'किंग कॅम्प जिलेट' यांना आजच्या दिवशी मिळाले होते सेफ्टी रेझरचे पेटंट

१९०४ ला आजच्याच दिवशी ‘किंग कॅम्प जिलेट’नं सेफ्टी रेझरचं पेटंट घेतलं होतं त्या निमित्तानं सहज.
King Camp Gillette
King Camp Gilletteesakal
Summary

१९०४ ला आजच्याच दिवशी ‘किंग कॅम्प जिलेट’नं सेफ्टी रेझरचं पेटंट घेतलं होतं त्या निमित्तानं सहज.

राम-लक्ष्मण वनवासात असताना देखील ‘क्लिन शेव्ह’ राहायचे कारण त्यांनी सोबत ‘जिलेट रेडिशेव्हर’ नेलं होतं” असा पिजे मध्यंतरी वाचनात आला. पिजेच तो. पण याने मनातले कुतूहल मात्र चाळवले. मानवी आयुष्यातल्या या छोट्यामोठ्या गोष्टींना एक ‘मोठ्ठा इतिहास’ आहे याची जाणीव झाली. अश्मयुगापासून अगदी यंत्रयुगापर्यंत अगदी वैयक्तिक दैनंदिन कामकाजातले क्षण असोत वा सामुहिक विकास असंख्य छोट्यामोठ्या प्रसंगांनी-प्रयोगांनी माणसाचं आयुष्य बदलवून टाकलंय. शेव्हिंगचा इतिहासही तितकाच जुना आहे जितका माणूस. अश्मयुगीन असो वा आजचा आधुनिक माणूस.

चेहऱ्यावरचे केस अर्थात ‘दाढी’ काढण्याची गरज वैयक्तिक आवडीनिवडी व्यतिरिक्त कधी गरज, कधी संस्कृती तर कधी फॅशन या गोष्टींवर अवलंबून राहिलीये. विज्ञानविश्वातल्या प्रचंड तांत्रिक प्रगतीमुळे आजमितीस आपल्या दिमतीला आधुनिक सुरक्षित रेजर, ट्रिमर, लेझर उपलब्ध आहेत, पण अर्थातच हे सगळं एकदम आलेलं नव्हतं. चला आज या प्रवासाचीच गोष्ट सांगतो.

King Camp Gillette
सॅक्सोफोनची निर्मिती करणाऱ्या 'अडॉल्फ सॅक्स' यांची कहाणी

अश्मयुगीन माणूस दगड घासून त्याला धारदार बनवत वेगवेगळी हत्यारे बनवू लागला आणि दैनंदिन कामासाठी या दगडांना विविध आकार देत वेगवेगळे प्रयोग करू लागला. अर्थात ‘दिसणं’ हा उद्देश नसला तरी घाम-संक्रमण यापासून बचावासाठी तो या धारदार दगडांच्या मदतीनं शेव्हिंग करू लागला. आजही काही आदिम प्रजातीत दगडाचा असा वापर केला जातो. समुद्रकिनारी राहणाऱ्या मानवाने दोन शिंपल्यांना एकत्र करून त्याला चिमटीसारखं वापरत ‘ट्विझर’ तयार करून ‘दाढी करणं’ साध्य केलं. हळूहळू मानवी संस्कृती विकसित होत गेली आणि आले कांस्ययुग. आता दगडी अवजड वस्तू जाऊन धातूचा वापर वाढू लागला. इजिप्तच्या पिरॅमिड्समध्ये असंख्य गुपितं सापडली, यात काही ममीजसोबत शेव्हिंगचं साहित्यही आढळले. वेगवेगळं साहित्य-यंत्र-उपकरणं तयार होण्याच्या याच काळात आजच्या आधुनिक रेझरची पाळंमुळे दडलीयेत.

