भारतातील स्वर्गसौंदर्य पाहायचे आहे? मग या ठिकाणांना भेट द्यायलाच हवी

कुबेर
Wednesday, 17 February 2021

भारतात अशीही काही ठिकाणे आहेत जी फारशी लोकप्रिय नाहीयेत पण येथील निसर्गसौंदर्य अतिशय मनमोहक आहे. मग आज जाणून घेऊयात अशाच काही ठिकाणांबाबबद्दल. 

स्वर्गसौंदर्य पाहायला कोणाला आवडणार नाही? भारतातील प्रत्येक व्यक्तीला पर्यटनाची आवड नक्कीच असते आणि त्यामुळेच गेल्या काही काळात पर्यटन क्षेत्राने मोठी प्रगती देखील केल्याचे आपल्याला पाहायला मिळते. कोरोना काळात खंड पडला खरा पण आता पुन्हा अनेकांनी आपल्या सहलींचे प्लॅन ठरवले देखील आहेत. लोकप्रिय पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी वाढताना सध्या दिसते आहे. पण भारतात अशीही काही ठिकाणे आहेत जी फारशी लोकप्रिय नाहीयेत पण येथील निसर्गसौंदर्य अतिशय मनमोहक आहे. मग आज जाणून घेऊयात अशाच काही ठिकाणांबाबबद्दल. 

१) गुरेज वॅली, काश्मीर 

या ठिकाणाला दुसरा स्वर्ग म्हटले तरी वावगे ठरणार नाही. उंच उंच डोंगरांच्या कुशीत वसलेल्या या ठिकाणचे निसर्ग सौंदर्य नक्कीच तुम्हाला या जागेच्या प्रेमात पाडेल. गुरेज वॅली ही LoC च्या अगदी खाली असल्याने हे ठिकाण अतिशय सुरक्षित मानले जाते. LoC जवळ असून देखील सुरक्षित कसे ? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. याचे उत्तर म्हणजे LoC जवळ असल्याने भारतीय सैन्याचे येथे कायम लक्ष असते. गुरेज वॅली येथे विविध प्रकारची झाडे, वनस्पती आणि फुले देखील मोठ्या प्रमाणात सापडतात. नैसर्गिकसौंदर्य पाहायचे असेल तर या ठिकाणाला आवर्जून भेट नक्की द्या. गुरेज वॅली येथे जाण्यास मे ते सप्टेंबर हा कालावधी उत्तम असतो. 

हेही वाचा  - देशातील अशी पाच अज्ञात ठिकाणे जी पाहिलेली नसतील..जाणून...

२) फुगताल गॉम्पो, जम्मू काश्मीर 

या जागेचे नाव कदाचित फार कमी लोकांना माहित असेल. फुगताल गॉम्पो या जम्मू काश्मीर मध्ये असणाऱ्या जागेची काही वेगळीच खासियत आहे. आशियातील सर्वात दूरवर असलेला मठ या ठिकाणी पाहायला मिळतो. झंस्कार येथील डोंगरात असणारी गुहा देखील पाहण्यासारखी आहे एवढाच नव्हे तर येथून सरप नदीचे मनमोहक दृश्य देखील पाहायला मिळते. जवळच असणारी द्रांग डुंग ग्लेशियर आणि नून कून कासिफ ही ठिकाणे देखील पाहण्यासारखी आहेत. विशेष म्हणजे फुगताल गॉम्पो येथे जाण्यास रस्ता नाहीये आणि तिथे जायचे असल्यास २-३ दिवस गिर्यारोहण करून जावे लागते. फुगताल गॉम्पो येथे जाण्यास जून ते सप्टेंबर हा कालावधी उत्तम असतो. 

