Paytm नंतर Zomato आणि Swiggy ला गुगलने पाठवली नोटीस 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 1 October 2020

एकीकडे झोमॅटोने उत्तर दिलं असलं तरी स्विगीकडून मात्र अद्याप कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही.

नवी दिल्ली - फू़ड ऑर्डर डिलिव्हरी करणाऱ्या झोमॅटो आणि स्विगी या कंपन्यांना गूगलने एक नोटीस पाठवली आहे. दोन्ही कंपन्यांकडून प्ले स्टोअरच्या नियमांचे उल्लंघन केलं जात असल्याचं गूगलने म्हटलं आहे. यासह गूगलने दोन्ही कंपन्यांना त्यांच्या ऍपमध्ये नवं फीचर ऍड कऱण्यास सांगितलं आहे. झोमॅटो आणि स्विगीच्या आधी गूगलने ऑनलाइन पेमेंट ऍप पेटीएमवर मोठी कारवाई केली होती. कंपनीने प्ले स्टोअरवरून ऍप हटवलं होतं. पेटीएम जुगारासाठी वापरलं जात असल्याचा आरोप करत गूगलने कारवाई केली होती. मात्र काही तासातच पेटीएम पुन्हा प्ले स्टोअरवर उपलब्ध झालं होतं. 

हेही वाचा - मंगळावर पाण्याची सरोवरे; शास्त्रज्ञांच्या दाव्याने जीवसृष्टीबाबत चर्चांना उधाण

हेही वाचा - 
गूगलने दिलेल्या नोटीसीनंतर झोमॅटोच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, गूगलने आम्हाला नोटीस पाठवली पण ही पूर्णपणे चुकीची आहे. नोटीस अन्यायकारक आहे. आमची एक लहान कंपनी आहे. गूगलच्या नियमांनुसार आम्ही व्यवसाय करत आहे. गुगलने झोमॅटो प्रीमियर लीगचं फीचर बदलण्यास सांगितलं आहे आणि त्यावर आम्ही काम करत आहोत असंही झोमॅटोच्यावतीने सांगण्यात आले. 

हेही वाचा - गुगल लेन्सच्या मदतीने आपण गणिताचे प्रश्न सोडवू शकता

एकीकडे झोमॅटोने उत्तर दिलं असलं तरी स्विगीकडून मात्र अद्याप कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही. स्विगीच्या ऍपमधील फीचर गूगलने ब्लॉक केलं आहे. या प्रकरणी गूगलशी चर्चा सुरु असून गुगलनेदेखील यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. सध्या आयपीएलचा हंगाम सुरू असुन अनेक कंपन्या याचा फायदा घेत ग्राहकांना ऑफर देत आहेत. यासाठी खेळाशी संबंधित काही फीचर्स ऍपमध्ये ऍड केली जात आहेत. मात्र यात ऑफर दिली जात असताना जुगार, लॉटरी सारख्या ऑफर दिल्याने नियमांचे उल्लंघन होत असल्याचं गुगलचं म्हणणं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Google send notification to zomato & Swiggy after paytm