रोमन लोकांनी यात संख्यअसंख्य प्रयोग केलेत. याच काळात साबणाचा शोध लागला आणि ‘केशकर्तनकार’ या समुहाचाही उदय झाला. दाढी करतांना साबण किंवा तत्सम पदार्थ वापरून चेहरा ओला करत ‘वेट’ शेव्हिंगचा ट्रेंड तेव्हाच सुरू झाला. अनेकदा काही केशकर्तनकार गरम पाण्यात भिजवलेला टॉवेल ग्राहकाच्या चेहऱ्यावर ठेऊ लागले. सतरावं शतक उजाडलं आणि माणसाच्या हातात ‘वस्तरा’आला. याचा जन्म इंग्लंडस्थित ‘शेफिल्ड’ इथं झाला आणि हळूहळू जगभर पसरला. अर्थात यातही अनेक प्रयोग झाले. १७४०पर्यंत यात स्टीलचा वापर केला जाऊ लागला. वस्तरा वजनानं हलका आणि सुलभ झाला.

King Camp Gillette
जेनेटिक कोडवर विशेष संशोधन करणाऱ्या 'डॉ. हरगोविंद खुराणा' यांची कहाणी

दरवेळी दगडावर घालून धार देण्याची विवंचना संपली. आजही जगभरातल्या केशकर्तनकार मंडळीत हाच वस्तरा लोकप्रिय आहे, दरवेळी वस्तरा बदलण्याऐवजी यातलं ‘ब्लेड’ बदलण्याची सुविधा आली एवढंच. हा वस्तरा तुलनेत सोपा असला तरी याचा वैयक्तिक वापर तितकासा ‘सहज’ नसल्यानं बहुसंख्य लोकांना शेव्हिंग करण्यासाठी केशकर्तनकाराकडे जावे लागत असे. कुणाच्या तरी मदतीशिवाय हा ‘वस्तरा’ वापरणं थोडं अवघड होतं-दुसरं यात किंचित हात इकडंतिकडं झाला तरी त्वचा कापली जाण्याची शक्यता होती, त्यामुळे अनेक ठिकाणी हा वस्तरा ‘कट थ्रोट रेझर’ अर्थात ‘गळेकापू’ म्हणून ओळखला जाऊ लागला. याची तिसरी समस्या धारेबद्दल होती.

१८९५ ला ‘किंग कॅम्प जिलेट’ यांनी पहिलंवहिलं सुरक्षित रेझर ब्लेड बनवलं. या ‘जिलेट’ महोदयांचा जन्म ५ जानेवारी१८७१ चा. घराला आग लागली म्हणून त्यांना आपला मुक्काम शिकागोला हलवावा लागला. तिथं त्यांनी लोखंडी वस्तू विक्री सुरू केली. तेव्हा तिथं त्याला एका कर्मचाऱ्यानं त्याला एक सल्ला दिला, “मालक, लोकं माल घेऊन जातात परत येत नाहीत, अशी एखादी वस्तू विकली पाहिजे जी वापरून फेकता येईल आणि ग्राहकाला आपल्याकडं वारंवार यावं लागेल.” आणि वरवर ‘कुछभी’ वाटणाऱ्या या कल्पनेतून जन्म झाला ‘ब्लेड’चा. हा एक क्रांतिकारी शोध ठरला.

King Camp Gillette
माकडांवर प्रयोग करुन प्रेमभावनेचा शास्त्रीय उलगडा करणाऱ्या अवलियाची गोष्ट!

या ब्लेडचं वैशिष्ट्य म्हणजे हे चटकन विल्हेवाट लावण्याजोगं अर्थात ‘डिस्पोजेबल’ होतं. वारंवार धार देण्याऐवजी थेट ब्लेड बदलणे सहजसोपं झाले. यामुळे दाढी करणंही सहज झाले. सोबतच चेहऱ्यावर इजा होण्याची शक्यताही प्रचंड कमी झाली. १९०३ साली जिलेटने ५१ रेझर आणि १६८ ब्लेड विकले. १९०४ संपेपर्यंत हा आकडा जवळपास ९० हजार रेझर आणि १ करोड २४ लाख ब्लेड पर्यंत गेला आणि जिलेटने बाजारावर पकड मिळवली.

