची लागण झाली असून 40 हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: facebook decision work from home till jully 2021 and 1 thousand dollar for office