सोलो ट्रॅव्हलर : निसर्गाचा समृद्ध ‘वारसा’ 

शिल्पा परांडेकर 
Saturday, 11 April 2020

पर्यावरणतज्ज्ञ केतकी घाटे व त्यांच्या सहकारी मानसी करंदीकर यांच्यासारखी काही निसर्गमित्र मंडळी निसर्गाच्या संवर्धनासाठी झटत आहेत.

‘निसर्ग आपला खरा मित्र आहे,’ हा सुविचार आपण शाळेत शिकलो. निसर्ग आपल्याला जीवनातील प्रत्येक टप्प्यावर काही न् काही देतच असतो. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांबरोबर तो आनंद, प्रेम, वात्सल्य अगदी भरभरून देत असतो. आपण साधारणपणे निसर्गाची ओरबाड करत असतो, मात्र पर्यावरणतज्ज्ञ केतकी घाटे व त्यांच्या सहकारी मानसी करंदीकर यांच्यासारखी काही निसर्गमित्र मंडळी निसर्गाच्या संवर्धनासाठी झटत आहेत. त्यांचे अथक प्रयत्न पाहून खात्री पटते की, निसर्गाला जपणे व जतन करणे आपल्याला वाटते तितके अवघड नाही. केतकीताई व मानसीताई त्यांच्या ‘ऑयकॉस’ संस्थेबरोबरच इकॉलॉजी सोसायटी, शासनाचे विविध उपक्रम, पुस्तके, लहान मुलांसाठी निसर्गशाळा अशा विविध माध्यमांद्वारे गेल्या अठरापेक्षा अधिक वर्षे निसर्गाचे पुनरुज्जीवन व संवर्धनामध्ये कार्यरत आहेत. 

सोलो ट्रॅव्हलर : असे दांडगी इच्छा...!

निसर्गाला जतन करताना केवळ वृक्षारोपण न करता निसर्गाच्या मित्रांचा, म्हणजेच प्राणी, पक्षी, कीटक अगदी बुरशी, जीवाणू यांचा देखील विचार आवश्यक असतो, हे त्या आवर्जून सांगतात. प्रत्येकवेळी थेट निसर्गात जाऊनच निसर्गासाठी काहीतरी करण्याची गरज नसते. आपल्या रोजच्या बारीकसारीक कृतींतूनदेखील निसर्गाचे संवर्धन करू शकतो. त्या निसर्ग संवर्धनाचे काही टप्पे सांगतात. 

सोलो ट्रॅव्हलर : माणुसकीचे अलौकिक दर्शन

- संवर्धनाची सुरुवात आपल्या जीवनशैलीत थोडी सुधारणा करण्यापासून करू. 

उदा. इंधनाचा काटेकोर वापर. 
- निसर्ग हा गरज भागविण्यासाठी आहे, हाव भागविण्यासाठी नाही, हे आपण जाणले पाहिजे. त्यामुळे वस्तूंचा आवश्यकतेनुसार वापर करणे गरजेचे आहे. 

हे समजावताना त्या म्हणतात, ‘‘इथे आपण आदिवासींप्रमाणे विचार करायला हवा. कारण ते निसर्गावर गरजेपुरतेच अवलंबून असतात.’’ 

यानंतरचा टप्पा येतो तो म्हणजे पुनरुज्जीवन व लागवड. लागवड करतानाही पर्यावरणीय विचार करणे आवश्यक असते. देशी झाडांच्या लागवडीला प्रोत्साहन दिले पाहिजे. जेणेकरून स्थानिक निसर्गाला निसर्गतः लाभलेली अन्नसाखळी जतन होण्यास मदत होते. संवर्धनाच्या कोणत्याही टप्प्यांचा विचार करत असताना, संवर्धनाचे पिढ्यानपिढ्या जपलेले ज्ञान, निसर्गाशी जोडलेली पारंपारिक ज्ञानकौशल्येही आपण जपली पाहिजेत, हा विचार त्यांच्या ‘वारसा’ या माहितीपटातून त्या आपल्यापर्यंत पोचवतात. 

निसर्ग आपला मित्र होता, आहे आणि पुढेही राहायला हवा. आणि यासाठी... 

रान राखावे, रान जोखावे 
रान मेळवावे परोपरी 
रान आणि आपण जैसे देह आणि प्राण 
हे जाणावे प्रमाण अंतरात 
हे आपण सर्वांनी आपल्या मनातून व कृतीतून प्रत्यक्षात उतरविले पाहिजे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shilpa parandekar solo travel article nature