TikTok चीनवर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत? कंपनी करतेय 'हा' विचार

सूरज यादव
शनिवार, 11 जुलै 2020

भारताने चिनी अॅप असलेल्या टिकटॉकवर सुरक्षेच्या कारणास्तव देशात बंदी घातली आहे. दरम्यान आता अशी माहिती समोर येत आहे की, अमेरिकासुद्धा अशीच पावले उचलण्याची शक्यता आहे. 

नवी दिल्ली - भारताने चिनी अॅप असलेल्या टिकटॉकवर सुरक्षेच्या कारणास्तव देशात बंदी घातली आहे. दरम्यान आता अशी माहिती समोर येत आहे की, अमेरिकासुद्धा अशीच पावले उचलण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियानेही अशा हालचाली सुरू केल्या आहेत. दरम्यान, बाइटडान्सने त्यांच्या कार्पोरेट स्ट्रक्चरमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतल्याचं समजत आहे. कंपनीकडून सांगण्यात आलं आहे की, कार्पोरेट स्ट्रक्चर बदलण्याचा विचार करत आहे. जगातील अनेक देश टिकटॉक चीनमधून चालवण्याबाबत आक्षेप घेत असल्याच्या पार्श्वभूमीवर कंपनी असा विचार करत असल्याचं म्हटलं जात आहे.

कंपनीचे वरिष्ठ अधिकारी याबाबत चर्चा करत आहेत. नवीन व्यवस्थापकीय मंडळ तयार करण्यावर आणि चीनबाहेर इतर कोणत्याही देशात मुख्यालय स्थापन करण्याचा विचार सुरू आहे. कंपनीकडून अशी पावले उचलण्यामागे त्यांचे नाव चीनशी जोडल्यानं होणारं नुकसान हे कारण असू शकतं. टिकटॉकचे मुख्यालय बाइटडान्सच्या बिजिंगममधील मुख्यालयातच आहे. 

हे वाचा - इन्स्टाग्रामचं नवं फीचर, Reels मधून असे तयार करा TikTok सारखे व्हिडिओ

आता टिकटॉक त्यांचे वेगळे मुख्यालय करण्यासाठी अनेक जागांचा विचार करत आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार टिकटॉकची सर्वात मोठी कार्यालये सध्या लॉस एंजिलिस, न्यूयॉर्क, लंडन, डब्लिन आणि सिंगापूरमध्ये आहेत. टिकटॉकने म्हटलं आहे की, आम्ही आमच्या युजर्स, कर्मचारी, कलाकार, क्रिएटर्स, पार्टनर याचे हित लक्षात घेऊन वाटचाल करत आहे. 

हे वाचा - Whatsapp, Facebook, Instagram बाबत घेतला जाऊ शकतो मोठा निर्णय

अमेरिकन सरकारने मंगळवारी सांगितलं की, त्यांच्या देशातही टिकटॉकवर बंदी घालण्याचा विचार सुरू आहे. अमेरिकेकडून या हालचाली म्हणजे चीनविरुद्ध उचलण्यात येणारं पाऊल असल्याचं म्हटलं जात आहे. कोरोना व्हायरसबाबत चीनच्या भूमिकेवर अमेरिकेने सातत्याने टीका केली आहे. ट्रम्प यांनी चीनविरोधात अनेक निर्णय गेतले आहेत. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पियो यांनी देशवासियांना अॅप डाउनलोड न करण्याचं आवाहन केलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की, अॅपच्या माध्यमातून त्यांचा डेटा चीनच्या कम्युनिस्ट पार्टीला मिळू शकतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tiktok may move headquarter from china to another country