जगातील सर्वात मोठं शिवमंदिर आहे 'या' ठिकाणी

सूरज यादव
Monday, 13 July 2020

कार्तिक पौर्णिमेला मंदिरामध्ये मोठा उत्सव साजरा केला जातो. याला कार्तिक दीपम असंही म्हटलं जातं. यावेळी दीपदानही केलं जातं. 

चेन्नई -  भारतात अनेक ठिकाणी प्राचिन शिवमंदिरे आहेत.  तामिळनाडुत असलेलं अरुणाचलेश्वर शिव मंदिर हे जगातील सर्वात मोठं शिव मंदिर असल्याचं मानलं जातं. श्रावण महिन्यात या मंदिरात भक्तांची अलोट गर्दी असते. सध्या कोरोनामुळे मंदिर बंद ठेवण्यात आलं आहे. तामिळनाडुतील तिरुवनमलाई जिल्ह्यात हे शिव मंदिर आहे. अन्नमलाई पर्वतात असलेल्या या मंदिराला अनामलार किंवा अरुणाचलेश्वर शिवमंदिर असंही म्हटलं जातं. याठिकाणी पौर्णिमेला भक्तांची गर्दी असते. कार्तिक पौर्णिमेला इथं मोठी यात्राही भरते. भक्त अन्नामलाई पर्वताची 14 किमी परिक्रमा पूर्ण करून देवाकडे प्रार्थना करतात. 

मंदिराबाबत काही कथाही सांगितल्या जातात. भगवान शंकराने याच ठिकाणी ब्रह्मदेवाला शाप दिला होता की, पृथ्वीतलावर त्यांचे एकही मंदिर होणार नाही. तर केवड्याचे फुलही पुजेसाठी वापरलं जाणार नाही. ते ठिकाण म्हणजेच तिरुवनमलाई होय. पौराणिक कथेत असं म्हटलं आहे की एकदा कैलास पर्वतावर पार्वतीने महादेवाचे डोळे झाकले होते. त्यावेळी पूर्ण ब्रह्मांड अंधारात बुडाल. अनेक वर्षे जगात अंधार होता. त्यावेळी माता पार्वतीसह इतर देवतांनी तपस्या केली. तेव्हा महादेव अन्नामलाई पर्वतावर प्रकट झाले असं मानतात. त्यानंतर महादेवाने अर्धनारीनटेश्वर रुपात दर्शन दिलं. अर्धनारीनटेश्वर रुपातील एक मंदिर या पर्वतावर आहे.

हे वाचा -अद्भुत! मंदिराच्या पायऱ्यांवर पाय ठेवताच ऐकू येतो ध्वनी

अरुणाचलेश्वर मंदिर पर्वतराजीत आहे. अन्नामलाई पर्वत हा शिवाचे प्रतिक मानला जातो. या पर्वताची उंची 2668 फूट इतकी आहे. हा पर्वत अग्निचेही प्रतिक आहे. तिरुवनमलाई शहरात एकूण आठ दिशांना आठ शिवलिंग आहेत. इंद्र, अग्नि, यम, निरुथी, वरूण, वायु, कुबेर, इशान लिंगांची स्थापना करण्यात आलेली आहे. प्रत्येक शिवलिंगाच्या दर्शनाने वेगवेगळे लाभ होतात असं मानलं जातं. आठ शिवलिंगांचा संबंध आठ राशींशी जोडला जातो. लोक त्यांच्या राशीनुसार ग्रहांचे दोष दुर करण्यासाठी त्यांची विशेष पूजा करतात. 

हे वाचा - विकास दुबेमुळे उज्जैनचं मंदिर चर्चेत, मराठ्यांनी केला होता जिर्णोद्धार

कार्तिक पौर्णिमेला मंदिरामध्ये मोठा उत्सव साजरा केला जातो. याला कार्तिक दीपम असंही म्हटलं जातं. यावेळी दीपदानही केलं जातं. प्रत्येक पौर्णिमेला परिक्रमा करण्याचीही याठिकाणी परंपरा आहे. या परिक्रमेला गिरिवलम असंही म्हणतात. अरुणाचलेश्वर मंदिर चेन्नईतून 200 किमी लांब आहे. इथं ट्रेनने जायचं असेल तर चेन्नईतून वेल्लोर किंवा विलुपुरमला जावं लागतं. तिरुवनमलाई मंदिरात दर्शन घेऊन राहण्यासाठी वेल्लोर किंवा विलुपुरम इथं जाता येतं. मंदिर सकाळी साडेपाच वाजता उघडण्यात येतं ते रात्री 9 वाजता बंद केलं जातं. मंदिरात नियमित अन्नदानही सुरू असतं. 

(मंदिरांबाबत सांगण्यात आलेल्या कथांमधून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्याचे समर्थन करण्याचा हेतू नाही.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: world biggest shiv mandir in tamilnadu arunachaleswar