

Mumbai Heavy Rainfall
esakal
महेश शिंदे
मुंबईने यंदाच्या पावसाळ्यात पुन्हा एकदा अभूतपूर्व पर्जन्यमानाचा अनुभव घेतला. जुलैच्या पहिल्या सात दिवसांत सांताक्रूझ वेधशाळेत एक हजार सतराहून अधिक मिलीमीटर पावसाची नोंद झाली. विशेष म्हणजे हे पर्जन्यमान मागील वर्षीच्या संपूर्ण जुलै महिन्यात झालेल्या पावसापेक्षाही अधिक होते. कुलाबा परिसरातही जवळपास नऊशे मिलीमीटर पाऊस नोंदवण्यात आला. या सलग मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले, उपनगरी रेल्वे सेवा आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला, तसेच जनजीवन विस्कळीत झाले. या घटनांनी मुंबईसमोरील शहरी पूर हा केवळ हंगामी प्रश्न नसून हवामान बदलामुळे अधिक गंभीर होत चाललेले संकट असल्याचे स्पष्ट केले.
नदीला पूर येणे आणि शहरात पाणी साचणे या दोन वेगळ्या घटना आहेत. शहरांमध्ये अल्प कालावधीत अतिवृष्टी झाल्यानंतर नाले, जलनिस्सारण व्यवस्था आणि नैसर्गिक जलमार्ग अतिरिक्त पाणी वाहून नेऊ शकत नाहीत, तेव्हा रस्ते, वसाहती, रेल्वेमार्ग आणि सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. यालाच शहरी पूर म्हटले जाते. नैसर्गिक कारणांबरोबरच नियोजनातील त्रुटी, काँक्रीटीकरण आणि जलमार्गांवरील अतिक्रमणे यामुळे ही समस्या अधिक तीव्र होते.