Whatsapp बॅकफूटवर; 8 फेब्रुवारीनंतरही युजर्सचं अकाऊंट सुरु राहणार, प्राइव्हसी अपडेट पॉलिसी स्थगित

सकाळ ऑनलाइन टीम
Saturday, 16 January 2021

व्हॉट्सअपच्या या निर्णयाचे नकारात्मक परिणाम दिसायला मिळाले. अनेक युजर्सनी व्हॉट्सअप सोडण्याचा निर्णयही जाहीर केला होता. भारतात व्हॉट्सअपचे 40 कोटींहून अधिक ग्राहक आहेत.

नवी दिल्ली- प्रचंड टीका आणि विरोधाचा सामना केल्यानंतर इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप्लिकेशन व्हॉट्सअपने आपली नवी डेटा-शेअरिंग पॉलिसी सध्या स्थगित केली आहे. नव्या पॉलिसीत फेसबुक आणि इन्स्टाग्रामचे इंटिग्रेशन जास्त होते. त्यामुळे युजर्सला व्हॉट्सअप डेटा फेसबुकवरुनही शेअर करता येतो. व्हॉट्सअपची मालकी फेसबुककडे आहे. व्हॉट्सअपच्या गोपनीय नितीमुळे नाराज झालेल्या युजर्सनी टेलिग्राम अ‍ॅप आणि सिग्नल अ‍ॅपकडे झुकले होते. त्यामुळे अखेर व्हॉट्सअपने आपली प्रायव्हसी पॉलिसी अपडेट स्थगित करण्याची घोषणा केली आहे. 

नवीन अटी आणि नियम स्वीकारण्यासाठी निश्चित केलेली 8 फेब्रुवारी ही अंतिम तारीख व्हॉट्सअपने सध्या पुढे ढकलली आहे. प्रायव्हसी आणि सुरक्षेवरुन युजर्समध्ये असलेल्या भ्रामक शंका दूर करणार असल्याचे व्हॉट्सअपने म्हटले आहे. एका ब्लॉगपोस्टमध्ये व्हॉट्सअपने म्हटले आहे की, आम्हाला अनेकांकडून समजले आहे की, आमच्या नव्या अपडेटमुळे संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. या अपडेटच्या माध्यमातून आम्ही फेसबुकबरोबर आधीपेक्षा जास्त डेटा शेअर करणार नाही. यापूर्वी व्हॉट्सअपने ते किंवा फेसबुक युजर्सचा कोणताही मेसेज किंवा कॉल पाहू शकत नसल्याचे एका ब्लॉगच्या माध्यमातून स्पष्ट केले होते. 

हेही वाचा- धोकादायक 50 पासवर्ड ज्यामुळे होऊ शकते फसवणूक; चेक करा तुम्हीही ठेवलाय का?

व्हॉट्सअपने 4 जानेवारीला 'इन अ‍ॅप' अधिसूचनेच्या माध्यमातून नवीन प्रायव्हसी नीति घोषित करताना आपल्या यूजर्सला सेवा-शर्ती आणि गोपनीयता नीतिबाबत अपडेट देण्यास सुरुवात केली होती. व्हॉट्सअपने ते युजर्सला डेटा प्रोसेसबाबत आणि ते फेसबुकबरोबर कशा पद्धतीने शे्र करतात याची माहिती दिली होती. व्हॉट्सअपची सेवा सुरु ठेवण्यासाठी युजर्सला 8 फेब्रुवारी 2021 पर्यंत नवीन अटी व नीतिशी सहमती द्यायची होती. 

व्हॉट्सअपच्या या निर्णयाचे नकारात्मक परिणाम दिसायला मिळाले. अनेक युजर्सनी व्हॉट्सअप सोडण्याचा निर्णयही जाहीर केला होता. भारतात व्हॉट्सअपचे 40 कोटींहून अधिक ग्राहक आहेत. जागतिक स्तरावर व्हॉट्सअपसाठी भारत मोठी बाजारपेठ आहे. अनेक ग्राहकांनी टेलिग्राम आणि सिग्नल अ‍ॅपवर जाण्याचा निर्णय घेतला होता. एन्क्रिप्टेड मेसेजिंग अ‍ॅप सिग्नल आणि टेलिग्राम डाऊनलोड करुन घेण्यामध्ये मोठी वाढ दिसून आली. 
हेही वाचा- एका व्हॉट्सअ‌ॅपमुळे बारा भानगडी! खासगी माहिती पुढे येण्याची भीती


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: WhatsApp postpones privacy update plan amid rising concerns