पेट्रोल-डिझेल दर वाढीची चिंता सोडा; येत आहे महिंद्राची स्वस्त इलेक्ट्रिक कार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 जुलै 2020

महिंद्रा इलेक्ट्रिक चालू आर्थिक वर्षात तीन नव्या इलेक्ट्रिक गाड्या लाँच करण्याची तयारी करत आहे. या तीन गाड्यांमध्ये एक Mahindra Atom चा समावेश आहे.

नवी दिल्ली - देशात सुमारे महिन्याभरापासून पेट्रोल-डिझेलचे दर वाढत चालले आहेत. इतिहासात पहिल्यांदाच डिझेलचे दर पेट्रोलपेक्षाही महाग झाले होते. त्यामुळे वाहनधारकांना प्रवास करणं खर्चिक बनलं आहे. सातत्याने वाढणाऱ्या किंमतीमुळे हैराण झालेल्यांसाठी आता खूशखबर आहे. महिंद्राची सर्वात स्वस्त अशी इलेक्ट्रिक कार लवकरच बाजारात येणार आहे. महिंद्रा इलेक्ट्रिक चालू आर्थिक वर्षात तीन नव्या इलेक्ट्रिक गाड्या लाँच करण्याची तयारी करत आहे. या तीन गाड्यांमध्ये एक Mahindra Atom चा समावेश आहे. ही इलेक्ट्रिक क्वॉड्रिसायकल असून वर्षाअखेरीस लाँच केली जाईल. लाँच करण्याआधी कंपनीने एक टीझर व्हिडिओ प्रसारीत केला आहे. यामध्ये  Mahindra Atom Electric कारच्या खास फीचर्सची माहिती देण्यात आली आहे. कंपनीने दावा केला आहे की, यामध्ये जास्त इंटेरिअर स्पेस आणि कम्फर्ट मिळेल. याशिवाय लगेज लोड करणंही सोपं असेल. महिंद्राच्या या लहान इलेक्ट्रिक कारची सविस्तर माहिती जाणून घेऊ. 

महिंद्रा अ‍ॅटमला फेब्रुवारीमध्ये ऑटो एक्स्पोच्या प्रदर्शनात ठेवलं होतं. टॉल स्टेन्स असलेली ही इलेक्ट्रिक क्वॉड्रिसायकल लांब काच आणि सेफ एन्क्लोजरसह मिळते. यामध्ये काही आकर्षक अशी डिझाइन इलिमेंट्स देण्यात आली आहेत. ज्यामध्ये क्लिअर- लेन्स हेडलॅम्प, फ्रंट आणि रिअर बंपर वर रिफ्लेक्टर स्ट्रिप्स, मोठी विंडशील्ड, बॉडी कलर आऊट साइड रियर व्ह्यू मिरर्स, बोल्ड साइड क्रीज आणि ट्रिपल पॉड टेललॅम्प यांचा समावेश आहे. 

हे वाचा - Samung च्या टीव्हीवर दीड लाखांचे 2 मोबाईल फ्री; सोबत 15 हजारांची कॅशबॅक ऑफर​

देशातील सर्वात लहान असलेल्या या इलेक्ट्रिक कारला दोन दरवाजे आहेत. यामध्ये ड्रायव्हरसह 4 लोकांना प्रवास करता येतो. पुढे फक्त ड्रायव्हर सीट असून मागच्या बाजूला 3 लोकांना बसण्यासाठी सीट आहे. 

महिंद्रा अ‍ॅटममध्ये 15kw इलेक्ट्रिक मोटर आणि लिथियम - आयन बॅटरी पॅक दिली जाण्याची शक्यता आहे. कॉन्सेप्ट मॉडेलप्रमाणेच प्रॉडक्शन रेडी व्हर्जनमध्येही स्वॅप करता येईल अशा बॅटरी पॅकची व्यवस्था असण्याची शक्यता आहे. महिंद्रा अ‍ॅटम इलेक्ट्रिक सर्वाधिक वेग 70 किमी प्रतितास इतका असेल असं कंपनीने सांगितलं आहे. तसंच याची बॅटरी 4 तासात पूर्ण चार्जिंग करता येईळ. या इलेक्ट्रिक क्वाड्रिसायकल बॅटरीसाठी अ‍ॅडव्हान्स थर्मल मॅनेजमेंट सिस्टिम देण्यात येणार आहे. 

हे वाचा - Realme च्या X3 सीरिजचा भारतातील पहिला ‘सेल’, जाणून घ्या SuperZoom स्मार्टफोनचे जबरदस्त फीचर्स आणि किंमत

देशातील पहिली इलेक्ट्रिक क्वाड्रिसायकल म्हणून महिंद्रा अ‍ॅटमची ओळख असेल. या गाडीची एक्स शोरूम किंमत जवळपास 3 लाख रुपये असू शकते. जर अ‍ॅटमची किंमत एवढीच राहिली तर देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार ठरणार आहे. अ‍ॅटम एक लो व्होल्टेज इलेक्ट्रिक व्हेइकल आहे. या कारची निर्मिती हैद्राबाद इथं करण्यात येत आहे. 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mahindra atom electric car know feature and details