ऐतिहासिक, पौराणिक कथांशी जोडलेलं एक रम्य ठिकाण शिखर शिंगणापूर! 

बाळकृष्ण मधाळे
Monday, 10 August 2020

नाविन्याची चाहूल म्हणजे श्रावण. श्रावणात आपल्या संस्कृती, परंपरा, सण उत्सव यांची अगदी रेलचेल असते. वातावरणात थंडावा आलेला असतो. जिथे पाहावे, तिथे धरणी माता नवचैतन्याने न्हाऊन निघत असते. नदी, नाले, तलाव दुथडी भरून वाहत असतात. पाण्याची अल्लड धाव मनमोहून टाकणारी असते. प्राणी, पक्षी अवनीच्या या नवरुपामुळे आनंदी झालेले असतात. पावसाच्या शिडकाव्यामुळे हिरवाईची चादर पसरलेली असते. यांसारखी अनेक वैशिष्ट्ये श्रावणाची सांगता येतील. याशिवाय महादेव शिवशंकरालाही हा महिना अत्यंत प्रिय असल्याचे सांगितले जाते.

सातारा :  शिखर शिंगणापूर! पार्वतीने रुसून लपून बसलेल्या शंकराला अचूक शाेधून काढले आणि पुन्हा जाऊ नये म्हणून चक्क दुसऱ्यांदा जिथे लग्न केले ते हे ठिकाण. स्वयंभू महादेवाचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. शंकर पार्वतीच्या विवाहाचे ठिकाण म्हणून शिखर शिंगणापूरला 'दक्षिण कैलास' असे म्हणतात. सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्‍यामध्ये दहिवडी गावापासून 20 किलाे.मीटर अंतरावर शिखर शिंगणापूर वसले आहे. इथे असलेल्या डोंगराला शंभू महादेवाचा डोंगर म्हणतात. या डोंगराच्या पायथ्याशी शिंगणापूर गाव आहे. हा डोंगर म्हणजे सह्याद्रीचाच एक फाटा असल्याने डोंगरावर दाट झाडी आहे. महादेवाचे मंदिर याच डोंगरावर आहे. मंदिरात जायला जवळपास 400 पायऱ्या चढून जावे लागते. त्यापुढे आणखी थोडे चढून गेल्यावर खडकेश्वर मंदिर आहे.
 
महादेवाचे हे मंदिर आणि शिंगणापूर गाव यादव कुळातील सिंधण राजाने वसवले आहे, असे म्हणतात. मंदिराला दगडी तटबंदी आहे आणि या मंदिराच्या आवारात पाच मोठ्ठे मोठ्ठे नंदी आहेत. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या घंटा आहेत. या घंटापैकी एक घंटा ब्रिटीशांकडून मंदिराला मिळाली आहे. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये दोन शिवलिंग आहेत. त्यांनाच शिव पार्वतीचे प्रतिक मानतात. शिवाजी महाराजांच्या घराण्यामध्ये शिखर शिंगणापूरच्या महादेवाचे अतिशय महत्त्व होते. इथे असणारा तलाव शिवतीर्थ असे म्हणतात. या मंदिराचे शिखर हा स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. शिखरावर अगदी नाजुक नक्षीकाम केले आहे. मंदिराच्या आवारात अनेक दिपमाळा आहेत. 

डोंगराच्या कुशीतील यवतेश्वर; यादवकालीन श्री शंभू महादेव मंदिर

या मंदिराच्या पश्‍चिमेकडे अमृतेश्वराचे हेमाडपंथी मंदिर आहे. मंदिरात चार वेळा पुजा केली जाते. दरवर्षी चैत्र शु. अष्टमीला शंकर पार्वती विवाह सोहळा अगदी साग्रसंगीत साजरा केला जातो. पंचमीला हळदीचा कार्यक्रम असतो. या लग्नासाठी एक भले मोठे फुट लांब पागोटे विणले जाते. ज्या कुटूंबाला हे काम दिले जाते ते कुटूंब पूर्ण वर्षभर यासाठी मेहनत करते. विवाहाच्या दिवशी या पागोट्याचे एक टोक महादेवाच्या कळसाला तर दुसरे टोक अमृतेश्वराच्या देवळाच्या कळसाला बांधतात. असं हे शिखर शिंगणापूर ऐतिहासिक, पौराणिक कथांशी जोडलेले एक रम्य ठिकाण आणि तीर्थक्षेत्रही आहे. दरम्यान, श्रावणात या तीर्थस्थळी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते.

पांडवकालीन मेरुलिंग; मंदिराच्या गाभाऱ्यात उमटताे तुमचा प्रतिध्वनी

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Article About Shikharsinghnapur Lord Shiva Temple