गाडीवर मागे बसणाऱ्यासाठी होणार बदल, सरकारचा नवा आदेश

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जुलै 2020

गेल्या काही वर्षामध्ये रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने सुरक्षा लक्षात ठेवून अनेक नियम बदलले आहेत. यातील काही नियम लागूसुद्धा करण्यात आले आहेत.

नवी दिल्ली - गेल्या काही वर्षामध्ये रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने सुरक्षा लक्षात ठेवून अनेक नियम बदलले आहेत. यातील काही नियम लागूसुद्धा करण्यात आले आहेत. मंत्रालयाने आता नवी नियमावली प्रसिद्ध केली असून दुचाकीवरून जाणाऱ्यांसाठी हे नियम असणार आहेत. याबाबत सविस्तर माहिती घेऊ. 

मंत्रालयाच्या नियमावलीनुसार दुचाकीच्या दोन्ही बाजूला चालकाच्या सीटच्या मागे हँड होल्ड असतील. मागे बसणाऱ्या लोकांच्या सुरक्षेसाठी हे लावण्यात येणार आहेत. आतापर्यंत अनेक बाइकमध्ये अशी सुविधा नव्हती. यासह मागे बसणाऱ्या व्यक्तीसाठी दोन्ही बाजूला फूट रेस्ट बंधनकारक करण्यात आले आहेत. याशिवाय बाइकच्या मागील चाकाच्या डाव्या बाजुला गार्ड लावण्यात यावा. ज्यामुळे मागे बसणाऱ्यांचे कपडे मागच्या चाकामध्ये अडकणार नाहीत. आजतकने या नव्या नियमावलीच्या फोटोसह वृत्त दिले आहे.

हे वाचा - BS4 वाहनांच्या रजिस्ट्रेशन प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला आदेश

मंत्रालयाने दुचाकीमध्ये लहानसा कंटेनरही लावण्याचे आदेश दिले आहेत. या कंटेनरची लांबी 550 मिमी, रुंदी 510 मिमी आणि उंची 500 मिमी पेक्षा अधिक नसावी. सरकार वेळोवेळी या नियमांमध्ये बदल करत राहील असंही म्हटलं आहे. 

याआधीही सरकारने गाडीच्या स्टेफनीबाबत नियमावली जारी केली होती. यानुसार 3.5 टनापर्यंतच्या वाहनांसाठी टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिमचा सल्ला दिला आहे. या सिस्टिममध्ये सेन्सरच्या माध्यमातून ड्रायव्हरला चाकांमधील हवेची स्थिती समजेल. याशिवाय चाक दुरुस्ती करण्याचं किट गाडीत असल्यास स्टेफनी असण्याची आवश्यकता नाही असंही मंत्रालयाने म्हटलं आहे. 

हे वाचा - मारुती सुझुकी 7 सीटर WagonR लाँच करण्याच्या तयारीत?

देशात कार्बनच्या उत्सर्जनात होणाऱ्या वाढीच्या पार्श्वभूमीवर केंद्राला पर्यावरणाची काळजी लागली आहे. यामुळे भारत इलेक्ट्रिक व्हेइकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उपाय करत आहे. नव्या सुधारणेनुसार इलेक्ट्रिकल व्हेइकलच्या मोठ्या बॅटरीला ठेवण्यासाठी रिकामी जागा आवश्यक आहे. ज्यामुळे व्हेइकलची रेंजही वाढवता येईल. यासाठी गाडीत स्पेअर टायरची जागा बॅटरीसाठी वापरता येईल. देशात इलेक्ट्रिक व्हेइकल खरेदी कऱणाऱ्यांसमोर मायलेजची सर्वात मोठी चिंता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian ministry of road transport highways guidelines for bike sitting