
जगाच्या एकूण लोकसंख्येच्या २५ टक्के नागरिक संवादासाठी व्हॉट्सअॅपचा वापर करीत आहे. भारतात जवळपास चाळीस कोटी नागरिक हे अॅप वापरत आहेत.
नागपूर : निरोप देणे-घेणेच नव्हे तर माहिती शेअर करण्यापासून 'चुपके चुपके` ऑनलाइन रोमांस करणाऱ्या तरुणाईपर्यंत साऱ्यांसाठी सुलभ संवादाचे माध्यम असलेल्या व्हॉट्सअॅपच्या नव्या पॉलिसीमुळे अनेक भानगडी निर्माण झाल्या आहेत. खासगी माहिती चव्हाट्यावर येणार असल्याच्या चर्चांमुळे अनेकजण 'चॅटिंग'साठी नव्या पर्यायाचा शोध घेताना दिसून येत आहे. दरम्यान, व्हॉटसअॅपने ट्विट करून नागरिकांची भीती दूर करण्याचा प्रयत्न केला असला तरी अनेकांमध्ये अजूनही संभ्रम कायम आहे.
हेही वाचा - तिनं बोलवलं अन् नातेवाईकांनी चोपलं; विवाहितेशी चॅटिंग आलं युवकाच्या अंगाशी
जगाच्या एकूण लोकसंख्येच्या २५ टक्के नागरिक संवादासाठी व्हॉट्सअॅपचा वापर करीत आहे. भारतात जवळपास चाळीस कोटी नागरिक हे अॅप वापरत आहेत. भारतातील ग्राहक नव्या धोरणामुळे नव्या पर्यायाच्या शोधात लागताच व्हॉटसअॅपने ट्विट करून स्पष्टीकरण दिले. परंतु, हे ट्विटही अनेकांपर्यंत पोहोचले नसल्याने वापरकर्ते संभ्रमात आहेत. नव्या धोरणामुळे खासगी माहिती सार्वजनिक होणार असल्याची भीती नागरिकांत आहे. विशेषतः दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत चॅटिंग करणाऱ्या प्रेमीयुगुलाच्या काळजाचे ठोके वाढले आहेत. 'भानगडी' चव्हाट्यावर येण्याच्या भीतीने अनेकजण संवादाच्या इतर माध्यमाकडे वळत आहेत. भारतातील मोठा ग्राहक दुरावत असल्याने व्हॉट्सअॅपने तीन दिवसांपूर्वी ट्विट करून 'व्हॉट्सअॅप' तसेच फेसबुक खासगी संदेश पाहू शकत नाही किंवा खासगी कॉलही ऐकू शकत नाही' असे स्पष्टीकरण दिले. तसेच तुमचे लोकेशनही पाहू शकत नाही. सर्व ग्रुपही खासगी ठेवण्यात येत असल्याचे ट्विट करण्यात आलेल्या फोटोवर दिसत आहे. याशिवाय इंग्रजीत मोठ्या उताऱ्यातून काही बाबींचा खुलासा केला आहे.
हेही वाचा - मन सुन्न करणारं वास्तव! जीवाचं रान करून वाढवलेल्या जीवांना खड्ड्यात पुरण्याची आली वेळ
नवी पॉलिसी व्यावसायिकांसाठी? -
व्हॉट्सअॅपने मित्र, परिवार यांच्यातील संभाषण व व्यावसायिक संभाषणात फरक असल्याचे ट्विटमधून सांगितले आहे. ते समजून घेतले तर वापरकर्त्यांची भीती दूर होण्याची शक्यता आहे. फेसबुकवर एखादी जाहिरात दिसल्यास त्याच ठिकाणी असलेल्या एका बटनव्दारे त्या उत्पादकापर्यंत व्हॉट्सअॅपने मेसेज करता येते. या मेसेजमधून कुठल्या उत्पादनात रस आहे, ते ओळखून फेसबुक त्या व्यक्तीला संबंधित उत्पादनाच्या जाहिरात दाखवू शकते. एक प्रकारे नवी पॉलिसी व्यावसायिकांसाठी तसेच ऑनलाइन शॉपिंगसाठी उपयुक्त असल्याचे व्हॉट्सअॅपने नमुद केले आहे.
हेही वाचा - हिंगणघाट जळीतकांड : ...अन् अंकिताच्या आईला रडू कोसळले; भावूक झाल्याने १५ मिनिटे कामकाज थांबले
व्हॉट्सअॅपसाठी भारत मोठी बाजारपेठ आहे. त्यांना येथील व्यवसाय घालविणे परवडणारे नाही. त्यामुळे व्हॉट्सअॅप धोरणात शिथिलता आणत आहे. नागरिकांनी भीतीपोटी मात्र इतर अप्लीकेशन्सकडे मोर्चा वळविला. ते अॅप्लिकेशन्स यापेक्षाही धोकादायक असू शकते. त्यामुळे व्हॉट्सअॅपच्या 'एफएक्यू' या सदरातून माहिती घेऊन विचार करावा.
- अजित पारसे, सोशल मीडिया विश्लेषक.