

Weather Alert Meaning
esakal
लेखक - प्रतिक बाबर
पावसाळा सुरू झाला की आपण टीव्ही, वृत्तपत्रे आणि सोशल मीडियावर हवामान खात्याचे वेगवेगळे अलर्ट पाहत असतो. मात्र, या रेड, ऑरेंज किंवा यलो अलर्टचा नेमका अर्थ काय, कोणत्या अलर्टला किती पाऊस पडतो आणि आपण काय काळजी घेतली पाहिजे, याची माहिती बहुतांश लोकांना नसते.
हवामान खात्याच्या याच इशाऱ्यांमागील नेमके गणित आणि त्यांचे अर्थ सोप्या भाषेत समजून घेऊयात.
पावसाचे प्रमाण : २०४ मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त
जेव्हा हवामान विभागाकडून २०४ मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पावसाची शक्यता असते, तेव्हा रेड अलर्ट जारी केला जातो. याचा अर्थ अत्यंत मुसळधार पाऊस, अतिवृष्टी, पूर, भूस्खलन किंवा ढगफुटी होण्याची दाट शक्यता असते. अशा वेळी नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी प्रशासनाला तत्काळ सज्ज व्हावे लागते. नदी आणि नाल्याकाठी राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविणे हे प्रशासनाचे मुख्य काम असते. या अलर्ट दरम्यान नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर पडू नये आणि धोकादायक भागात जाणे पूर्णपणे टाळावे.
पावसाचे प्रमाण : ११५ ते २०४ मि.मी. दरम्यान
ज्यावेळी ११५ ते २०४ मि.मी. दरम्यान पाऊस पडण्याचा अंदाज असतो, तेव्हा ऑरेंज अलर्ट दिला जातो. या काळात मुसळधार पावसाची शक्यता जास्त असते आणि नैसर्गिक आपत्ती ओढवू शकते. या अलर्टच्या काळात वीजपुरवठा खंडित होणे किंवा मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होणे अशा समस्या निर्माण होतात.
यामुळे प्रशासनाला आधीच सर्व आवश्यक उपाययोजना कराव्या लागतात. नागरिकांनीदेखील ऑरेंज अलर्ट असताना अत्यंत गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन केले जाते.