दोन शिवलिंग असलेलं कैलास महादेव मंदिर

सकाळ वृत्तसेवा
Monday, 3 August 2020

यमुनेच्या तिरावर असलेल्या या मंदिरात नदीला पूर आल्यावर पाणी येतं. हे पाणी कैलास महादेव मंदिरातील शिवलिंगांपर्यंत पोहोचतं.

आग्रा - श्रावणातल्या सोमवारी आग्र्यातील कैलास महादेव मंदिरात यात्रेचं आयोजन केलं जातं. यंदा कोरोनामुळे यात्रा किंवा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेलं नाही. तसंच महादेवाचं दर्शन ऑनलाइन दाखवलं जात आहे. महादेवाचं हे मंदिर दहा हजार वर्षांपेक्षा जुनं असल्याचं सांगितलं जातं. तसंच हे असं मंदिर आहे जिथं एकाच ठिकाणी दोन शिवलिंग आहेत. ही बाब दुर्मीळ असल्याचं मंदिराचे महंत गौरव गिरी यांनी सांगितलं. 

कैलास महादेव मंदिरातील शिवलिंगांची स्थापना भगवान परशुराम आणि त्यांचे पिता ऋषी जमदग्नी यांनी केल्याचंही म्हणतात. दोघांनी मंदिरात एक एक शिवलिंग स्थापन केलं. एकाच मंदिरात दोन शिवलिंग असणं ही गोष्ट दुर्मीळ अशी आहे. ऋषी जमदग्नींच्या आईचा आश्रम रेणुका धामसुद्धा याठिकाणाहून 6 किलोमीटर अंतरावर आहे. 

हे वाचा - अद्भुत शिवमंदिर जिथं सुर्य उगवताच किरणं पोहोचतात थेट गाभाऱ्यात

कैलास महादेव मंदिराबाबत अख्यायिकाही सांगितल्या जातात. असं म्हणतात की, त्रेता युगात विष्णूचा सहावा अवतार भगवान परशुराम आणि त्यांचे पिता ऋषी जमदग्नि दोघे कैलास पर्वतावर महादेवाची आराधना कऱण्यासाठी गेले. दोघांनीही कठोर तपस्या केली तेव्हा शंकराने त्यांना वर मागण्यास सांगितलं. दोघांनी भगवान शंकराकडे सोबत चालण्यास आणि राहण्याचा आशिर्वाद मागितला. त्यावेळी शंकराने दोघांन एक एक शिवलिंग भेट दिलं. 

शिवलिंग घेऊन पिता पुत्र यमुनेच्या काठी असलेल्या अग्रवनातील रेणुका आश्रमाकडे जाण्यासाठी निघाले. तेव्हा आश्रमाच्या अलिकडे ते रात्री मुक्कामासाठी थांबले. सकाळ होताच नित्यकर्मे आटोपून जाण्यास निघाले तर दोन्ही शिवलिंगांची स्थापना झालेलं त्यांना दिसलं. भगवान परशुराम आणि ऋषी जमदग्नि यांनी शिवलिंग उचलण्याचा प्रयत्न केला मात्र ते शक्य झालं नाही. शेवटी दोघांनी तिथेच शिवलिंगांची पूजा केली. तेव्हापासून या ठिकाणाला कैलास असं नाव पडल्याचं म्हटलं जातं. 

हे वाचा -  जगातील सर्वात मोठं शिवमंदिर आहे 'या' ठिकाणी

यमुनेच्या तिरावर असलेल्या या मंदिरात नदीला पूर आल्यावर पाणी येतं. हे पाणी कैलास महादेव मंदिरातील शिवलिंगांपर्यंत पोहोचतं. मंदिराच्या परिसरात अनेक धर्मशाळांची उभारणी करण्यात आली आहे. आग्र्यातील सिकंदरा इथं हे प्रसिद्ध कैलास महादेव मंदिर आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: uttar pradesh kailas mahadev mandir shravan somvar