मुंबईच्या प्रवासाची साक्षीदार मुंबादेवी

मुंबईचे मूळ रहिवासी असलेल्या कोळी समाजाने मुंबईचे बदलते रूप अतिशय जवळून पाहिले आहे.
Mumbadevi
MumbadeviSakal
Summary

मुंबईचे मूळ रहिवासी असलेल्या कोळी समाजाने मुंबईचे बदलते रूप अतिशय जवळून पाहिले आहे.

शहरातील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झालेली आणि शहराचे नाव धारण केलेली ही मुंबादेवी. एक छोटेसे बेट ते जगाच्या नकाशावरील महत्त्वाचे शहर म्हणून उदयास आलेल्या मुंबईच्या प्रवासाची साक्षीदार असलेल्या मुंबादेवी मंदिराची भेट म्हणूनच इतर धार्मिक स्थळांपेक्षा वेगळी ठरते.

मुंबईचे मूळ रहिवासी असलेल्या कोळी समाजाने मुंबईचे बदलते रूप अतिशय जवळून पाहिले आहे. एकेकाळी आडवी असणारी मुंबई आता आकाशाच्या दिशेने वाढत असली, तरी समुद्रकिनाऱ्यांलगत असलेले बहुतांश कोळीवाडे आजही आपल्या मूळ स्थितीत पाहायला मिळतात. मुंबईला नैसर्गिक देणगी म्हणून लाभलेल्या सागरातून मासेमारी करून मासेविक्रीतून खुशाल आनंदी जीवन जगण्याचे तत्त्व हा समाज गेली अनेक वर्षे पाळत आला आहे. हे कोळी बांधव जसे सर्वांना प्रिय आहेत, तशीच त्यांची संस्कृती आणि ग्रामदेवताही मुंबईकरांच्या हृदयात आदराचं स्थान टिकवून आहे. मुंबादेवी ही मुंबईची ग्रामदेवता. मूळ कोळी बांधवांची देवता असलेल्या मुंबादेवीवरूनच या शहराला मुंबई हे नाव पडल्याचे सांगितले जाते.

मरीन लाइन्स पूर्व येथील बाजारपेठेच्या म्हणजेच भुलेश्वर भागात मुंबादेवीचे मंदिर आहे. मुंबादेवी मंदिराला जाण्यासाठी तीन रस्ते आहेत. पहिला रस्ता झवेरी बाजारातून जातो, दुसरा रस्ता अतिशय प्रसिद्ध अशा कंसारा चाळीच्या इथून भांड्यांची दुकानं असलेल्या बाजारातून आणि तिसरा रस्ता झवेरी बाजारातील बापू पानवाला आणि शुक्ला कपड्यांच्या दुकानाच्या मधून थेट मंदिरापर्यंत घेऊन जातो; पण मंदिर आधीपासून इथे नव्हते. चार दशकांपूर्वी मुंबईच्या फोर्ट परिसरात म्हणजेच आजचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (इंग्रजांच्या काळातले व्हिक्टोरिया टर्मिनस) असलेल्या ठिकाणी हे मंदिर होते. मंदिर असलेले ठिकाण मेंजिस या नावाने ओळखले जात असे. पुढे मुंबईचे सर्वात मोठे रेल्वे स्थानक आणि स्थानकाची इमारत उभारण्यासाठी इंग्रजांनी हे मंदिर स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आणि तीन मोठे तलाव असलेल्या भुलेश्वर परिसरात मंदिर हलविण्यात आले. पांडू नामक व्यापाऱ्याने आपली जमीन या मंदिरासाठी देऊ केली होती. त्यांचाच परिवार अनेक वर्षे मंदिराची काळजी घेत असे; मात्र अलिकडे न्यायालयाच्या निर्यणानंतर एका ट्रस्टद्वारे मंदिराची देखभाल केली जाते.

मुंबादेवीची मूर्ती अतिशय साधी आणि आकर्षक आहे. सिंहावर स्वार झालेल्या देवीच्या हातांमध्ये विविध आयुधे आहेत. मुंबादेवीला दररोज वेगवेगळ्या फुलांनी सजवले जाते. फुलांची सजावट केल्यानंतर मात्र तिच्या हातातील आयुधे फारशी दिसत नाहीत. त्यामुळे ज्या दिवशी देवीला भरजरी साडी नेसवली नसेल आणि फुलांची साधी सजावट असेल, त्या दिवशी तिचे रूप पाहता येते. आठवड्याच्या सात वारांना देवी गरूड, नंदी, हंस, हत्ती अशा वेगवेगळ्या वाहकांवर स्वार होते. देवीच्या मागील बाजूने भिंतींवर इतर देवींची विविध रूपे दगडांमध्ये कोरलेली असून रंगीत कलाकुसर केलेली आहे. देवीच्या गाभाऱ्याला चांदीचे दार असून, त्यावरही दोन्ही बाजूंना विविध देवींची रूपं दिसतात.

मंदिर परिसरात गणपती, अंबे माता, राधाकृष्ण, श्रीराम, संतोषी माता, हनुमान, श्री जगदीश आदी देवतांची स्थापना केलेली आहे. तसेच मुंबादेवीच्या शेजारी अन्नपूर्णा आणि जगदंबा देवीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. मुंबादेवीसोबतच तिथेही पूजा-पाठ केले जातात. नवरात्रोत्सवात येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. दर मंगळवारी मुंबादेवीच्या दर्शनाला अलोट गर्दी लोटते. या देवीच्या मंदिरात एक अनोखी गोष्ट पाहायला मिळते. देवीच्या दर्शनानंतर भक्त आठवण म्हणून मंदिरातील लाकडी पट्टीवर एक नाणे खिळ्याने ठोकून बसवतात. त्यामागची श्रद्धा किंवा तर्क ठाऊक नाही; पण अशी अनेक नाणी येथे पाहायला मिळतील. मुंबादेवी मंदिराचा कळस अतिशय देखणा आहे. त्रिकोणी आकाराच्या चाळीस ते पन्नास फूट उंचीच्या कळसावर छोटे-छोटे कलाकुसर केलेले कळस आहेत. कळसावर देवीच्या चेहऱ्याची प्रतिकृती आणि सिंह आहेत. दगडी कळसाच्या शीर्षस्थानी सोन्याचा छोटा कळस आणि ध्वजदेखील आहे. तसेच नियमितपणे कापडी ध्वजदेखील फडकविण्यात येतो.

मुंबादेवी मंदिराच्या आसपासचा परिसर आता पूर्वीसारखा राहिलेला नाही. तलाव तर सोडाच; पण दाटीवाटीने उभ्या राहिलेल्या वस्तीतून चालणेही मुश्किल असते; तरीही मुंबईची आद्य देवता असलेल्या देवीच्या दर्शनासाठी येथे पहाटेपासून भाविकांची रांगा लागतात. आता ही केवळ कोळी बांधवांची देवता राहिलेली नसून समस्त मुंबईकरांचे श्रद्धास्थान झालेली आहे. मुंबादेवी मंदिराची वास्तुकला फार आकर्षक नसली, तरी शहरातील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झालेली आणि शहराचे नाव धारण केलेली ही एकमेव देवता म्हणता येईल. एक छोटेसे बेट ते जगाच्या नकाशावरील महत्त्वाचे शहर म्हणून उदयास आलेल्या मुंबईच्या प्रवासाची साक्षीदार असलेल्या मुंबादेवी मंदिराची भेट म्हणूनच मुंबईतील इतर धार्मिक स्थळांच्या भेटीपेक्षा वेगळी ठरते.

nanawareprashant@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com