esakal | कापसाच्या दर्जासाठी डिजिटल रुई उतारा जिनिंग मशिन! ICAR ने केले विकसित
sakal

बोलून बातमी शोधा

कापसाच्या दर्जासाठी डिजिटल रुई उतारा जिनिंग मशिन! ICAR ने केले विकसित

रुईच्या टक्‍केवारीनुसार कापसाचा दर्जा ठरविण्यासाठी डिजिटल रुई उतारा सूचक लघू जिनिंग यंत्र मुंबई येथील केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे.

कापसाच्या दर्जासाठी डिजिटल रुई उतारा जिनिंग मशिन! ICAR ने केले विकसित

sakal_logo
By
प्रदीप बोरावके : सकाळ वृत्तसेवा

माळीनगर (सोलापूर) : रुईच्या टक्‍केवारीनुसार कापसाचा (Cotton) दर्जा ठरविण्यासाठी डिजिटल रुई उतारा सूचक लघू जिनिंग यंत्र (Digital mini ginning machine) मुंबई (Mumbai) येथील केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेतील (Central Cotton Technology Research Institute) (ICAR) शास्त्रज्ञांनी (Scientists) विकसित केले आहे. शेतकऱ्यांना कापसाच्या गुणवत्तेवर आधारित विपणनाला (Marketing) प्रोत्साहन देण्यासाठी हे यंत्र निश्‍चितच फायदेशीर ठरेल, असा विश्वास आयसीएआरला वाटतो.

हेही वाचा: MG Astor SUV भारतात लाँचिंगसाठी सज्ज; काय आहेत फीचर्स? वाचा

कापूस हे आपल्या देशातील महत्त्वाचे नगदी पीक आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे जीवनमान कापसाला मिळणाऱ्या दरावर अवलंबून असते. भारतात पारंपारिकरित्या कापसाची खरेदी- विक्री ग्रेड ठरवून केली जाते आणि ग्रेडनुसार कापसाला हमीभाव दिला जातो. हमीभाव ठरविताना धाग्याची लांबी, तलमता, ताकद आणि ओलाव्याचे प्रमाण हेच घटक ग्राहय धरले जातात. मात्र, जगभरात कापसाचा व्यवहार हा त्यात असलेल्या रुईच्या टक्‍केवारीप्रमाणे होतो. परंतु, भारतात कापसाची विक्री करताना रुईचा उतारा लक्षात घेलता जात नाही. तसे पाहिले तर रुईचा उतारा हा कापसाचा दर ठरविताना प्रमुख घटक असायला हवा.

कापसाची खरेदी- विक्री सुमारे 34 टक्‍के रुईचा उतारा गृहित धरून केली जाते आणि त्यानुसारच प्रचलित किमान समर्थन मूल्य शेतकऱ्यांना दिले जाते. सद्य:परिस्थितीत कापसात 40 ते 42 टक्‍क्‍यापर्यंत रुईचे प्रमाण असलेले अनेक वाण दिसून येतात. तसेच रुई आणि सरकीच्या दरात मोठी तफावत आहे. रुईचा दर साधारणपणे सरकीच्या जवळजवळ पाच ते सहापट जास्त असतो. रुईच्या उताऱ्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांना जास्त आर्थिक लाभ होऊ शकतो. परंतु, रुईचा उतारा कापसाचा दर ठरविताना ग्राह्य धरत नसल्यामुळे त्याचा लाभ व्यापाऱ्यांच्या खिशात जातो आणि शेतकरी या लाभापासून वंचित राहतात.

हेही वाचा: 2021 Force Gurkha दमदार SUV, लवकरच होतेय लॉंच; पाहा फीचर्स

शेतकऱ्यांना त्यांनी पिकविलेल्या कापसाच्या दर्जानुसार आणि त्यातील रुईच्या प्रमाणानुसार दर मिळणे आवश्‍यक आहे. सध्या कापूस व्यापार आणि उदयोगात शेतकऱ्यांकडून कापसाच्या गुणवत्तेवर आधारित विपणनाला प्रोत्साहन देण्यासाठी रुईच्या टक्‍केवारीच्या आधारावर वस्तुनिष्ठ श्रेणीकरण करण्याची मागणी वाढत आहे. परंतु, असे करण्यासाठी बाजार समित्या आणि जिनिंग कारखान्यामध्ये रुईचे प्रमाण मोजण्यासाठी आधुनिक पोर्टेबल लघू जिनिंग यंत्राची आवश्‍यकता आहे. जेणेकरुन तत्काळ आणि अचूक पदध्तीने रुईची टक्‍केवारी निर्धारित करता येईल.

प्रचलित पद्धतीनुसार बाजार समित्या आणि जिनिंग कारखाने काही प्रमाणात सिरकॉट, मुंबईने विकसित केलेल्या लघु जिनिंग यंत्राचा वापर करतात. मात्र, या यंत्राचाही वापर म्हणावा तसा झालेला दिसून येत नाही. कारण त्यामध्ये जिनिंग केल्यानंतर रुई आणि सरकीचे स्वतंत्रपणे वजन करावे लागते आणि नंतर रुईच्या टक्‍केवारीची गणना करावी लागते. त्यामुळे अधिकचा वेळ आणि श्रमही लागते. या समस्येवर मात करण्यासाठी केंद्रीय कापूस तत्रज्ञान संशोधन संस्थेतील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. व्ही. जी. आरुडे यांनी लघू जिनिंग यंत्रामध्ये सुधारणा करुन त्यावर डिजिटल रुई उतारा सूचक यंत्र (डीजीपीआय) बनविले आहे. जेणेकरुन रुईची अचूक टक्‍केवारी वास्तविक वेळेत या यंत्रावर दर्शाविली जाईल. या इलेक्‍ट्रॉनिक उपकरणामध्ये प्रामुख्याने लोड सेल्स, जीओसी- पीलसी सेटअप, इलेक्‍ट्रानिक डिस्प्ले युनिटचा उपयोग केला आहे.

या प्रणालीमुळे रुईची टक्‍केवारी अगदी अचूक पद्धतीने दर्शविली जाते. येणाऱ्या काळात जिनिंग रुई उतारा सूचक लघू ओटाई यंत्र हे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरु शकेल. 34 टक्‍के रुईपेक्षा एक टक्‍का जरी रुईचे प्रमाण जास्त असेल तर कापसाचा दर प्रतिक्विंटल 100 रुपयांनी जास्त मिळू शकतो. त्यामुळे कापसाला योग्य मोबदला मिळण्यासाठी अश्‍या प्रकारच्या यंत्राना आणि रुई टक्‍केवारी आधारित कापूस विक्रीला प्रोत्साहन द्यायला हवे.

- डॉ. व्ही. जी. आरुडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ, केंद्रीय कापूस तत्रज्ञान संशोधन संस्था, मुंबई

loading image
go to top