अल्पावधीतच ‘जिलेट’ बोलबाला झाला. १९०४ ला त्यांनी या रेझरचे पेटंट घेतले. यानंतर त्यांच्या लोकप्रियतेचा कहर म्हणजे पहिल्या विश्वयुद्धात त्यांना थेट अमेरिकन सैनिकांसाठी बल्क ऑर्डर मिळाली. इतर मंडळीही ब्लेड बनवू लागले तसे जिलेटने नवी व्यावसायिक चाल खेळत “ब्लेड स्वस्त केले आणि रेझर महाग.” आता त्यांची लोकप्रियता शिखरावर असल्याने लोकं नाव बघून महाग रेझरही घेऊ लागले आणि दुसरं रेझर घेतलं तरी ब्लेड मात्र यांचेच वापरू लागले. कंपनीचा फायदा ‘दुप्पट’ झाला. १९२५ ला जिलेटनं ‘सेफ्टी रेझर’ आणत ब्लेडचा त्वचेशी होणारा कोन साधला आणि ब्लेडची काढघालही सोपी करत ब्लेड अधिक पातळ केले. यामुळे इजा होण्याचा धोका अत्यल्प झाला.

King Camp Gillette
'एक्स-रे' चा शोध लावणाऱ्या विल्यम रॉंटजेन यांची कहाणी

१९५७ ला जिलेटने यात ‘ॲडजस्टमेंट डायल’ आणले. ज्यामुळे चेहऱ्याच्या आकारानुसार रेझर आपोआप फिरू लागले. १९६५ ला ते ‘टॅक्मॅटिक’ रेझर घेऊन आले. ज्यातल्या बॅंडमुळे ब्लेड ॲडजस्ट करणे शक्य झाले आणि एकाच ब्लेडमुळे पाचेक वेळा शेव्हिंग करता येत असल्याने अंतराळवीर मंडळींना ते नेणे सोयीचं झाले. जिलेटने आता हळूहळू प्रत्येक घरात शिरकाव केला आणि त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते निरंतर प्रयोग करत गेले.

दरम्यानच्या काळात १९३० ला ‘जेकब शिक’ यानं पहिलं इलेक्ट्रिक रेझर बनवलं होते. त्यातही नित्यनेमाने वेगवेगळे प्रयोग होत गेले पण याच्या वापराला नेहमी मर्यादा राहिल्या. १९७१ ला जिलेटने ‘जुळं ब्लेड’ अर्थात ट्विन ब्लेड आणले आणि दरवेळी चारवेळा चेहऱ्यावर रेझर फिरवणे बंद झाले. जिलेट इथंच थांबले नाही १९९८ ला ते थेट ‘तिळं ब्लेड’ ट्रिपल ब्लेड घेऊन आले. २००६ ला जिलेटने ‘फ्युजन फाईव्ह’ आणले म्हणजे पाच ब्लेडचं रेझर यामुळे सफाई अधिकच सुक्ष्म झाली.

King Camp Gillette
पहिल्यांदाच सूक्ष्मजंतू व आदिजीवांचे निरीक्षण करणाऱ्या लेव्हेनहूक यांची कहाणी

२०१४ ला ते ‘फ्लेक्सवॉल’ तंत्रज्ञान घेऊन आले ज्यामुळे रेझर अधिकच लवचिक झाले. आज घरटी जे सहजसोपे ‘सेफ्टी रेझर’ दिसतायेत. ब्रॅंड वेगवेगळे असले तरी ‘देण’ जिलेटचीच आहे. कंपनीची टॅगलाईनच प्रचंड बोलकी आहे,” आम्ही रेझर बनवणं सोडून देऊ, जर आम्ही ते अजून उत्कृष्ट बनवू शकलो नाही”. जिलेटचे प्रयोग-संशोधन अजूनही थांबले नाहीत. नवनवीन कल्पनांवर ते सातत्यानं काम करत राहतात. तुर्तास जुन्या राजे-साधू मंडळीप्रमाणे कोरिव किंवा मोठ्ठी ‘दाढी’ राखण्याची फॅशन पुन्हा आलीये. मोदींपासून विराट कोहलीपर्यंत ‘दाढी’ इजे न्यू नॉर्मल.

यामुळेच कदाचित कंपनीने ‘क्लोज शेव्ह’चा नारा सोडून ‘क्विक ॲंड कम्फर्टेबल’ या शब्दांवर जोर देत आपला ग्राहकवर्ग अजूनही बांधून ठेवलायं. १९०४ ला आजच्याच दिवशी ‘किंग कॅम्प जिलेट’नं सेफ्टी रेझरचं पेटंट घेतलं होतं त्या निमित्तानं सहज.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com