३) परुळे भोगवे, महाराष्ट्र 

महाराष्ट्रातील हे ठिकाण अतिशय सुंदर आणि विविधतेने नटलेले आहे. समुद्र किनाऱ्यावरील ही ठिकाणे फार कमी लोकांना माहित आहेत. परुळे मध्ये मस्त मालवणी खाण्याचा आस्वाद घेता येतो आणि तसेच फार्म स्टे करण्याचा सुंदर अनुभव घेता येतो. शहराच्या गजबजाटापासून दूर जरा निवांत आणि पारंपरिक आयुष्याचा अनुभव अतिशय सुखद असतो. भोगवे मध्ये वास्तुकलेची सुंदर उदाहरणे पाहायला मिळतात. पुरातन मंदिरे आणि जुनी कौलारू घरे पाहून आणि त्याची बांधणी ज्याप्रकारे करण्यात अली आहे ते पाहून लोक नक्कीच खुश होतात आणि आश्चर्यचकित देखील. येथे जाण्यास ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे महिने उत्तम. जवळच असणारे देवबाग आणि निवती हे समुद्र किनारे देखील अतिशय सुंदर आणि स्वच्छ आहेत. 

४) चोपता, उत्तराखंड 

स्वर्ग कधी तुम्ही डोळ्याने पहिला आहे का? नाही ? मग चोपता या उत्तराखंड मधील सुंदर ठिकाणाला तुम्ही नक्कीच भेट देऊन हा सुखद अनुभव घ्यायलाच हवा. बलाढ्य हिमालय आणि बर्फाची चादर पांघरून घेतलेल्या अनेक डोंगर रंग येथून दिसतात. हे दृश्य इतके सुंदर असते कि तासंतास त्याकडे पाहताच राहावे असे तुम्हालाही नक्कीच वाटेल. उंच उंच झाडे, मस्त वातावरण या सर्वांनी नक्कीच मन प्रसन्न होते. येथील नैसर्गिक सुंदरता नक्कीच अनुभवायला हवी. चोपता येथे जाण्यास मार्च ते मे हा कालावधी उत्तम. जवळच असणारे कोटेश्वर महादेव मंदिर आणि स्वामीनारायण मंदिर देखील आवर्जून पाहावे. 

नक्की वाचा - फिरायला जायचंय? ही शहरं आहेत परफेक्ट डेस्टिनेशन्स, एकदा आवश्य भेट द्या

५) मौलिन्नोंग, मेघालय 

आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये लोकप्रिय असणारे हे ठिकाण आपल्या देशात मात्र फार लोकांना माहित नाहीये. या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे इथली स्वच्छता. अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी या गावाला ' सर्वात स्वच्छ गाव ' ही  उपाधी देखील दिली आहे. स्वच्छ रस्ते, अतिशय स्वच्छ घरे, अंगणातील देखील एका विशिष्ट पद्धतीत, हे सर्व एका व्यवस्थित नियोजनबद्ध शहरासारखे आहे. ओला आणि सुका कचरा टाकण्यासाठी विशिष्ठ सोयी तसेच जागोजागी बांबू बनलेल्या कचरापेट्या हे देखील या गावाच्या व्यवस्थापनाचा मोठा भाग आहे. स्वच्छता कशी असावी हे अनुभवायचे असेल तर हे सर्वोत्तम ठिकाण आहे. येथे जाण्यास मार्च ते जून हा कालावधी उत्तम.  

नेहमीच सर्व लोकांची पसंती लोकप्रिय पर्यटनस्थळांना असते पण त्यापलीकडे देखील आपल्या देशात अशी अनेक ठिकाणे आहेत जी फॉरेनच्या पर्यटनस्थळांपेक्षा सुंदर आहेत. आपल्या देशात निसर्गसौंदर्य इतके आहे की खरे तर अशी काही सुंदर ठिकाणे तुम्ही पाहिलीत तर फॉरेनला वाटणार नाही. अनेक प्रकारच्या संस्कृती, वनस्पतींमधील विविधता, निसर्ग सौंदर्य, प्रेमळ लोक हे सर्व आपल्या देशाची खासियत आहे आणि लोकप्रिय पर्यटनस्थळे तर आहेतच पण जी ठिकाणे फार कमी लोकांना माहित आहेत ती देखील अतिशय सुंदर आहेत आणि आवर्जून भेट देण्यासारखी आहे. मग या तुमचा पुढच्या सहलीचा बेत ठरला असेलच ना? मग या पैकी कोणत्या ठिकाणी जायला तुम्हाला आवडेल? कळवा आम्हाला देखील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Know about places which are full of nature in India