
Used Cars : देशात सेकंड-हँड गाड्यांचं मार्केट डाऊन, नवीन गाड्यांची होतेय जबरदस्त विक्री! जाणून घ्या कारण
देशात सध्या नवीन चारचाकी खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढत आहे. विशेष म्हणजे, लोकांनी सेकंड-हँड किंवा वापरलेल्या गाड्या घेण्याकडे पाठ फिरवली आहे. यामुळे कार्स-२४ किंवा कार देखो अशा कंपन्या सध्या तोट्यात चालल्या आहेत.
इकॉनॉमिक टाईम्सच्या एका रिपोर्टमध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे. २०२१, २२ या वर्षांमध्ये कोरोना आणि रशिया-युक्रेन युद्ध अशा बऱ्याच जागतिक अडचणी समोर आल्या होत्या. यातच सेमिकंडक्टरच्या कमतरतेमुळे नवीन गाड्या तयार होण्याचे प्रमाणही घटले होते. अशा वेळी जुन्या गाड्यांचा बिझनेस चांगला चालला होता.
मात्र, आता जग पूर्वपदावर आलं आहे. गाड्यांचे उत्पादनही वाढले आहे, आणि लोकांची खरेदी क्षमताही. त्यामुळे २०२२-२३ (एप्रिल-मार्च) या कालावधीत सुमारे ४० लाख नव्या गाड्यांची विक्री झाली आहे. एकीकडे लोक मोठ्या प्रमाणावर आपल्या जुन्या गाड्या विकत आहेत. तर दुसरीकडे, लोक सेकंड हँड गाड्या खरेदी करण्याकडे मात्र पाठ फिरवत आहेत.
या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून सेकंड हँड गाड्या विकणाऱ्या कित्येक मोठ्या कंपन्या सध्या तोट्यात जात आहेत. कार्स२४ (Cars24), कार देखो (CarDekho), स्पिन्नी (Spinny) अशा कंपन्या सध्या आपला विस्तार करण्याऐवजी आहे त्या शहरांमधील सेवेवर लक्ष देत आहेत.
कार्स२४ ही वेबसाईट एका महिन्यात सुमारे ५ हजार जुन्या गाड्या विकत आहे. तर, स्पिन्नीच्या बाबतीत हीच संख्या ६,५०० एवढी आहे. गेल्या सहा महिन्यांपासून या संख्येत ना वाढ दिसत आहे, ना घट. या बिझनेसमध्ये प्रॉफिट नसल्याचं कारण देत कार देखो वेबसाईटने वापरलेल्या गाड्यांची विक्री बंद केली आहे.