WhatsAppच होतंय ट्रोल; यूजर्स म्हणतात 'आतापर्यंत साप पाळला'

टीम ई सकाळ
Friday, 8 January 2021

फेसबुकच्या मालकीचं असलेल्या या अ‍ॅपमध्ये झालेल्या बदलांवर युजर्सनी नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर व्हॉटसअ‍ॅपला ट्रोल केलं जात आहे.

नवी दिल्ली - Whatsapp ने त्यांच्या टर्म आणि प्रायव्हसी पॉलिसीमध्ये बदल केल्यानं सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. फेसबुकच्या मालकीचं असलेल्या या अ‍ॅपमध्ये झालेल्या बदलांवर युजर्सनी नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर व्हॉटसअ‍ॅपला ट्रोल केलं जात आहे. तसंच युजर्सनी आता व्हॉटसअ‍ॅप बंद करून टेलिग्राम वापरू असा इशाराही दिला आहे. व्हॉटसअ‍ॅपच्या नव्या पॉलिसीमुळे युजर्सनी असा पवित्रा घेतला आहे. 

व्हॉटसअ‍ॅपने त्यांच्या युजर्सना नवे नियम, अटी मान्य करा नाहीतर सेवा वापरता येणार नाही असाच मेसेज पाठवला आहे. त्यामुळे युजर्सना व्हॉटसअ‍ॅप वापरण्यासाठी नियम व अटी मान्य करणे भाग आहे. हे नियम व अटी 8 फेब्रुवारी 2021 पासून लागू होणार आहेत. 

व्हॉटसअ‍ॅपच्या अशा अटींमुळे युजर्सनी टेलिग्राम सुरक्षित असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता टेलिग्रामचा वापर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोरोना लॉकडाऊनच्या काळात मोठ्या प्रमाणावर युजर्स टेलिग्रामचा वापर करू लागले आहेत. त्यातच आता व्हॉटसअ‍ॅपच्या अशा अटींमुळे नवा पर्याय म्हणून टेलिग्रामकडे पाहिलं जाण्याची शक्यता जास्त आहे. 

हे वाचा - डोन्ट वरी, आता WhatsApp मधल्या तुमच्या विशिष्ट खाजगी चॅटला असे लावा लॉक

एका युजरने म्हटलं की, व्हॉटसअ‍ॅपची नवी पॉलिसी आम्हाला मान्य नाही. त्यामुळे व्हॉटसअ‍ॅप डिलिट करा आणि टेलिग्राम वापरा. यावर तुमचा डेटा सुरक्षित राहील. काही युजर्सनी अत्यंत तिखट अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटलं की, आम्ही आतापर्यंत साप पाळला होता. 

हे वाचा - Agree Or Not Now; तुम्हालाही Whatsapp नोटिफिकेशन आलंय का?

दरम्यान, एका युजरने म्हटलं की, जे लोक पॉलिसी बदलली म्हणून व्हॉटसअ‍ॅप डिलिट करण्याचा विचार करत आहेत त्यांच्या माहितीसाठी सांगतो की, तुमची  माहिती आधीच घेतली आहे. आता डिलिट केल्यानं काही फरक पडणार नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: whatsapp troll after notification of new term and policy